शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

पुरुषसुक्तात आहे तरी का?

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रतिदिन होणार्‍या पूजेत पुरुषसुक्त म्हटले जाते. त्याविषयी अल्पज्ञ, जाती द्वेषाने अंध लोकांनी भलतेच आक्षेप घेतले आहेत. विठ्ठलाच्या पूजेच्या वेळी पुरुषसुक्ताऐवजी तुकाराम महाराजांचे मंगलाचरण व ज्ञानदेवांचे पसादान म्हणावे, अशी त्यंची   मागणी आहे. पण ही मागणी अज्ञानातून आली आहे. 
 
पुरुषसूक्त म्हणजे काय? ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात 90 वे सूक्त पुरुषसूक्त  या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचा द्रष्टा नारायण ऋषी आहे. पुरुष ही त्याची देवता आहे. यात सोळा ऋचा आहेत. या सूक्तात पुरुषरूप परमेश्वराचे वर्णन वस्तुती आहे. पूजेत सोळा उपचार आहेत. प्रत्येक उपचाराच्या वेळी एकेक ऋचा म्हटली जाते. इतर वेदात व छांदोग्य, तैत्तिरी उपनिषदातही पुरुषसूक्त आहे. यात पुरुषरूप परमेश्वराचे वर्णन विश्वात्मक व विश्वातीत असे केले आहे. हा पुरुष सहस्त्रमस्तक, सहस्रनेत्र, सहस्त्रपाद आहे. त्याने विश्व व्यापले आहे व त्यावरही तो दहा बोटे उरला आहे. 
 
त्या पुरुषाचे मुख्य ब्राह्मण होते. बाहू क्षत्रिय होते. वैश्य उरु होते. त्याच्या पायापासून शूद्र निर्माण झाले. मनापासून चंद्र, डोळ्यापासून सूर्य, मुखापासून अग्नी व इंद्र, नाभीपासून अतंरिक्ष, मस्तकापासून स्वर्ग, पायापासून भूमी, कानापासून दिशा निर्माण झाल्या. अशा प्रकारे सर्व सृष्टी पुरुषापासून म्हणजे ईश्वरापासून निर्माण झाली. अशा प्रकारे त्यात विश्वात्मक परमेश्वराचे वर्णन आहे. 
 
आज वर्तमान काळात जे विश्व दिसते, जे पूर्वी होते व जे पुढे अस्तित्वात येणार आहे ते सर्व पुरुषरूपात आहे. हा पुरुष अमृतत्त्वाचा स्वामी आहे. सर्व चेतन अचेतन पदार्थ त्यापासून निर्माण झाले आहेत. सर्व प्रकारचे प्राणी त्याचपासून निर्माण झाले. 
 
पुरुषसूक्त म्हणजे विश्वाला व्यापून उरणार्‍या परमेश्वराचे वर्णन आहे. त्यात वादाचा मुद्दा म्हणजे पायापासून शूद्र लोक निर्माण झाले, हा आहे. शूद्र म्हणजे हीन क्षुद्र नव्हे. शुचा क्षुद्राव दुसर्‍याचे दु:ख पाहून ज्यांना दया येते, ते शूद्र, इथे रूपक आहे. ते त्या मर्यादेत घ्यायचे आहे. सीतेचे मुख चंद्रासारखे आहे. यात चंद्राचे सौंर्दय अभिप्रेत आहे. चंद्रावर डाग आहे. तो वद्य पक्षात क्षय पावतो. जड आहे, असा अर्थ काढून हा सीतेचा अपमान आहे म्हणून या वाक्यावर बंदी घाला असे कोणी म्हटले, तर तला काय म्हणावे? ग्रंथ न पाहता। देई जो दूषण। तो एक मूर्ख। असेच म्हणावे लागेल. पायापासून भूमी निर्माण झाली असेही यात म्हटले आहे. मग हा भूमीचा पर्याने भूमी कसणार्‍या शेतकर्‍यांचा  अपमान आहे कां? पुढच्या ऋचेत मुखापासून अग्नी व इंद्र निर्माण झाले, असेही म्हटले आहे. केवळ ब्राह्मणांना मुखाचे स्थान दिले असेही नाही. हे रूपक आहे. याचा अर्थ त्या मर्यादेतच केला पाहिजे. ब्राह्मण मुखाने वेदमंत्र म्हणतात. म्हणून ते मुखापासून निर्माण झाले. बाहू शरीराचे रक्षण करतात. म्हणून क्षत्रिय बाहूपासून निर्माण झाले. मांड्या शरीराला आधार देतात तसे समाजाला अर्थ निर्माण करून वैश्य   आधार देतात. म्हणून ते मांड्यापासून निर्माण झाले. पाय शरीराची सेवा करतात, गती देतात म्हणून सेवा करणारे शूद्र पापासून निर्माण  झाले, असे म्हटले आहे. यात उच्चनीय हा विचार नाही तर सारे वर्ण एकाच शरीराचे अवयव आहेत. शरीर एकात्मक आहे. हा विचार यात आहे. शिवाय शूद्र हे शूद्र नाहीतच. ते क्षत्रिय होते. असे डॉ. आंबेडकरांनी ‘हू वेअर शूद्राज’ या ग्रंथात म्हटले आहे. 
 
