बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

शाहिरी डंका

‍ डॉ.प्रकाश खांडगे

MHNEWS
'पवाडा तुवा केला गंधर्वासी` असा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये आहे. याचा अर्थ असा की अकराव्या बाराव्या शतकात पोवाडा हा शब्द रूढ होता आणि कीर्तीगान किंवा यशोगान याआधी तो वापरला जात असे. छत्रपती शिवरायांच्या काळात अगीनदास, तुलसीदास यांसारखे गोंधळी शाहीर म्हणून कवने करीत असत. छत्रपती शिवरायांची कवने या शाहिरांनी केली होती. उत्तर पेशवाईत राम जोशी, प्रभाकर, सगन भाऊ, होनाजी बाळा, अनंत फंदी असे अनेक शाहीर होऊन गेले. यांच्या कवनांचे स्वरूप हे केवळ कीर्तीगान अथवा यशोगान असे नव्हते, तर त्यांनी शृंगारिक रचनाही केल्या. स्वातंत्र्याच्या चळवळीत शाहिरांनी हाती डफ घेऊन जनजागरण केले. लहरी हैदर, सीद्राम बसप्पा मुचाटे, कुंडलचे शाहीर शंकरराव निकम, शाहीर पुंडलिक करांदे, शाहीर नानिवडेकर, शाहीर खाडिलकर अशा अनेक मान्यवर शाहिरांचा उल्लेख यासंदर्भात करावा लागेल. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर, शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर वसंत बापट, शाहीर आत्माराम पाटील, चंदू भरडकर अशा अनेक शाहिरांनी गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती असा जयजयकार केला.

मनोरंजनाची माध्यमे बदलली, समाजप्रबोधनाची साधने बदलली आणि शाहिरी कालौघात नष्ट होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. समाजाचे मंडळीकरण थांबले की काय अशी अवस्था निर्माण झाली. या अवस्थेत शाहिरीची मशाल तेवती ठेवणार्‍या शाहिरांमध्ये शाहीर देवानंद माळी, शाहीर आदिनाथ विभुते, शाहीर सुरेश जाधव आदी शाहिरांचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागेल.
तान्हाजी वीर चालला, सूर्याजीबंधू संगतीला

शेलार मामा होता जोडीला
हे कुढे निघाले म्हना
कोंडाणा किल्ला घेण्याला, किल्ला घेण्याला
जीर हा जी जी

तान्हाजी किल्ले कोंडाण्याच्या पायथ्याशी आलेला आहे. कोळीवाडय़ात येताच तानाजीने गोंधळय़ाचा वेश धारण केलेला आहे. बाराबंदी, हातामध्ये पेटलेला पोत. बंधुरायाच्या गळय़ात संबळ हे दोघेही बंधु गोंधळी म्हणून कोळीवाडय़ात येताच दोन मुलं गोटय़ा खेळात होती. ते पळत सुटली खंडोजी नाईकांकडे आले. खंडोजी नाईकाला म्हणत आहेत. 'नाईक ओ नाईक, गोंधळी आलेत गोंधळी संबंळम बंबळम, संबळम बंबळम वाजवत आहे.

''त..त..त..... तानाजी ये, वीर ये, हा गड तुला दिला. तू किल्लेदार. मी तुझा सेवक. चल दिल्लीच्या दरबारात जाऊ मुजरे करू.`` असं म्हणताच तानाजीनं शिवाजीराजांना सोडलं ? अन तो काय मोगलांना मिळाला? पचकन तानाजी थुंकला अन म्हणाला, ''अरे कुत्र्याला तुकडा टाकल्यानंतर कुत्रा गोंडा घोळतो. ती अवलाद माझी नाही. अवस्था झेंडय़ांचा षिपाई आहे मी. `` असं म्हणताच उदयभानाने तानाजीच्या अंगावर वार केला.

खवळून केलं वाराला
उदयभानाच्या जबर हल्ल्याला
तानाजीच्या तोडलं ढालीला जीर हा जी जी जी...
कमरेच्या काढून शेल्याला होतो वाराला
उदयभानच्या जबर हल्ल्याला
तानाजीचा हात उडविला
हात उडविला जीर हा जी जी जी......
इंच इंच जखमा अंगाला
रक्ताने वीर नाहलेला
वरनीवार उदयभानाच्या

शाहीर सुरेश जाधव वरील तानाजीचा पोवाडा सादर करत असता औरंगाबादच्या शाहीर सुरेश जाधव यांनी अनेक राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील महोत्सवांमधून भाग घेतला असून त्यांचे गुरू बाबासाहेब देशमुख हे आहेत.