शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By वेबदुनिया|

‘होळी’ करा पण झाडांची नाही!

भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो. जगभरात पर्यावरण बचावासाठी प्रयत्न सुरू असतानाच होळीसाठी झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते. विशेष म्हणजे यंदा जागतिक वनदिनीच होळी साजरी होणार आहे. एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिला जात असताना जागतिक वनदिनीच हजारो वृक्षांची कत्तल होणार आहे.

२१ मार्च जगभरात `वन दिवस` म्हणून साजरा केला जातो. गेल्या ३८ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. १९७१ साली युरोपीयन शेतीविषयक संघाच्या २३ व्या सर्वसाधारण सभेत जागतिक वन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यावरणाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडांचे काय महत्त्व आहे याची माहिती मिळावी असा उद्देश समोर ठेवून हा दिवस साजरा केला जात आहे.

पूर्वी वनदिवस साजरा करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे होती. २००६-०७ साली हे कार्य सामाजिक वनीकरण विभागाकडे सोपविण्यात आले. त्यानुसार राज्यात ८,८८४ इको क्लब स्थापण्यात आले. शासकीय पातळीवर पर्यावरण बचावासाठी एवढे प्रयत्न होत असताना जागतिक वनदिनीच हजारों झाडांची कत्तल होण्याची नामुष्की यंदा आली आहे.
होळीसाठी झाडे तोडण्याऐवजी केरकचरा व अन्य टाकाऊ पदार्थांची होळी करावी असे आवाहन पर्यावरण प्रेमी करित आहेत. होळीच्या निमित्ताने पर्यावरणाची माहिती देण्याचे काम स्वयंसेवकांनी करावे तसेच दुर्गुणांच्या पुतळाची प्रतिकात्मक होळी करून हा सण साजरा करावा, असेही सांगितले जात आहे. जागतिक वनदिनी वनाचीच होळी होईल असे कोणतेही कृत्य होऊ नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.