शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By वेबदुनिया|

वसंतातील 'कुहू कुहू'

वसंतात आमरायातून कोकीळची कुहू कुहू साद ऐकू येते. त्याच्या कुहू कुहूने ह्रदयाची तार जणू झंकारते. कोकीळाच्या या स्वरांत प्रणयभाव जागृत करण्याची क्षमता आहे. 
 
म्हणूनच कोकीळच्या आवाजाने ज्याचे ह्रदय झंकारले नसेल असे ह्रदय तरी असेल का असा प्रश्न पडतो. त्यामुळेच साहित्यातही कोकीळला अत्यंत मानाचे स्थान आहे. उत्तर भारतातील डोंगराळ भागातील कोकीळ दिसायला पठारी प्रदेशापेक्षा छान आहेत. पण त्यांच्या गळ्यात 'ती' मिठ्ठास नाही. कोकीळेच्या त्या गोड स्वरांचे कौतुक करण्याचा मोह इंग्रज कवी वर्डस्वथलाही आवरला नाही. त्याने एका कवितेत म्हटलेय,
 
'ओ कुक्कू शॅल आय कॉल द बर्ड, ऑर बट अ वॉंडरींग व्हॉईस? 
'कुक्कू मी तुला पक्षी म्हणू की भ्रमणशील स्वर?'
 
कोकीळ मादी कामचुकार मानली जाते. आपण घातलेली अंडी ती कावळ्याच्या घरट्यात ठेवून त्याला मुर्ख बनविणारी अशी तिची प्रतिमा आहे. तिची ही प्रवृत्ती महाकवी कालिदासानेही 'विहगेषू पंडीत' असे म्हणून अधोरेखित केली आहे. यजुर्वेदात तर चक्क हा अन्याय आहे, असे म्हटले आहे. कावळे दाम्पत्य या कोकीळेच्या पोरांनाही आपलेच समजून सांभाळतात. ही पोरंही भलतीच कृतघ्न असतात. आपण उडू शकतो, हे लक्षात आल्यानंतर कावळे दाम्पत्याला चकवून निघून जातात. एवढेच नाही तर कावळ्याचे एखादे अपत्य घरट्यात असेल तर कोकीळेची पोरं त्यालाही घरट्याबाहेर फेकून देतात. 
 
कोकीळेच्या या नवजात अपत्यात हा कृतघ्नपणा कसा येत असेल? कोकीळेचे पालन इतरांकरवी होत असल्याने संस्कृतमध्ये त्याला परभूता असे म्हणतात. अभिज्ञान शाकुंतलममध्ये शकुंतला दुष्यंताची स्मृती जागृत करण्यासाठी प्रयत्न करत असते. तिला उत्तर देताना तिची निर्भत्सना तो तिला कोकीळेची उपमा देऊन करतो. कोकिळेला आकाशात उडायचे असते म्हणून आपले अपत्य ती दुसर्‍याच्या घरट्यात टाकून निघून जातेस, तशीच तू आहेस, असे दुष्यंत तिला म्हटल्याचे शाकुंतलममध्ये उल्लेख आहे. 
 
अर्थात असे कितीही असले तरी कोकिळेच्या आवाजात जी काही मिठ्ठास आहे, त्यामुळे त्याच्या या अवगुणांचाही विसर पडतो.