गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By

गुरुपूजनाची पर्वणी

।।गुरुब्र्रह्म गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वर:।।

।।गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर्वै नम:।।

सार्‍या भारत वर्षात मोठय़ा प्रमाणावर साजर्‍या होणार्‍या उत्सवांपैकी ‘गुरुपौर्णिमा’ हा एक उत्सव. आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक गुरुंचे शिष्य या दिवशी आपल्या गुरुजनांची पाद्यपूजा करतात व त्यांना थाशक्ती गुरुदक्षिणा अर्पण करतात.

‘नाशीवंत देह जाणार सकळ’ हे आपण सर्वच जाणतो. म्हणूनच या नाशीवंत देहाची आपल्या हातून काहीतरी सार्थकता व्हावी. या सद्हेतुने जन्मात येणार्‍या प्रत्येक मानवाने स्वत:च जाणण्याचा प्रयत्न सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने करायचा असतो. अशा अध्यात्म साधनेची वाटचाल करणार्‍या साधकांचा हा पर्वणीचा दिवस. संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबांच्या भाषेत ‘शुद्धस्वरूपी त्रिगुणातीत आत्मरूप उदार कृपेचा अखंड वर्षाव करणार्‍या’ सद्गुरुंचे पूजन करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. भारतात हा उत्सव आणखी एका कारणाने अवश्य साजरा होतो. तो म्हणजे ‘व्यासपूजा’ जगद्गुरु व्यासांच्या स्मृतीचा हा दिवस..

व्यास म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म विष्णू महेशच जणू. व्यास म्हणजे ज्ञानाचा सागर, म्हणूनच त्यांना ‘वसोच्छिष्टं जगत्सर्व’ समाजाच्या उत्कर्षासाठी संस्कृतीच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी केलेला संघर्ष महाभारतातून वर्णिला आहे. म्हणूनच व्यासांसारख्या संस्कृतीरक्षक व पूजकांचे पूजन करण्याचा दिवस म्हणजे गुरुपूजन, अहंकार दूर सारणारी पौर्णिमा, मोठा अंधकार दूर करणारी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा.

श्री गुरूंना शरण जाणे म्हणजे गुरुमय होणे. अशा शरणागतीतून सर्व लघुतत्त्व संपुष्टात येते. जे गुरु आहेत त्यांचा स्वीकार व श्री गुरू यांच्या गुरुतत्त्वांचा पुरस्कार हे गुरुपौर्णिमेचे वैशिष्टय़ होय. आद्यगुरू श्री दत्तात्रय हे आपल्या विभूतीतत्त्वाने विश्वात धर्मग्लानीच्यावेळी विविध माध्यमातून प्रकट होतात. प्रत्येक गुरुमधील गुरुतत्त्व एकच असते, म्हणून त्यांच्याकडून येणार्‍या आनंदलहरी सारखच असतात.

मानवाला देवत्वाकडे पाठविण्यासाठी जिवंत व्यक्तीची म्हणजेच गुरूंची आवश्कता भासते. जीवनातील गुरूंचे महत्त्व हे गुरू प्राप्तीनंतरच खर्‍या अर्थाने समजू शकते. गुरुपौर्णिमेचा दिवस संन्यासी सांप्रदायासाठी विशेष महत्त्वपूर्ण असतो. गुरुपौर्णिमेचा हाच एक दिवस असा आहे की, जो प्रत्येक वर्षी गुरुशिष्याची भेट घडवून आणतो. गुरूंच्या ऋणातून मुक्त व्हायचे असेल तर गुरूंना सर्वस्व अर्पण करणे म्हणजेच ती खरी गुरुदक्षिणा होय. राम होऊन रामाची पूजा तशी सद्गुरु होऊन सद्गुरुंची पूजा करता आली पाहिजे. तेव्हाच खर्‍या अर्थाने सद्गुरू पूजनाची पौर्णिमा होईल.

केवळ गंध फुलांच्या लेपनांनी, सद्गुरू साफल्याने नव्हे गुरू दर्शवतील त्या मार्गाने समर्पित जीवनाचे पुष्प वाहून मनाच्या सुगंधी लेपनानेच सद्गुरू पूजन सार्थ होईल. साधनेसाठी हळूहळू तन,मन,धन यांचा त्याग करणे आवश्यक असते. मनाचा त्याग नामस्मरणाने, तनाचा त्याग  शारीरिक सेवेने, तर धनाचा त्याग ते अर्पण करून होतो. गुरुपौर्णिमेला गुरुतत्त्व इतर दिवसांपेक्षा हजारपटीने जास्त कार्यरत असते. त्यामुळे गुरूंच्या इतर आधत्मिक कार्यक्रमाच्या वेळी किंवा एखादी केलेली सेवा व त्याग त्यांच्यापेक्षा त्यादिवशी केलेली सेवा व त्यागामुळे अनुभूती जास्त प्रमाणात येतात व गुरुकृपा जास्त प्रमाणात मिळते.

जीवनात सुख-दु:ख, पाप- ताप हे पूर्व सुकृताप्रमाणेच असतात. ते भोगावेच लागतात. पण आपल्या दृष्टिकोनामुळेच सुखदु:खाच्या जाणिवेची तीव्रता मात्र निश्चित कमी होते.

ईश्वराचा अनुग्रह अवतारी पुरुषांना, अवतारी पुरुषांचा अनुग्रह महापुरुषांना, महापुरुषांचा अनुग्रह सत्पुरुषांना तर सत्पुरुषांचा अनुग्रह इतरांना आणि शिष्यांना अशी ही परंपरा साक्षात शिवापासून म्हणजे शुद्ध ब्रह्मपासून म्हणजेच ज्यांच्या ठायी ज्ञान वैराग्य स्थित आहेत. त्यांच्यापासून सुरू झाली. शिवांनी हे ज्ञान ब्रह्मदेवाला दिले.

वसिष्ठ हे ब्रह्मदेवाचे पहिले मानसपुत्र वसिष्ठांचा पुत्र शक्ती, शक्तीचा पुत्र पराशर, पराशराचा पुत्र व्यास आणि व्यासांचा पुत्र शुक्रदेव अशी ही पिता-पुत्रांची गुरुशिष्य परंपरा न राहाता फक्त गुरुशिष्य हीच परंपरा चालू राहिली व ती चालतच राहील.

अशा गुरुश्रेष्ठ परंपरेतील माझे सद्गुरु संतश्रेष्ठ श्री प्रभाकर महाराजांच्या चरणी, सद्गुरु इनामदार गुरुजींच्या चरणी आणि यशोदामाईंच्या चरणी साष्टांग प्रणाम.  

मीना रा. जोशी