गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

साईंचे स्थान अढळ!

गेल्या शेकडो वर्षात महाराष्ट्राच्या डोंगराळ प्रदेशात अनेक साधुसंत निर्माण झाले, काही काळ लोकादराच्या कळसावर चढले आणि अखेर लोकनिंदेच्या गर्तेत कोसळून नामशेषही झाले. याउलट लोककल्याण आणि सर्वधर्म समभावाचे ब्रीद घेऊन साईबाबांनी अनेक वर्षे शिर्डीत राहून जनतेची सेवा केली. माधुकरी मागून जनतेला सात्त्विकता आणि सहिष्णुतेची शिकवण दिली. व्यक्तीमधील प्रेरक शक्ती म्हणजेच श्रद्धा व सबुरी, म्हणजेच धीर धरणे. त्यालाही धैर्य लागते.

आपण श्रद्धेने जरी काही मागितले तरी योग्य वेळ आल्याशिवाय कोणतीही गोष्ट घडत नसते. कोणत्याही गोष्टीसाठी प्रतिक्षा ही करावीच लागते. म्हणून देवावर अगर गुरूवर संपूर्ण विश्वास ठेवून आपली विहीत कर्मे करीत राहणे हा खरा भक्तीचा मार्ग आहे. श्रद्धा, सेवा आणि सबुरी हा साईबाबांचा महत्त्वाचा सुवर्ण संदेश आहे. तो त्यांनी  जगाला दिला. द्रवपाशी देव नाही व द्रव्यलोभला मोक्ष नाही. एकटे कधी खाऊ नका आणि गोरगरीब, अंध, अपंग, रोगी, महारोगंना अन्नदान, वस्त्रदान करा, असे ते आवर्जून सांगत. लोकांचे अज्ञान, दारिद्रय़ नि हालअपेष्टांचा केरकचरा झाडीत साईबाबा या सगळ्यांमध्ये आहेत आणि सगळंपासून दूर आहेत. अगदी एकटे कारण ते ना कुणाचे गुरू, ना त्यांना कुणी शिष्य. साईबाबांचे जन्मस्थान व त्यांच्या मातापित्यांविषयी निश्चित माहिती कोणालाच नाही. प्रत्यक्ष साईबाबा शिर्डीत वावरत असतांना कोणी त्यांच्याबद्दल विचारणा केली असता ‘मी परमेश्वराचा सेवक’एवढेच उत्तर ते देत असत. त्याशिवाय त्यांच्या अवतार कार्याचा कालावधीही प्रदीर्घ आहे. गोविंद रघुनाथ ऊर्फ अण्णासाहेब दाभोळकर यांनी साईचरित्र हा गुरू चरित्राच धर्तीवरील ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. दाभोळकर हे मॅजिस्ट्रेट होते व ते निस्सीङ्क साईभक्त होते. त्यांनी साईबाबांच्या सहवासात अनेक वर्षे वास्तव्य केले असूनही त्यांनाही श्री बाबांच्या जन्माबद्दल काहीच माहिती नव्हती. विविध दत्तग्रंथ तसेच श्री साईचरित्रांतील दाखलवरून श्री साईबाबा हे दत्ताचे अवतार होते असे प्रतीत होते. नृसिंहसरस्वती, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज, मणिकप्रभू आणि साईबाबा हे साक्षात्कारी व जागृत दत्त अवतारी समजले जातात. एका दुर्मीळ, जुन्या दस्तावरून श्री बाबा वयाच्या 12 ते 15 वर्षाच्या दरम्यान शिर्डीत आले. ते सुरवातीला निंब वृक्षाखाली मौन धारण करून बसत. दिवसरात्र भोजन न करता त्यांनी तेरा वर्षे कठोर तप केल्याचे साईचरित्रातील दाखलंवरून समजते. दुसरे दत्त अवतार श्री माणिक प्रभू यच्याशी साईबाबांचा संबंध आल्याचेही दाखले आहेत. एकदा अवतारी पुरूष श्री माणिकप्रभू यांच्या भक्त दरबारात एक फकीर गेले होते. तेथे जाऊन त्यांनी लोटा पुढे करून भिक्षा ङ्कागितली आणि माणिकप्रभूंनी त्या  लोटय़ात दोन खारका आणि गुलाबाची फुले टाकली आणि माणिकप्रभू म्हणाले,‘साई ये लेव’आणि हा हा म्हणता तो फकीर अदृश्य झाला. हा फकीर दुसरा तिसरा कोणी नसून ते साक्षात साईबाबा होते. ‘साई’या शब्दाचा हिंदीतील अर्थ साधु-संत असा होतो. त्यामुळेच या फकिराला पुढे साई हे नाव पडले.
 
