शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. गुढीपाडवा
Written By वेबदुनिया|

महिलांनी उभारली कर्तृत्वाची गुढी

ND
ग्रामीण भागातील महिलांना तालुकापातळीवर शासकीय व पोलीस कामकाजाची माहिती नसते. शिवाय शासकीय अधिकार्‍यांना भेटण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसा आत्मविश्वासही नसतो. परंतु जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा, रासलपूर, वडगाव, तेजन येथील महिला यास अपवाद आहेत. येथील ‍महिलांनी-विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन संबंधित अधिकार्‍यांशी सुसंवाद साधल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आणि त्यांचे मूळ प्रश्न मार्गी लागले. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी महिलांना येथील ‍अधिकार्‍यांनी सहकार्य केले. खरं तर ही सर्व किमया जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत काम करणार्‍यांची आहे.

राजुरा, रासलपूर, वडगांव, तेजन या गावांच्या महिलांची ही यशोगाथा खरोकर वाखाणण्यासारखी आहे. या गांवातील महिलांचा यापूर्वी तालुका पातळीवर शासकीय कार्यालयाशी कधीच संपर्क आलेला नव्हता. त्यांना तेथील कामकाजाचीही माहिती नसल्यामुळे कोणत्या प्रश्नासंदर्भात कोणत्या शासकीय अधिकार्‍यास भेटावे, याची त्यांना माहिती नव्हती, म्हणून या सर्व महिलांनी वरील बाबींची माहिती करुन घेतली.

जळगांव-जामोद तालुक्यातील शासकीय कार्यालयांना रासलपूर येथील 23, राजुरा येथील 15 तर निमखेडी येथील 9 अशा 47 महिलांनी तेथील कामकाजाची माहिती करुन घेतली. त्यांनी पंचायत समितीचे सभापती, गट विकास अधिकारी व विस्तारीत अधिकारी यांची भेट घेतली. खरं सांगायचं झालं तर, या महिला शासकीय अधिकार्‍यांना भेटत होत्या. त्यांनी 10 टक्के लोकवर्गणी, लहान पिठाची गिरणी आणि ऑईल इंजिन सारख्या सामाजिक कल्याणकारी योजनांची माहिती करुन घेतली. विहिर, शेत तळे आणि जमिनीचे सपाटीकरण यासाठी निधी कसा उपलब्ध करावा, यासंबधीची माहिती त्यांना यावेळी मिळाली. याशिवाय त्यांना कमी खर्चाच्या घरकूल गृह योजनेचीही माहिती मिळाली. शासकीय कार्यालयात कामकाज कसे चालते हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. त्याचबरोबर कोणते विभाग आहेत आणि कोणत्या कामासाठी कोणत्या कार्यासनाकडे जावे याची माहितीही त्यांना या भेटीत घेतली.

या भेटींमुळे महिला उत्साही झाल्या, मोठ्या आत्मविश्वासाने त्या अधिकार्‍यांशी संवाद साधू लागल्या. रासलपूरच्या महिलांनी गावात एस.टी.बसची मागणी केली. सभापतीनी हा प्रश्न एस.टी. महामंडळाच्या बैठकीत घेण्याचे आश्वासन दिले. राजूरा येथील महिलांनी गावचा हातपंप दुरुस्तीनंतर जड झाल्याची तक्रार केली. अभियंत्यांनी तो दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. निमखेडी येथील महिलांनी महिला ग्राम सभेतगावातील एका गरजू महिलेस पिठाची गिरण देण्यासंदर्भात ठराव पास करण्याचे ठरविले.

ND
इतकेच नव्हे तर, महिलांनी येथील तहसिलदार आणि पोलीस ठाण्यालाही भेट दिली. तक्रराची नोंद कशी करावी यांची माहिती त्यांना मिळाली. याशिवाय तहसिलदार साहेबांनी त्यांना इंदिरा गांधी योजना, संजय गांधी निराधार योजना, मातृत्वलाभ योजना, अपंग सहाय्य योजना आणि श्रावण बाळ योजनांनी माहिती करुन दिली. या नंतर या महिलांनी गावातील गरजू महिलांनाही योजनांची माहिती करुन द्यावयाचे ठरविले.

वडगांव तेजन येथील महिलांनी लोणार पंचायत समितीच्या कार्यालयास भेट दिली. त्या पंचायत समितीच्या ‍िवस्तारित अधिकार्‍यांना भेटल्या आणि त्यांनी विविध योजनांची माहिती करुन घेतली. मुलींच्या स्कॉलरशिप योजनेसंदर्भात ग्रामस्थांना माहिती मिळावी, यासाठी जागृती करण्यासाठी पालकांचा मेळावा घेण्याचे त्यांनी ठरविले. त्यानंतर त्यांनी नायब तहसिलदार यांची भेट घेतली. त्यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली असता तक्रार नोंदविणे, पंच म्हणून समस्याग्रस्त स्त्रियांना मदत करणे, दारुबंदीसाठी ठराव पास करणे याबाबतची माहिती त्यांना या वेळी मिळाली. वडगांव तेजन येथील महिलांनी दारुबंदीसाठी एकत्रित काम करण्याचे तसेच एखाद्या महिलेवर जर अत्याचार झाला तर पोलीसांना बोलविण्याचे ठरविले. अशा प्रकारे शासकीय योजनांबद्दल अनभिज्ञ असणार्‍या महिलांनी एक फार मोठा चमत्कार घडवून आणला. 'जहॉ चाह वहॉ राह' की उक्ती येथील महिलांनी आपल्या कृतीने खरी करुन दाखविली.

-श्रीपाद नांदेडकर
वरिष्ठ सहाय्यक संचालक, मंत्रालय