गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

आत्मसाक्षात्कार

गोस्वामी तुलसीदास यांच्या जीवनातील ही विचित्र घटना. यातून महत्त्वाची गोष्ट प्रत्ययास येते की, भगवत् साक्षात्कारच त्यांच्या जीवनाचे एकमेव ध्येय होते. आणि ते इच्छित होते की, दुसर्‍या लोकांनी सुद्धा त्या करिताच समस्त देह, मन आणि प्राणपूर्वक प्रयत्न करावेत. त्याकाळी मुघल सम्राट जहांगीरची त्यांच्यावर खूप श्रद्धा होती. एकेदिवशी राजाने तुलसीदास यांना बरेचसे दान देण्याचे ठरविले. पण तुलसीदासांनी उत्तर दिले की, ईश्वराची भक्ती करणार्‍या भक्ताने कधीही धनसंचय करू नये. त्यामुळे भगवंताचे चिंतन करण्यास मन अयोग्य बनत जाते. दुसर्‍या एका प्रसंगी जहांगीर बादशहा म्हणाला की, ‘गोस्वामीजी, आमचे मंत्री बिरबल फार बुद्धिमान आहेत.’ संत तुलसीदासांनी लगेच उत्तर दिले की, ‘बहुमूल्य व नश्वर देह प्राप्त करूनही ते ईश्वराकरिता प्रयत्न करत नसतील तर त्यांच्यापेक्षा मोठा मूर्ख कोणी नाही. हे काही बुद्धिवंताचे लक्षण नाही. भगवत् साक्षात्कार करण्यामध्येच खरे चातुर्य आहे.’
 
महाराजा मानसिंग व त्यांचा भाऊ, अन्य राजपुत्र त्यांच्याकडे जात असत. एकदा एकाने विचारले की, ‘इतके मोठमोठे लोक त्यांच्या दर्शनास येतात. परंतु पूर्वी तर त्यांच्याकडे कुणीच येत नव्हते. त्याचे कारण काय?’ तेव्हा गोस्वामीनी उत्तर दिले की, ‘एक काळ असा होता की, तेव्हा मी भीक मागत असे. कुणीच मला महत्त्व देत नसत. पण आता दीनवत्सल रामाने मला महाराज बनवले. आता राजे महाराजे सुद्धा माझी पाद्यपूजा करतात. माझे चरण वंदन करतात. तेव्हा मी विनाराम होतो आता राम माझे सहायक आहेत.’
 
डॉ. भीमाशंकर देशपांडे