संतांनी पुरुषसुक्ताला मान्यता दिली आहे. 
 
पुरुषसुक्त वेदात आहे व मराठी संतांना वेदप्रामाण्य मान्य आहे. महारमंडळींना सोवळ्यात केलेला स्वयंपाक वाढणारे नाथ म्हणतात. 
 
अथवा केवळ पुरुषसूक्त। रुद्राभिषेक विष्णुसूक्त।।
 
इही मंत्री मंत्रोक्त। देवासी यथोक्त स्नान द्यावे।। (ए. भाग 27) अभ्यंग अंगमर्दन। पुरुषसुक्ते यथोक्त स्नान।। पितांबर परिधान। स्नान मंडपी जाण देवासी।। (ए. भाग 27) यथोक्त मधुपर्क विधान। अर्घ्यपाद्यादि आचमन।।
 
पुरुषसुक्त मंत्रे जण। करावे स्नान निर्मळ जळे।। (ए. भाग 27)  
नामदेव महाराज म्हणतात- 
 
वासुदेवा हृषिकेशा। माधवा मधुसूदना। करिताती स्तवना। पुरुष सुक्ते ।। नामा म्हणे ऐसे। करिता स्तवन। तोषला भगवान। क्षीरब्धीत।। वारकरी संप्रदायाला पुरुषसूक्त पठण मान्य आहे. हे संत एकनाथ व संत नामदेव यांच्या उद्गारावरून सहज स्पष्ट आहे. पुरुषसूक्त हे वारकरी संप्रदायाविरूद्ध आहे. हे म्हणणेच वारकरी संप्रदाविरूद्ध आहे हे स्पष्ट आहे. वारकरी संप्रदायाचे आद्य फडकरी नामदेवरा व भागवतोत्तम, ज्ञानेश्वर माउलीचे अवतार एकनाथ महाराज जर पुरुषसूक्त म्हणा म्हणून सांगतात तर ते म्हणू नका म्हणणारे हे कोण? 
 
हा घ्या श्रीमद् भागवतातील पुरावा
 
श्रीमद् भागवत हा वारकरी संप्रदायाचा आधार ग्रंथ आहे. त्यात दशमस्कंधात कथा आहे. ब्रह्मदेव ऋषीमुनींना घेऊन भगवंताला अवतार घ्या म्हणून विनंती करण्यास क्षीरसमुद्रावर गेले व त्यांनी भगवान विष्णूची पुरुषसुक्ताने प्रार्थना केली. तत्र गत्वा जगन्नाथं देवदेवं वृषाकपिम।
 
पुरुषं पुरुषसुक्तेन उपतस्थे समाहित:। (श्रीमद् भागवत 10.1.20) 
 
तेथे जाऊन ब्रह्मदेवांनी देवदेव, जगन्नाथ, वृषाकपी पुरुष-भगवान श्री विष्णूची पुरुषसुक्ताने स्तुती केली. पुरुषसूक्त संतांना, वारकरी संप्रदायाला, भागवत ग्रंथाला मान्य आहे, ते अमान्य करणारे कुलघ्न, असे हे शहाणे कोण?
 
सर्व भारतात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जेवढी पुरुषदेवांची मंदिरे आहेत त्यात हजारो वर्षापासून पुरुषसूक्त पठण केले जाते. इतकेच काय  महाराष्ट्र शासनाने पंढरपूर मंदिराचा जो कायदा केला आहे. त्यात अभिषेक पुरुषसुक्ताने करावा असे म्हटले आहे. तसेच मंदिरातील पूजा उत्सव परंपरा आहेत तशा चालू राहतील, असे अभिवचनच दिले आहे. पुरुषसूक्त बंद करायचे असेल तर सरकारला कायद्यात दुरूस्ती करावी लागेल. त्यासाठी विधिमंडळात ती मंजूर करून घ्यावी लागेल. 
 
श्री सुक्तात विवाद्य काही नाही
 
पंढरपुरात श्री रुक्मिणीदेवीची पूजा श्रीसुक्त करून होते. त्यात चातुर्वर्ण्य, शूद्र यांचा उल्लेखसुद्धा नाही. त्यात लक्ष्मीचे वर्णन व तिच्यापुढे मागणे-पसायदान आहे. देशात स्त्री देवतेच्या मंदिरात सर्वत्र श्रीसुक्त म्हटले जाते. त्याचा उल्लेख दूरदर्शन, वृत्तपत्रे व आक्षेपकांचे बोलणे यात ‘स्त्रीसुक्त’ म्हणून केला जात होता. ‘स्त्रीसूक्त’ का ‘श्रीसूक्त’ यातील फरकसुद्धा ज्या मूर्खाना कळत नाही. त्यांनी त्यावर आक्षेप घेणे सर्वथा योग्च नव्हे. 
 
