गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2016 (13:56 IST)

रतिराजाचे दान

आपल्या भारत देशाची परंपरा ही दान देण्याच्या बाबतीत श्रेष्ठ व संपन्न आहे. काहीही दान न देता जन्म काढणे हे अधर्मीपणाचे मानले जाते. कारण सत्य, तप, पावित्र्य आणि दान हे धर्माचे चार निकष आहेत, तसे तर ते आधारस्तंभ म्हणता येतील. परंतु आजच्या युगात दातृत्व गुणाची महती कमी होत चाललेली आहे. म्हणजे नि:स्पृह, निरिच्छ, निरपेक्ष दानाचे महत्त्व जाणणारे दुर्मीळ होत आहेत. दानाचे विस्मरण व घेण्याचे स्मरण ही नीती बोकाळत आहे. वास्तविक पाहता स्नानाने तनाची शुद्धी होते, धनाने मनाची शुद्धी होते तर दानाने धनाची शुद्धी होते. हल्ली याचेच विस्मरण होत असून बहुसंख्य लोक दान करणपेक्षा स्वत:च्या पदरात मनासारखे दान (धन, लाभ) कसे पडेल, याच्याच प्रयत्नात असतात.
 
‘सर्वाशी सुख लाभावे..’ अशी प्रार्थना करणे चांगलेच पण सर्वजणांची दु:खे मला यावीत, म्हणजे सर्वाना सुख मिळेल ही कामना अधिक परोपकारी आणि हितकारी होय. रतिदेवांनी सुखदानाची याचना केली. आपल्याला जे जे चांगले मिळेल ते ते दुसर्‍यांना देणार्‍या या रतिदेवांना साहजिकच स्वर्गात स्थान मिळाले. रतिदेवांची दानवृत्ती श्रेष्ठच.
 
छोटय़ा छोटय़ा गोष्टी उपलब्ध करून देणार्‍या रतिदेवांना त्यांच्या या दानवृत्तीमुळे ऋषिमुनींनी इच्छापूर्तीचा वर दिला. त्यातच गुरू वसिष्ठांनी त्यांना वर दिल्यामुळे स्वर्गात स्थान मिळाले. मात्र रतिदेवांनी वसिष्ठांना काय दिले? रतिदेवांनी वसिष्ठांना नेमके हवे त्यावेळी फक्त थंडगार पाणी दिले. त्याबद्दल वसिष्ठांनी प्रसन्न होऊन रतिदेवांना वर देऊन स्वर्गात स्थान दिले.
 
म्हणून दान हे फार मोठे, किमती मौल्वान अशा स्वरूपाचे करावे असे नाही तर ते गरजूंना जे हवे ते देण्यातून दानाचे पुण्य प्राप्त होऊ शकते. अनेक संत आपल्या भक्तांची दुखणी, रोग स्वत: घेत व भक्तांना व्याधीमुक्त करीत. रतिदेवांचा दानधर्म हा अफाट व अगदी कर्णापेक्षा जास्त असा नव्हता. त्यांची विचारसरणी वेगळी, वैशिष्टय़पूर्ण व सुंदर होती. रतिदेव हे ऋषिमुनींना कंदमुळे खायला देत. त्यांच्या पूजेसाठी पाने-फुले नेऊन देत. प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे दान देण्याची आणि त्यासाठी कष्ट व त्याग करण्याची रतिदेवांची पद्धत ही वैशिष्टय़पूर्ण होती.
 
राजा रतिदेवांची दानाची भूमिका सांगणारा श्लोक श्रीमद् भागवताच नवव्या स्कंधात व्यासदेवांनी लिहिला आहे. त्याचा अर्थ असा की,
 
‘हे ईश्वरा, अष्टमहासिद्धींनीयुक्त अशी उत्तम गती मला नको. मला मोक्षही नको. माझी एकच इच्छा आहे की, माझा वास सर्व प्राणिमात्रांच्या  हृदयी असावा जेणेकरून त्या सर्वाचे दु:ख मला झेलता येईल व त्यांना दु:ख भोगायची पाळीच येणार नाही.’ ही महान इच्छा रतिदेवांची. किती निरपेक्ष, निर्मोही अशी वृत्ती या रतिराजांची. या वृत्तीची आजच्या काळात फार गरज आहे. दुसर्‍याचे दु:ख वाटून घेण्याची, त्यामध्ये  मनापासून सहभागी होण्याची माणुसकी या तंत्र व यंत्रयुगामध्ये फार आवश्क आहे. कारण माणूस पैशाचा पाठलाग करीत असल्याने जणू यंत्र बनत चालला आहे. अशा युगात मानवता जोपासण्यासाठी बुद्धी आणि वृत्ती ही काळाची गरज आहे. ज्याची शिकवण रतिराजांच्या   वर्तनातून मिळू शकते. 
 
राजा रतिदेवांनी ऐन उन्हाळ्याच्या काहिलीत थंड पाणी वसिष्ठ ऋषींना दिले म्हणजे जणू स्वर्गसुख दिले. रतिदेवांची ही भूमिका जणू सर्वश्रेष्ठच. सर्वाना सुख देणे आणि सर्व प्राणिमात्रांची दु:खे माझ्या वाटय़ाला येवोत की, ज्यामुळे कोणालाच दु:ख होणार नाही, अशी इच्छा कितीतरी मौल्यवान व परोपकारी.
 
आपण दानधर्माच्या बाबतीत अगदी बलिराजा, कर्ण यच्यासारखे वागू शकलो नाही तरी रतिराजासारखे उन्हाच्या कडाक्यात कुणाला तरी तांबभर पाणी देऊ शकतो. तहानलेल्यांची तहान भागविणे हेसुद्धा दातृत्व व तेही मोलाचे होय. भुकेलेल्यांना स्वादिष्ट अन्न देता आले नाही तरी भाजी-भाकरी, भात-आमटीसुद्धा कितीतरी परोपकारी कृत्य केल्यासारखीच होय. उन्हाळ्यात पाणपोईची सेवा देणे, अंधास रस्ता ओलांडण्यास मदत करणे, मतिमंद अपंगांच्या स्वंसेवी संस्थांना आर्थिक साहाय्य करणे, महापूर-भूकंप अशासारख्या नैसर्गिक संकटांच्यावेळी आपद्ग्रस्तांना जुने कपडे, धान्य, भांडी, पांघरूण वगैरेंची मदत कितीतरी उपयुक्त. 
 
गरजेनुसार दान देणे हे रतिराजांच्या दातृत्वाचे वैशिष्टय़ आणि ती शिकवण, संस्कार अनुकरणीच म्हणावे लागतील.