शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मे 2016 (12:42 IST)

खांबातून प्रकटले नरसिंह

आपल्या सनातन हिंदू संस्कृतीत दहा अवतारांना महत्त्व आहे. प्रत्येक अवतार सृष्टीचे रहस्य उलगडून दाखविणचा प्रयत्न करतो. त्यामुळे ती पुराणातील वांगी नसून तो एक संशोधनाचा विषय आहे आणि ज्याने संशोधन करायचे त्यानेच सर्व पुरावे गोळा केले पाहिजेत ना? न की केवळ बुद्धिभेद करण्यासाठी लोकांत भ्रम पसरविणचे काम करायचे. सनातन हिंदू संस्कृतीत सांगितलेले दशावतार हे जैवसृष्टीच्या प्रगतीचे द्योतक आहेत. या दहा अवतारात जलचर, उभयचर, वन्य जीव, अर्धविकसित म्हणजे काहीसे रानटी तर काहीसे मानवी असे अवतार सांगितले आहेत. त्यापैकीच नरसिंग किंवा नृसिंह हा अवतार. वैशाख शुद्ध त्रयोदशीयुक्त चतुर्दशी असते त्या दिवशी त्यांचा अवतार प्रकट झाला. आज 20 मे रोजी नृसिंह जयंती आहे. सर्वाना सामावून घेण्याची वृत्ती भारतीय संस्कृतीत आहे. त्यामुळे प्रागतिक आणि मागासलेले असा भेद न करता ते सर्वाना पूज्य मानतात. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू से दोन बंधू राक्षस कुळात जन्मलेले होते. राक्षस किंवा दानव कुळवासी मात्र ब्रह्म किंवा विष्णू आणि शिवशंकराचे उपासक होते. त्यांनी खूप तपश्चर्या करून यातील एकेका दैवताला प्रसन्न करून घेतले व मनोवांछित वरदान प्राप्त करून घेतले. बलवान झाले की माणसे उद्दाम होतात. त्यांना कुणीतरी चाप लावावा लागतो. ते काम परमेश्वर अवतार घेऊन करतो, अशी आमच्या संस्कृतीची भावना आहे.
 
सध्या तरी जगात काय चालले आहे, हेच ना? सद्दामला कुणी मोठे केले. तर ते अमेरिकेने आणि त्याचा खात्मा कोणी केला तर तोही अमेरिकेनेच. लादेन हे कुणी पोसलेले अपत्य तर जागतिक पातळीवर आपले वर्चस्व राखण्यासाठी अमेरिकेसारख्या देशांनीच त्याला बळ दिले. परिणामत: काय झाले तर तो भस्मासूर जेव्हा आपल्यावरच उलटू लागला तेव्हा जसा शंकरांनी विष्णू नारायणाकरवी मोहिनी अवताराच्या मदतीने त्याला संपविले तसेच अमेरिकेने पाकिस्तानात जाऊन त्याला संपविले. ही उदाहरणे देण्याचे कारण म्हणजे पूर्वीही आय आर्यावर्तात असेच दैत्यांना देवांनीच त्यातही विश्वा आणि ब्रह्मंडाचे संचलन करणार्‍या त्रिदेवांनीच या दैत्यांना बळ दिले आणि नंतर ते डोईजड होऊ लागल्यावर जगाच्या कल्याणासाठी त्यांचा अंत केला. आजही अमेरिका नावाचा देव या वाईट प्रवृत्तींना बळ देत आहे. आपली ही पुराणातील वांगी नसून वानगी आहेत, हे पटवून देण्यासाठी ही उदाहरणे दिली. आमच्या पाश्चात्याळलेल्या विद्वानांना ही मुळीच पटणार नाहीत. असो हे तर नमनाला घडाभर तेल झाले. आपण हिरणक्ष आणि हिरण्कश्यपू या बंधूंच्या वाढलेल्या ताकदीने आणि आपणच संपूर्ण जगताचे त्राते आहोत. देव आहोत. विश्वब्रह्मंडाचे चालक व पालक आहोत, आपलेच पूजन करा, असे ते सांगू लागले. त्या दोघा बंधूंतील हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा नारायणाचा भक्त झाला. तो आईच्या गर्भात असतानाच महर्षी नारदांनी त्याच्या आईला भक्तीबोध केला होता. त्यामुळे हा प्रल्हाद जन्मापासूनचा विष्णूचा परम भक्त झाला आणि नवविधा भक्तीमध्ये दंग झाला. त्याला हिरण्यकश्यपूचा विरोध होता. आपणच ब्रह्मंड पालक आहोत. त्या कुणा नारायणाचे नाव घेऊ नकोस, तुला करायचीच तर माझीच भक्ती कर, असा दम हिरण्यकश्यपूने प्रल्हादला भरला, परंतु भक्तीत दंग झालेला प्रल्हाद कुठला ऐकाला. त्याच्या मनात भक्तीचे बीज तो गर्भात असल्यापासूनच रूजले होते. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचा नानाप्रकारे छळ केला. त्याला डोंगरकडय़ावरून ढकलून दिले. उकळत तेलाच्या ढईत टाकले, परंतु भगवंतावर त्याची असीम श्रद्धा असल्याने त्याला नारायणाने प्रत्येकवेळी वाचवले. अशी आख्यायिका सांगतात. ही आख्यायिका बहुतेकांना माहीत असल्याने विस्तारभास्तव टाळतो. शेवटी हिरण्यकश्यपूने कंटाळून विचारले. प्रल्हाद तुझा भगवंत आहे तरी कुठे? या खांबात आहे का? त्यावर प्रल्हादाने बेलाशक सांगितले की नक्की आहे. त्यावर हिरण्कश्पूने तो खांब तोडला त्यावेळी त्यातून नरसिंह रूपाने प्रत्यक्ष नारायणाने अवतार घेतला असे भाविक मानतात. त्या नरसिंहाने म्हणजे अर्धे शरीर सिंहाचे व अर्धे शरीर मानवी अशा रूपातील नाराणाने हिरण्यकश्यपूचा वध केला. हिरण्यकश्पूला वरदान मिळाले होते की त्याचा वध कोणीही देव अथवा मानव करू शकणार नाही. तो दिवस किंवा रात्री मरणार नाही. या वरदानावर उपाय म्हणून भगवान नारायणांनी असा अर्ध मानवी अर्धा पाशवी अवतार घेतला. हिरण्यकश्यपूला  तिन्ही सांजेला मारले ना घरात ना बाहेर अशा उंबरठय़ावर मारले आणि आपले वचनही पूर्ण केले, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 
 
या नरसिंह अवाताराचे प्रकटीकरण वैशाख शुद्ध चतुर्दशी दिवशी झाले. नरसिंहाचे मंदिर महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात नीरा नरसिंगपूर येथे आहे. हे तीर्थक्षेत्र आहे. येथे भीमा आणि नीरा या दोन नद्यांचा संगम होतो. हे हेमाडपंथी मंदिर असून दोन्ही बाजूंनी दोन्ही नद्या येतात व समोर संगम होतो. संगम हेच जवळच्या गावाला नाव आहे. या ठिकाणीच नरसिंह अवतार प्रकट झाला अशी भाविकांची भावना आहे. आणखीही कुठे नरसिंहांची मंदिरे असतील. तेथील भाविकांची श्रद्धाही त्या ठिकाणी हा अवतार प्रकट झाला अशी असू शकते. तो वादाचा विषय नसून श्रद्धेचा भाग आहे. असो अशा नरसिंह अवताराला मनोमन प्रणाम.