मंगलाचरण व पसायदान म्हणतातच
 
पुरुषसुक्ताऐवजी तुकारामांचे मंगलाचरण, ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हटले जावे, अशी मागणी केली गेली. ती सुद्धा निरर्थक आहे. कारण देवाचे एक सेवाधारी हरिदास आहेत. ते दररोज मंगलाचरण, पसायदान, संतांचे अभंग म्हणतातच. त्यात तुम्ही नवीन काय सुचविले? गाभार्‍यात  मंत्र चालू असतात, बाहेर हरिदास अभंग गायन करतात. 
 
श्री पांडुरंगाचा पूजाविधी संस्कृत व मराठी असा मिश्र आहे. पहाटे दार उघडल्यावर काकडा म्हणतात तो संत कान्हा हरिदास रचित ‘जयदेवा पांडुरंगा’ हा मराठी भाषेतील आहे. आरत्या मराठीच असतात. संत नामदेवाची ‘युगे अठ्ठावीस’ रामा जनार्दनाची ‘आरती अनंतभूजा’ संत प्रल्हाद महाराज बडवे यांची ‘शरणागत तव चरणा’ या मराठी आरत्याच म्हटल्या जातात. 
 
धूपारतीचा नैवेद्य दाखविताना उद्धव चिद्घन यांची ‘जेवि बा सगुणा’ ही मराठी प्रार्थना म्हटली जाते. शेजारतीनंतर संत एकनाथ महाराज यांची ‘हरि चला मंदिरा’ ही प्रार्थना म्हणतात. शिवाय पहाट पूजा, धूपारती, शेजारती यावेळी हरिदास संतांचे अभंग म्हणत असतातच. तेव्हा पूजेच्यावेळी संतांचे अभंग म्हणावेत, या सूचनेत नवीन का नाही.
गंगा विष्णूच्या पायापासून निर्माण झाली
 
वामन अवतारात कलीने तीन पावले भूमी दान दिली. ते घेण्यासाठी  भगवान वामनाने विश्वरूप धारण केले व ते दान घेण्यासाठी पहिले पाऊल उचलले. ते सत्यलोकात गेले. तिथे ब्रह्मदेवाने त्या पावलाची पूजा केली आपल्या कमंडलूतील पाण्याची धार तया पायावर घातली. त्यातून नदी वाहू लागली ती गंगा! म्हणून गंगेला भगवत्पदी म्हणतात. गंगा जर भगवंताच्या पायापासून निर्माण होऊन सर्वात पवित्र आहे तर भगवंताच्या पायापासून निर्माण झालेले शूद्रसुद्धा पवित्रच आहेत. यात त्यांचा गौरव आहे. 
 
विठ्ठलाला रेशमी धोतर का नको?
 
विठ्ठल हे जनसामान्याचे दैवत आहे. त्याला मुंडासे धोतर, घोंगडे घाला, हेहि त्यांचे म्हणणे हासस्पद आहे. कारण तो द्वारकेचा राणा आहे. षडगुणैर्श्यसंपन्न भगवान आहे. त्याला साजेल अशी वस्त्रे हवीत. 
 
तुकाराम महाराज वर्णन करतात - तुळसी हार गळा। कांसे पितांबर।। कासे सोनसळा। पांघरे पाटोळा।।
 
चोखामेळा म्हणतात :- कासे सोनसळा। नेसला पिवळा।।
 
संतांचे शेकडो अभंग असे आहेत की ज्यात सोनेरी पीतांबर, वैजयंती माळ, मकराकार कुंडले घातलेल्या विठ्ठलाचे मनोहर दर्शन आहे. तेव्हा रेशमी वस्त्रे अलंकार पांडुरंगाला घालण्या अयोग्य काही नाही. पांडुरंग हा गरीब, सामान्य जनाचा देव आहे हे खरे! पण तो भगवान श्रीकृष्ण आहे. ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा। रविशशिकला लोपलिया।।’ अशा आमच्या देवाला शोभेल असा पोषाख हवा की नाही? म्हणून श्री विठ्ठल मंदिरात काय, सर्वच मंदिरात परंपरेने जी पूजा पद्धती, उपासना पद्धती चालू आहे. ती तशीच चालू राहिली पाहिजे. त्यावर आक्षेप घेणे हा केवळ प्रसिद्धी स्टंट आहे. परंपरागत वारकर्‍यांनी  याची दखलसुद्धा घेतलेली नाही. ज्याच्या गळ्यात माळ नाही. ज्याला हरिपाठ येत नाही. जो देहू, आळंदी, पंढरीची वारी करीत नाही, त्यांना या विषयात बोलण्याचा अधिकार नाही, एवढेच.