बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

तुका म्हणे : चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती।

चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती।

वघ्रहि न खाती सर्प तया ।।1।।
 
विष अमृत आघात ते हित।
 
अकर्तव्य नीत होय त्यासी ।।2।।
 
दु:ख ते देईल सर्व सुख फळ।
 
होतील शीतळ अग्निज्वाळा।।3।।
 
आवडेल जीवा जीवाचिये परी।
 
सकळां अंतरी एक भाव।।4।।
 
तुका म्हणे कृपा केली नारायणें।
 
जाणिजे ते येणे अनुभवे।।5।।
तुकाराम महाराजांनी या अभंगात अंत:करणात असलेली सद्भावना आणि सर्वाप्रति सदिच्छा असेल तर मिळणार्‍या मन:शांतीचे महत्त्व सांगितले आहे. मन द्वेषरहित व शुद्ध असेल तर शत्रूही मित्र होतात. एवढेच नव्हे तर वाघ, साप इ. भयप्रद मानले जाणारे प्राणीसुद्धा स्पर्श करीत नाहीत. अंत:करणातील निर्मळतेमुळे विषारी भावसुद्धा अमृमय होतात. 
 
मानवी मनाच्या विविध अवस्था याच भावनांची उपपत्ती करतात. तुकारामांनी या अभंगात एका सुसूत्र, तार्किक व मनोविश्लेषणात्मक अशा विचारांची सुरेख मांडणी केली आहे. 
 
मनाची निर्मळता म्हणजे तरी काय? तर दुजाभाव, द्वेष, मत्सर, अमंगाल्य विचारांपासून मनाला दूर ठेवणे. निर्मळ मन म्हणजे खळखळणारा झरा, मंद वेगाने वाहणारा वारा, चंद्राचा शीतल प्रकाश उगवत र्सूकिरणांचा उबदारपणा, अशा तर्‍हेची अनुभूती होय. म्हणजे मन शुद्ध, पवित्र द्वेषविरहित ठेवले की त्याचे उपद्रवमूल्य कमी तर होतेच ते इतरांसाठी, पण स्वत:च्याही मनातील अस्वस्थता, अकारण चिंता भाव दूर होतात. 
 
जीवनातील आघातांचे दु:ख जाणवेनासे होते ते मनाच्या स्थितप्रज्ञ वृत्तीमुळे, हेच तुकोबांना सुचवाचे होते. यानिमित्ताने आपले माजी राष्ट्रपती व विश्वविख्यात शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वृत्ती व कार्यप्रवणता यातून मनातील इच्छा मूर्त स्वरूपामध्ये कशा आणता येऊ शकतात, याचे एक महत्त्वाचे सूत्र त्यांच्या वर्तनात आढळते. हृदयापासून, मनापासून एखादी इच्छा जर निर्माण झाली आणि ती जर तीव्र आणि पवित्र असेल आणि जर तिचा मनाला ध्यास लागला असेल तर तिच्यामध्ये एक प्रकारची विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते. ज्यावेळेस आपण निद्रिस्त अवस्थेत असतो, त्यावेळेस ती आसमांतात फेकली जाते. वैश्विक किरणांनी अधिक बलशाली होऊन ती इच्छा पुन्हा आपल्या जागृत मनामध्ये परतते. अशाप्रकारे जर ती वर्धित होत गेली तर ती नक्कीच आपला प्रभाव दाखवते. 
 
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मन विशुद्ध वृत्ती, द्वेषरहित ध्यास संशोधनाचा आणि श्वास ध्येयनिष्ठेशी जणू जोडलेले. अशा वृत्तीमुळे डॉ. कलाम हे अजातशत्रू शास्त्रज्ञ बनले. अपयश आणि टीका, अडचणी आणि अडथळे, संकटे आणि अयशस्विता पार करीत त्यांनी एका मोठय़ा लोकशाही राष्ट्राचा राष्ट्रपती होण्यापर्यंतचे शिखर गाठले. कारण अंत:करणापासून ध्यास. तुकाराम महाराजांना हेच अभिप्रेत असावे.
 
ज्यामध्ये केवळ दु:खच भरले आहे, अशा घटनांपासून देखील आनंद व सुख वाटावे. अग्निज्वाळा शीतल भासू लागाव्या अशा प्रकारची अनुभूती कशामुळे? तर संतश्रेष्ठ म्हणतात की, शांत आणि समानी मनोवृत्तीमुळे विशुद्ध अंत:करणाची व्यक्ती सर्वाना हवीहवीशी, आपल्या प्राणापेक्षाही प्रिय वाटते. चित्त शुद्धीतील असामान्य शक्तीचे महात्म्यच जणू तुकोबा या अभंगात व्यक्त करतात. मात्र आजच्या समाजात जात, धर्म, भाषा, प्रांतवाद उफाळून येत आहेत. दहशतवाद आणि अतिरेकी वृत्ती ही विषवल्लीसारखी फोफावत आहे. कारण मन द्वेषविरहित व शुद्ध, विचार वैश्विक कल्याण व हिताचे आणि भावना सर्वाप्रति सद्, सत् आणि सम असणार्‍यांची उणीव हेच होय. संत-साध्वी, महंत-आचार्य हे सुद्धा संशायाच्या भोवर्‍यात अडकलेले. 
 
अशा अशुद्ध, अपवित्र अमांगल्य मन असणार्‍यांच्या कोंडाळ्यात सापडलेल्या समाजाला संतश्रेष्ठ तुकारामांचे विचारच इष्ट दिशा, उचित मार्ग दाखवू शकतील. विशुद्ध अंत:करण, शुद्ध चित्त, द्वेषविरहित मन आणि स्थितप्रज्ञ विचार यांची कास धरणे म्हणजे जीवन समृद्धीची एक विलक्षण किल्ली होय. हीच तर आजच्या काळाची गरज आहे. तोच अर्थ तुकारामांच्या अभंगातून ध्वनित होतो.