मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. गुरूपौर्णिमा
Written By वेबदुनिया|

समर्थ रामदास स्वामी

MH GOVT
ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, संत जनाबाई, मुक्ताबाई, सोपानदेव यासारख्या अनेक संतांचे जन्मस्थळ आणि कर्मस्थळ असणारा महाराष्ट्र संतांची भूमी म्हणूनच ओळखला जातो. या संतांनी भक्ती मार्गाद्वारे समाजात जनजागृती निर्माण केली. संत रामदास स्वामी हेही त्यातलेच.

रामदास स्वामी यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील जांब नावाच्या गावी झाला. ते बालपणात चांगलेच खोडकर होते. गावातील लोक दररोज त्यांच्याविषयीच्या तक्रारी त्यांच्या आईजवळ घेऊन येत असत. रोजच्या तक्रारींनी त्रासलेल्या त्यांच्या आईने (राणुबाई) नारायणला (बालपणातील नाव) समजावले की, ''तू दिवसभर फक्त दुसर्‍यांच्या खोड्या काढीत असतोच त्यापेक्षा काही काम करीत जा. गंगाधर (मोठा भाऊ) बघ कुटुंबाची किती काळजी घेतो.'' या गोष्टीने नारायणच्या मनात घर केले.

दोन-तीन दिवसांनंतर हाच बालक खोडकरपणा सोडून एका खोलीत ध्यानमग्न बसला. दिवसभर नारायण न दिसल्यामुळे आईने मोठ्या मुलाकडे विचारपूस केली असता त्यानेही तो कुठेच दिसला नाही असे सांगितले. दोघांनीही त्याला शोधावयास सरूवात केली. पण तो कुठेच दिसला नाही. सायंकाळी अचानक आपल्या खोलीत ध्यानस्थ बसलेल्या नारायणाकडे आईचे लक्ष गेले. आईने त्याला काय करीत आहेस? अशी विचारणा केली. तेव्हा नारायणने उत्तर दिले, ''मी पूर्ण विश्वाची काळजी करीत आहे.'' (दास डोंगरी राहतो चिंता विश्वाची वाहतो)

या घटनेनंतर नारायणची दिनचर्या पूर्णपणे बदलली. त्यांनी समाजातील तरुण वर्गाला आरोग्य आणि सुदृढ शरीराद्वारेच राष्ट्राची उन्नती शक्य आहे हे समजाविले. व्यायाम करून सुदृढ राहण्याचा सल्ला दिला. शक्तीचा उपासक असलेल्या मारूतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. संपूर्ण भारतात त्यांनी पद-भ्रमण केले. देशात चेतना निर्माण होण्याच्या दृष्ट्रीने त्यांनी जागो-जागी मारूतीची मंदिरे स्थापिली. जागोजागी मठ बांधले.

बालपणात त्यांना साक्षात प्रभू रामाचे दर्शन झाले होते. त्यामुळे ते स्वतः:ला रामदास म्हणवून घेत असत. त्यावेळी महाराष्ट्रात शिवाजी राजांचा उदय होत होता. शिवाजी महाराज रामदास स्वामींच्या कार्याने अत्यंत प्रभावित झाले होते. रामदासांची भेट झाली तेव्हा शिवाजी महाराजांनी आपले राज्यच रामदास स्वामींच्या स्वाधीन करण्याचा मनोदय व्यक्त केला. .

त्यावेळी समर्थांनी महाराजांना सांगितले, ''हे राज्य तुमचेही नाही आणि माझेही नाही, हे राज्य परमेश्वराचे आहे.'' शिवाजी महाराज वेळोवेळी त्यांच्याशी सल्ला-मसलत करीत असत.

समर्थांनी बरेच ग्रंथ लिहिले होते. त्यात 'दासबोध' प्रमुख आहे. 'मनाचे श्लोक' द्वारे त्यांनी मनालाही संस्कारित करण्याचा राजमार्ग दाखविला.

आपल्या जीवनाचा अंतिम काळ त्यांनी सातार्‍याजवळील परळी किल्ल्यावर व्यतीत केला. हा किल्लाच पुढे सज्जनगड नावाने प्रसिद्ध झाला. तेथेच त्यांची समाधी आहे. येथे दासनवमीला दोन ते तीन लाख भाविक दर्शनासाठी येतात. दरवर्षी समर्थांचे भक्त भारताच्या विविध प्रांतातून दोन आठवड्याचा दौरा काढतात आणि त्यावेळी मिळालेल्या भिक्षेतून सज्जनगडची व्यवस्था चालते.