श्री साई म्हणजे एक दुर्मीळ व्यक्तिमत्त्व व एकात्मक समाजाचे स्वप्न पाहणारे, जातीभेद नष्ट करण्यासाठी सतत प्रयत्न करणारे, वर्तमान, भूत, भविष्य जाणणारे, सर्व प्राणीमात्रांच्या ठायी एकच मूलभूत शक्ती मानणारे लोकोत्तर संत होते. उभ्या आयुष्यात संन्यासी, फकिरी पत्करणार्‍या व भिक्षा मागून उपजीविका करणार्‍या साईबाबांनी आपण संत, देव असल्याचे अजिबात म्हटलेले नाही. सुरुवातीला शिर्डीतील लोकांनी त्यांना वेडसर समजून अतोनात त्रास दिला. दिवसगतीने त्यांच्या एकेक अद्भुत चमत्कारांनी अवतारी पुरूष असल्याचे लोकांच्या लक्षात येऊ लागले आणि इथूनच आपल्या विविध प्रश्नांनी गांजलेले, ग्रासलेले लोक देशभरातून साईबाबांना भेटण्यासाठी येऊ लागले. 1910 पासून खर्‍या अर्थानी लोकांची गर्दी साईबाबांभोवती जमू लागली. लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे आदी दिग्गज नेते मंडळी शिर्डीत येऊन साईबाबांना भेटून गेली.
 
अशा स्थितीत छत्तीसगढ येथे झालेल्या हिंदू धर्म संसदेत साईबाबा संत नाहीत आणि गुरूही नाहीत. त्यांची पूजाही करू नये, अशा आशाचे वक्तव्य द्वारकापीठाचे शंकरार्चा स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले होते. साईबाबांवरून निर्माण झालेला वाद वास्तवात निरर्थक आहे. जो प्रश्न श्रद्धेचा आहे, तो वादाचा विषय होणे चुकीचे आहे. हा वाद धर्मसंसदेने शंभर वर्षानंतर उकरून काढावा एकूण अनुचित व अकारण आहे. संत पदाला पोहोचण्यासाठी अमूक जातीधर्माचे असणे जरूरीचे नाही. संत, देव कोणाला मानावे, या विषीची मार्गदर्शक तत्त्वे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगातून स्पष्ट होतात. रंजल्या -गांजलेल्यांना जवळ करण्याची व त्यांच्यात देवत्व पाहण्याची शिकवण संत परंपरेत आहे. या महान परंपरेतून अनाथ, अपंग आणि आजाराने जर्जर झालेल्या जनतेची सेवा शुश्रूषा, भुकेल्यांना अन्न, तान्हेलेल्यांना  पाणी, पशुपक्ष्यांना अभय, दु:खी निराशांना हिम्मत आदी परमार्थाची शिकवण साईबाबांनी दिली. मुळात साईबाबांसारख्या थोर व्यक्तीला देव मानले तर बिघडले कुठे? त्यांची मंदिरे उभारू नयेत व पूजा करू नये, अशा अर्थाच्या ठरावाला काय अर्थ आहे? या देशात आध्यात्मिक स्वातंत्र्य आहेच. कोणी कोणाला गुरू मानावे, कोणी कोणाची पूजा करावी, ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. केवळ ठराव करून कोणाच्या पूजा-अर्चना बंद होणार नाहीत. कोणाच्या श्रद्धेवर घाव घालण्याचा कोणाला अधिकार नाही. अखेर साईबाबांना कोणी देव म्हणोत अथवा न म्हणोत, ते अखिल जनतेच्या हृदयात प्रेमादराचे उत्युच्च नि अढळपद पटकावून बसले आहेत. श्री बाबांची आरती चालू झाली रे झाली, अशी हाक कानी येताच, जनतेचा ‘गंगौघ’तिकडे शिर्डीकडे धावत जातो. ही श्री साईबाबांच्या आध्यात्मिक शक्तीची खासियत आहे. 
 
के. एस. बांदेकर