गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: नाशिक , गुरूवार, 27 ऑगस्ट 2015 (11:26 IST)

पहिल्या शाही स्नानासाठी नाशिक-त्र्यंबकेश्‍वरचे घाट सज्ज

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या शाही पर्वणीची तयारी आता पूर्ण झाली असून, स्नानासाठी नाशिक व त्र्यंबकेश्‍वर येथे बांधलेले घाट सज्ज झाले आहेत. या घाटांना जोडणार्‍या सेवा आणि पोच रस्त्यांमुळे भाविकांचे घाटांवरील आगमन व निर्गमन सुकर होणार असून, भाविकांना शांततेत आणि विना व्यत्यय स्नान करता येईल, या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. 
 
सिंहस्थ कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी देश-विदेशातील लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्‍वरला येतात. पारंपरिक शाही स्नानाचे ठिकाण असलेल्या नाशिकच्या रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्‍वरच्या कुशावर्तावर यावर्षी पर्वणीच्या काळात भाविकांची गर्दी होऊ नये, म्हणून नाशिक शहरात सात आणि त्र्यंबकेश्‍वर येथे तीन घाटांवर भाविकांना स्नान करता येईल, याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. नाशकात रामकुंड, गौरी पटांगण, टाळकुटेश्‍वर, लक्ष्मीनारायण, टाकळी संगम, नांदूर आणि दसक पंचक या सात रामघाटांवर आणि त्र्यंबकेश्‍वर येथील अहिल्या घाट, आचार्य श्री श्रीचंद घाट, नवनाथ घाट या तीन घाटांवर स्नानाची व्यवस्था करण्यात आली आहे. 
 
बारा वर्षांपूर्वीच्या सिंहस्थ कुंभमेळ्यापेक्षा यंदाच्या वर्षी नाशिक व त्र्यंबकेश्‍वर येथील घाटांच्या लांबीमध्ये मोठी वाढ केली आहे. नाशिक येथील घाटांची लांबी १२९0 मीटर होती. ती यावर्षी ३९९0 मीटर इतकी, तर त्र्यंबकेश्‍वर येथील २00 मीटर अंतराचे घाट ९५0 मीटर लांबीचे करण्यात आले आहेत. घाटांच्या वाढविलेल्या लांबीचा स्नानासाठी येणार्‍या भाविकांना मोठा लाभ होणार आहे. जलसंपदा विभागाने नाशिक व त्र्यंबकेश्‍वर शहरातील घाटांच्या निर्मितीसाठी, घाट परिसर विकास, सेवा रस्ते, पोचरस्ते आणि घाटांच्या विद्युतीकरणाचा सुमारे १६९ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला. त्यातून नाशिक शहरात सुमारे २.६ किलोमीटर लांबीच्या ७ घाटांची, तर त्र्यंबकेश्‍वर येथे ८00 मीटर लांबीच्या ५ घाटांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. घाटांना समांतर रस्ते, रॅम्प, पोच रस्त्यांची सर्व कामे पूर्ण झाली असून, ते वॉटर बाउन्ड मेकॅनिक (डब्ल्यूबीएम) तंत्राने तयार केलेले आहेत. भाविकांना सहजपणे ये-जा करता यावी, दुर्घटना घडू नये, यावर विशेष भर देण्यात आला आहे. या सर्व घाटांवर भाविकांना स्नानासाठी आगमन व निर्गमनाची स्वतंत्र सुविधा निर्माण केल्यामुळे भाविकांची गर्दी रेंगाळणार नाही; शिवाय चेंगराचेंगरीसारख्या घटना देखील घडणार नाहीत, याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. भाविकांना घाटांवर येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग, घाटांना जोडणारे पोच आणि सेवा रस्ते, रॅम्प आदी सुविधांमुळे नाशिक-त्र्यंबकेश्‍वर येथे भाविकांना स्नानाचा आनंद घेणे सहज सोपे होणार आहे.