गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

सप्तपदीपासून.. सात जन्म

‘शुभमंगल सावधान’ आणि अक्षतांचा मारा, टाळ, बँडचा आवाज, कुणाचा तरी सुटकेचा श्वास आणि कुणाच तरी अटकेचा क्षण अगदी टिपण्यासारखा. ‘सावधान’ हा शब्द कोणत्या लौकिक अर्थाने रूढ झाला माहिती नाही पण बर्‍याचशा गोष्टींना सावध करण्यासाठीच हा शब्द असावा असं वाटतं. 
 
विवाह म्हणजे दोन कुटुंबाचा, दोन मनांचा हा मेळ. मुलाचा पती या नवीन नात्यात तर मुलीचा पत्नी या नवीन नात्यात प्रवेश आणि सुरूवात होते ती सप्तपदीने, नंतर जन्मभर व पुन्हा सात जन्म, केवढा मोठा प्रवास. 
 
फार वर्षापूर्वी खूप कमी वयात लग्न व्हायची. स्वत:चे स्वतंत्र विचार आणि मतं तार होण्यापूर्वीच एका विशिष्ट पद्धतीतून विचार करण्याची  सवय वाढत जायची आणि ती सवय आयुष्यभर टिकायची. आता टिकणं हा शब्द मी फार आवर्जून लिहिते कारण सरळसुलभ टिकणं आणि ती ताणून तुटू नये म्हणून टिकवणं या दोन्ही शब्दात कमालीचं अंतर आहे. एकात सहजता तर दुसर्‍यात कमालीची कसरत, दमछाक आहे. 
 
या सप्तपदीतील दोन्ही पावलं सारख गतीनं पळणारी असतील तर सातत्यानं सुखी सोबत मिळते तर कधी कधी गती जुळत नाही. दोघांपैकी एकाच कक्षा रूंदावत जातात, दिशा धुंदावत जातात अन् दुसरा चौकटीच्या आतच घुटमळत राहतो. त्याला ना पुढे जाण्यात स्वारस्य असतं अन् मागं राहण्यात समाधान आणि सुरू होते विचारांची ओढाताण. पुरुषाला लागतं एक गाजवता येण्याचं ठिकाण तर स्त्रीला लागतं एक आवरण, स्वत:ला जपणसाठी, आणि यातूनच संसाराचा जन्म होतो. प्रत्येक संसार हा मनोमिलनातून व्हायला हवा आणि तसा झाला तर अंगणात सतत आनंद डोलत राहतो पण आज असं होतं असं सांगता येत नाही. म्हणून चाललेली असते या सप्तपदींची सोबत चालणची तडजोड तर कधी पायात पाय अडकवण्याची शर्यत. एक विनोद व्हॉटस्अँप वरचा शेअर करावा वाटतो, तो असा- नवीन लग्न झालेला पती आपल्या पत्नीचा फोन नंबर सेव्ह करतो. ‘माय लाईफ’
 
एक वर्षानंतर या नावाने ‘माय  वाईफ’ 
 
दोन वर्षानंतर ‘होम’ पाच वर्षानंतर ‘हिटलर’ 
 
दहा वर्षानंतर नाव देतो ‘राँग नंबर’ 
 
असे कितीतरी विनोद दिवसातून शेअर होत असतील. आपण याला विनोद म्हणून ‘टेक इट इजी होतो. तरी यातून एक बदलत्या नात्याचं  सामाजिक प्रतिबिंब बघायला मिळत आहे, हे लक्षात यायलाच हवं. कारण म्हणतात नं, ‘विनोदाचा जन्म वेदनेतून होतो’ तो असा. 
 
प्रत्येक क्षण, नंतर दिवस, नंतर वर्ष या सर्वातून चालणारी सप्तपदी प्रेमाने परिपक्व होत चालत राहिली तरच सात जन्मापर्यंत पोहोचेल, त्यासाठी दोघांचा संयम, समजूतदारपणा सारखाच वाढत जायला हवा, नाहीतर हे दोन चुंबकाचे असे दोन ध्रुव होतात की ते एकमेकांना जोडलेले तर असतात पण दोन दिशेला. आणि जिथे नाईलाज शब्द येतो ते नातं अतिशय दयनीय, इच्छा नसताना, मन नसताना फक्त  शरीर यंत्रवत चालवावं लागतं हा नाईलाज फार भयंकर रूप घेतो. आज आजूबाजूला आपल्याला सातत्यानं नाईलाजच अधिक प्रमाणात दिसतो. 
 
स्वाती कराळे