शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By

भावाने देव भेटतो : पू. श्री तराणेकर महाराज

भावाशिवाय भाजी मिळत नाही तर भावाशिवाय देव कसा भेटेल?
 
श्री तुकडोजी महराजांचे एक सुंदर पद आहे. ‘मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव। देव अशाने पावायचा नाही हो। देव बाजाराचा भाजीपाला नाही हो।’ बाजाराचा भाजीपालासुद्धा भावाशिवाय मिळत नाही मग त्याहून कितीतरी पट सूक्ष्म असलेला देव भावाशिवाय कसा भेटेल? पू. श्री तराणेकर महाराजांनी हाच विचार या बोधवचनात सांगितलेला आहे. याचा अर्थ असा, की भावाने भाजी मिळते. भावाने देव भेटतो. तथापि या भावाभावात सूक्ष्म भेद आहे. सख्ख्या भावातही थोडा भेद असतो. अगदी जुळ्या भावातसुद्धा भेद असतो. येथे पू. श्री नानामहाराजांनी भाव या शब्दावर कोटी केली आहे. एक भाव व्यहारातील आहे, एक भाव परमार्थातील आहे. दोन्ही भावात भेदही आहे आणि एकताही आहे. एकाच वेळी भेद आणि एकता हे दोन विरूद्ध गुणधर्म एकत्र कसे राहतील? पण पू. श्री नानांनी यांना मोठय़ा खुबीने एकत्र आणले आहे. बोधवचनाच्या पूर्वार्धात जो भाव सांगितला आहे तो व्यहारातील भाव. या भावाचा अर्थ मूल्य, किंमत. भाजीचा जो भाव असेल तो द्यावाच लागतो. त्याविना भाजी मिळत नाही. भाजी विक्रेतला त्याच भाजीचे जे मूल्य, जी किंमत अपेक्षित असते ती देण्यास आपण तयार असू तर तो भाजी देतो. त्याच्या अपेक्षेपेक्षा उणे मूल्य, किंमत देतो म्हटले वा तशी मागणी केली तर तो म्हणतो, ‘मला परवडत नाही दुसरीकडे कोणी देत असेल तर पाहा.’ हा झाला व्यवहारातील भाव. बोधवचनाच्या उत्तरार्धातील भाव हा मात्र परमार्थातील भाव. व्यहारातील भावाच्या अर्थाप्रमाणे याही भावाचा अर्थ मूल्य, किंमत असाच आहे. मात्र ही किंमत रूपया-पैशात नाही.

‘जन्मभरीच्या श्वासाइतके

मोजिले हरिनाम।

बाई मी विकत घेतला श्याम’


हे प्रसिद्ध आहे. त्यामुळे देव भेटावा म्हणून वेगळ प्रकारचे पण काही मूल्य द्यावेच लागते. याशिवाय परमार्थातील भाव शब्दाला आणखी एक अर्थ आहे. तो असा, भाव म्हणजे देवाच किंवा श्रीसंतांच्या चरणी असणारी मनुष्याच्या अंत:करणातील प्रेमाची, श्रद्धेची, आत्मीयतेची, विश्वासाची द्रवरूप भावना. भाव हा देवाच्या प्राप्तीचे, भेटीचे वर्म आहे.

‘भावेविण भक्ती,

भक्तीविण मुक्ती।


बळेवीण शक्ती बोलू नये.’ (श्री माउली हरिपाठ) भक्तीने देव प्राप्त होतो. भक्तीमध्ये भाव हवा. श्री दासबोधाचा विषय, अभिप्राय सांगताना श्री समर्थ सांगतात,

‘भक्तिचेनि योगे देव।

निश्चये पावती मानव।

ऐसा आहे अभिप्राव। इये ग्रंथी’


भक्ती याचा अर्थ भावयुक्त अंत:करण. ‘तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव। भावापाशी देव शीघ्र उभा’ अशी कितीतरी प्रमाणे आहेत. बाहेरची खूप साधने केली पण मनात भाव नसेल तर ती साधने भावाच्या अभावामुळे फलदायी होत नाहीत, होणार नाहीत. भाव म्हणजे परमार्थाचे, साधनेचे नाक आहे.

‘काय करावी ती बत्तीस लक्षणे।
एका नाकाविण वाया गेली’


(श्री नाथरा) काशीखंडाच्या एकेचाळीसाव्या अध्यायात मनुष्य शरीराची बत्तीस शुभ लक्षणे सांगितली आहेत. यात नाक हे सर्वश्रेष्ठ सांगितले आहे. एक नाक नाही किंवा नकटे आहे तर उर्वरित एकतीस लक्षणे असूनही का उपयोग? व्यवहारातील पदार्थ प्राप्त करून घ्यायचे असतील तर त्याचे पूर्ण मूल्य द्यावेच लागते, तसेच या परमार्थातील भावाचे आहे. देवप्राप्तीसाठी पूर्ण भावाचे मूल्य द्यावे लागते. पोहणे, प्रामाणिकपणा जसा पूर्ण हवा. मला थोडे पोहता येते, मी थोडा प्रामाणिक आहे हे चालत नाही. तसा भाव पूर्ण हवा. थोडा भाव आहे, चालत नाही.

‘भावबळे आकळे।
एर्‍हवी नाकळे’
(श्री माउली हरिपाठ) हे खरे आहे.

‘तुका म्हणे व्हावे देहासी उदार।

रखुमादेवी जोडावा’ किंवा

‘देवाच्या सख्यत्वासाठी।

पडाव्या जीवलगांच्या तुटी।

सर्वस्व अर्पावे शेवटी।

प्राण तोही वेचावा’

(श्री दासबोध) एवढय़ा टोकाची तयारी हवी. दृढभावाने ही तयारी होते. तस्मात् जसा भाजीसाठी भाव हवा, तसा देवासाठी भाव हवा. कामनांचा अभाव हवा. भोळ्या भावाचा स्वभाव हवा. समभाव हवा. नामावर दृढभाव हवा. म्हणजे देव भेटेल हे निश्चित.

अविनाश गोडबोले