गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. हनुमान जयंती
Written By
Last Modified: शनिवार, 4 एप्रिल 2015 (11:12 IST)

गौडगावचा दक्षिणमुखी मारुती

भारतीय  संस्कृतीतील अनेकविध देवतांमध्ये हनुमान अथवा मारुती याचे स्थान अधिक महत्त्वाचे मानले जाते. हनुमान म्हणजे नवचैतन्य, भक्तीचा महासागर, हनुमान म्हणजे सर्वशक्तिमान अशी संकल्पना आहे.
 
प्रत्येक गावाच्या वेशीजवळ हनुमानाचे मंदिर असतेच. हनुमानाला शक्तिदेवतेचे स्थान असल्याने ‘बलप्रतिष्ठा’ कमवण्यासाठी समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात 11 ठिकाणी हनुमानाची मंदिरे स्थापन केली आणि याच धर्तीवर गौडगांव बु.।। (ता. अक्कलकोट) येथील मंदिर (मारुती) निर्माण  झाले असावे, असा लोकमानस आहे. खरे पाहता मारुतीची दक्षिणमुखी मंदिरे बोटावर मोजणइतकी आढळतात. त्यातलेच एक मंदिर अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव बु।। येथे आहे. आज हनुमान जंतीनिमित्त याबाबत माहिती घेऊ.
 
श्री क्षेत्र गौडगांव बु.।। येथील जागृत मारुती मंदिर दक्षिणमुखी असून भक्तांसाठी पर्वणीच बनत आहे. मुळातच हनुमानाला इच्छादेवतेचे स्थान असल्याने लोकांची त्यावर श्रद्धा असते. या मंदिरात येणार्‍या भाविकांची अलोट गर्दी पाहता येथील या श्रद्धास्थानाचे महत्त्व समजते. मूळ मंदिरात प्रवेश करणपूर्वी सोनमारुतीचे दर्शन घेणे क्रमप्राप्त आहे. मंदिराचे प्रवेशद्वार आकर्षक आहे. काळ कुळकुळीत घडवलेल दगडातून मंदिराच्या भिंती उभारलेल्या आहेत. विशेष म्हणजे येथील बांधकामात सिमेंटचा वापर नसल्याने मंदिर पुरातन असल्याचे समजते. 
 
आकर्षक प्रवेशद्वारावरील नक्षीकाम क्षणभर थांबायला लावते. मुख्यप्रवेशानंतर डाव्या व उजव्या बाजूला नवग्रहांचे देव्हारे आहेत. देव्हार्‍यात  महादेव, दत्तात्रय, सिद्धेश्वर, साईबाबा, विठ्ठल, राम, रामदास स्वामी, वीरभद्रेश्वर या देवतांची प्राणप्रतिष्ठा केल्याचे दिसते. मुळातच या मंदिराचे वैभव तेथे गेल्याशिवाय कळत नाही. प्रत्येकाने हे श्रद्धास्थान ‘अनुभवावे’ असेच आहे. 
 
भाविकांनी प्रचितीनंतरच गौडगांव मारुती मंदिरासाठी मदतीचे हात पुढे केले आहेत. माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी 5 लाखाचा आमदार निधी तर माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही 10 लाखाचा खासदार निधीतून मंदिर विकासासाठी हातभार लावला आहे. 
 
प्रचितीनंतर भक्तांचा ओघ खूप वाढल्याने येथील मंदिर समितीही मनोभावे भक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी झटत आहे. येथे बांधण्यात आलेले अन्नछत्र मंडळ व भक्तनिवास भक्तांच्या स्वागताला सज्ज आहे. दर मंगळवारी व शनिवारी येथे येणार्‍या भक्तांसाठी यथायोग्य स्वागत, प्रसादाची सोय केली जाते. स्थानिक व दुसर्‍या ठिकाणाचे महत्त्वाचे अधिकारी, राजकारणी, समाजसेवकांचे येथे येणे वाढले आहे. सो.म.पा. परिवहनच गाडय़ाही मंदिरापर्यंत येतात. स्थानिक तरुणांच्या रोजगाराची सोयही यामुळे झाली आहे. कमी कालावधीत नावारुपाला आलेल्या गौडगांव बु.।। येथील हनुमानावर भक्तांची श्रद्धा, लोक मान्यता व मंदिर समितीची कार्यपद्धती ह्या गोष्टी उत्साहवर्धक आहेत. 
 
श्रीकांत खानापुरे