गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोलापूर , गुरूवार, 15 जानेवारी 2015 (12:01 IST)

मंत्रोच्चारात सिध्देश्वरांचा ननरम्य अक्षता सोहळा

‘दिटट्य़म-दिट्टय़म, सत्म-सत्म’ हे मंगलाष्टकातील मंत्रोच्चर कानावर पडताच श्री सिध्देश्वर मंदिर परिसरातील संमती कट्टय़ाजवळ जमलेल्या लाखो भाविकांच्या साक्षीने फुलांच्या व खोबर्‍यांच्या माळांनी तसेच बाशिंग बांधून आकर्षकपणे सजविलेल्या मानाच्या सातही नंदीध्वजांवर अक्षता टाकून भावपूर्ण व ननररम्य असा अक्षता सोहळा अपूर्व उत्साहात व शांततेत संपन्न झाला.
 
नंदीध्वजांच्या अक्षता सोहळ्याने लाखाहून अधिक भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. संमती कट्टय़ाजवळ लोटलेल्या भाविकांच्या भक्तीला  उधाण आले होते. ‘बोला, बोला एकदा भक्तलिंग बोला हर्र~~~बोला हर्र~~~~, सिध्देश्वर महाराज की जयच्या जघोषाने सारा आसमंत दुमदुमून गेला होता. शिवोगी श्री सिध्देश्वर महाराजांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदीध्वजांच्या अक्षता सोहळ्यास महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकातून आलेल्या भाविकांची मोठय़ा प्रमाणात असलेली उपस्थिती हे या यात्रेचे वैशिष्टय़ ठरले.
 
मंगळवारी, श्री सिध्देश्वरांनी सोलापूरच्या पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिंगांना नंदीध्वज मिरवणुकीने तैलाभिषेक घालून रात्री उशिरा मानाचे सातही नंदीध्वज उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाडय़ात विसावले. बुधवारी सकाळी मानाच्या पहिल्या नंदीध्वजाची पूजा राजशेखर हिरेहब्बू यांच्या कुटुंबीयांनी केली. तर दुसर्‍या नंदीध्वजाची पूजा सुधीर देशमुख व राजशेखर देशमुख यच्या हस्ते भक्तिपूर्ण वातावरणात करण्यात आली. त्यानंतर सकाळी पावणेआठ वाजता हिरेहब्बू यांच्या वाडय़ातून विविधरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविलेले सातही नंदीध्वज अक्षता सोहळ्यासाठी सवाद्य मिरवणुकीने मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाले. समतेचा पंचार्चाचा ध्वज, पालखी, सनई चौघडा पथक आणि त्यापाठोपाठ मानाचे सात नंदीध्वज मोठय़ा डौलाने मार्गक्रमण करीत होते. ‘एकदा भक्तिलिंग हर्र~~~बोला हर्र~~~~च्या   जघोषाने मिरवणुकीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पांढराशुभ्र पोशाख असलेला बाराबंदी, धोतर व कमानकंठी परिधान करुन शेकडो भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
 
हिरेहब्बू मठ, केळकर वकिलांचे जुने घर, दाते गणपती, हाजीमाई चौक, माणिक चौक, विजापूर वेस, पंचकट्टा, सिध्देश्वर प्रशाला, रिपन हॉल या मार्गावरून दुपारी 1.15 वाजता नंदीध्वज सिध्देश्वर मंदिर परिसरातील संमती कट्टय़ाजवळ आले. यावेळी सिध्दरामेश्वरांचा अखंड जयघोष सुरु झाला. श्री सिध्देश्वरांची चांदीची मूर्ती असलेल पालखीवरही भाविकांनी अक्षता टाकल्या.
 
अक्षता सोहळच्या अगोदर सिध्देश्वर तलावातील पाण्याने सुगड (मडकी) धुवून घेण्यात आली. गंगापूजनानंतर या मडक्यांमध्ये दही, चंदन, हळदी-कुंकू, बोरे व अन्य पदार्थ ठेवण्यात आले. श्री सिध्दरामेश्वरांच्या हातातील योग्यदंडाच्या साक्षीने हिरेहब्बू व देशमुख यांनी संमती कट्टय़ाजवळच सुगडी पूजन केले. त्यानंतर कुंभार यांना विडा देण्यात आला. संमती वाचनासाठी मानकरी तम्मा शेटे यांनी संमती वाचनाचे पुस्तक (मंगलाष्टक) हिरेहब्बू यांच्याकडे स्वाधीन केले. त्यानंतर संमती पुस्तकाला गंध व दही लावून राजशेखर हिरेहब्बू यांनी पूजा केली. हा विधी झाल्यानंतर संमती पुस्तक हिरेहब्बू यांनी देशमुखांकडे दिले व देशमुखांनी संमती पुस्तक तम्मा शेटे यच्याकडे सुपुर्द केले. श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीच्यावतीने मानकरी शिवानंद हिरेहब्बू, राजशेखर हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू व शेटे यांचा सत्कार करण्यात आला.
 
दुपारी पावणेदोन वाजता डोक्यावर लाल रंगाची पगडी घातलेल्या तम्मा शेटे यांनी अक्षता सोहळ्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या संमती वाचनाला (मंगलाष्टक) सुरुवात केली. मंगलाष्टकातील दिट्टय़म-दिट्टय़म, सत्यम-सत्यम या मंत्रोच्चरानंतर भाविकांचे हात उंचावले आणि नंदीध्वजांवर अक्षता टाकून भाविक धन्य झाले. दहा मिनिटे संमतीवाचन झाल्यानंतर भाविकांनी श्री सिध्दरामेश्वरांचा जयजयकार केला. मंदिर परिसरात विवाह सोहळ्याच्या निमित्ताने जमलेल्या हजारो भाविकांनी एकमेकांना भेटून मकरसंक्रांतीच शुभेच्छा दिल्या. या विवाह सोहळ्याचे वेदमूर्ती बसवराजशास्त्री हिरेमठ, सुभाष स्वामी व अमृत कोनापुरे यांनी रसाळ वाणीतून सूत्रसंचालन केले.
 
अक्षता सोहळा संपन्न झाल्यानंतर मानाचे सातही नंदीध्वज अमृतलिंगाजवळ आले. अमृतलिंगाची पंचामृत अभिषेकाने विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर शेटे व अन्य मानकर्‍यांकडे हिरेहब्बू यांनी विडा दिला. त्यानंतर सिध्देश्वर महाराजांच्या गदगीस अभिषेक करून हिरेहब्बू यांनी विधिवत पूजा केली. याठिकाणी शेटे यांना विडय़ाचा मान देण्यात आला. पूजेनंतर नंदीध्वज 68 लिंगांना प्रदक्षिणा घालण्यासाठी मार्गस्थ झाले. आणि दुसर्‍या दिवशी सकाळी हिरेहब्बू यांच्या मठाकडे परतले.