शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By वेबदुनिया|

आदिवासींचा दीपोत्सव म्हणजे होळी

aadwasi holi
सातपुड्याच्या पर्वतरांगेत वास्तव्य करणारे आदिवासी बांधवांचा 'होळी' सण हा दीपोत्सवापेक्षा कमी नसतो. होळीची चाहूल लागताच आदिवादींना भोगंर्‍या बाजाराचे वेध लागत असतात. आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये शेकडो वर्षांपासून होळीचा सणाला भोंगर्‍या बाजाराची परंपरा चालत आली आहे. पंधरा ते वीस दिवस चालणार्‍या भोंगर्‍या बाजारात आदिवासी बांधवांचे जीवन संस्कृती आपल्याला अनुभवास येते असते. सातपुड्याच्या पर्वतरांगेत पावरा, पाडवी, गावीत, भिल्ल अशा प्रमुख आदिवासी जमाती आढळतात. या जमातीत दिवाळी आणि होळी या सणांना असाधारण असे महत्त्व आहे.

सातपुड्यात असलेल्या आदिवासी पाड्यात विविध ठिकाणी पाच दिवसाचा होळी सण साजरा केला जातो. पाच- सहा पाडे मिळून एकच होळी पेटविली जाते. पारंपारिक पध्दतीने आदिवासीबांधव सपत्नीक होळीचे पुजन करतात. होळी प्रज्वलीत झाल्यानंतर आदिवासी महिला- पुरूष मोहाच्या फूलांची दारू (कच्ची दारू) सेवन करून ढोल वाजवून होळीभोवती नाचगाणे करतात. काही लोक सोंगे धारण करतात. काही लोक नवस फेडण्यासाठीही सोंगे धारण करून होळीला नैवेद्य दाखवितात. सोंगाचा नवस हा पाच वर्ष करावा लागतो, त्याला मधेच खंड पाडून चालत नाही. नवस मधेच बंद पाडला तर देवाचा कोप होतो, अशी‍ ही समजूत आदिवासी बांधवांमध्ये आहे.

होळी सणासाठी फाग (देणगी) मागण्याची पध्दत आहे. आदिवासी महिला- पुरुष आदिवासी पाड्यामध्ये घरोघरी जाऊन फाग मागत असतात. देणगी गोळा करून पाच ते सहा पाडे मिळून होळीचा सण साजरा केला जातो.

'होळी' ही पोरब राजाची मुलगी:
'होळी' ही पोरब नामक राजाची मुलगी होती. दिसायला ती सुंदर तर होतीच सोबत ती अनेक कलांगुणांनी निपुण होती. ती एका 'भोंगडा' नामक आदिवासी तरूणाच्या प्रेमात पडते. तो बांबूपासून वस्तू तयार करण्याचे काम करीत असतो. त्याची कला पाहुन ती फारच भारावून गेली असते. मा‍त्र एका देवाच्या मुलीचे एका आदिवासी तरूणाच्या प्रेमात पडणे, हे इतर देवांना मान्य नव्हते. त्यामुळे राजा पोरब त्या दोघांमध्ये येऊन उभा ठाकतो. मात्र होळीचे प्रेम हे निस्सिम होते. आपले प्रेम खरे आहे, हे सिध्द करण्‍यासाठी ती अग्नीच्या पेटत्या ज्वालांमध्ये उडी घेते. मात्र तिचे प्रेम सत्य असल्यामुळे ती अग्निज्वालातून जिवंत चालत येते. हा चमत्कार पाहून पोरब राजाला त्याची चूक कळते व तो तिचा विवाह बांबूपासून वस्तू तयार करणार्‍या आदिवासी तरूणाशी लावून देतो. अशा प्रकारची आख्यायिका आदिवासी बांधव सांगतात. यावरूनच तरूण- तरूणींना आपल्या मनासारखा जीवनसोबती मिळावा म्हणून होळीला आदिवासी भागात भोंगर्‍या बाजाराची परंपरा दृढ झाली आहे.

भोंगर्‍या बाजार: 'भोंगर्‍या' हा होळी सणाच्या अगोदर येणारा व आदिवासींमध्ये विशेष लोकप्रिय असलेला 'बाजार' (जत्रा) होय. दहा ते बारा आदिवासी पाड्यांच्या मध्यवर्ती भागातातील एका गावात हा बाजार सर्वानुमते भरविला जात असतो. प्रत्येक आद‍िवासी पाड्यांचे मुखीया नदी काठी एकत्र येऊन बाजार भरविण्याबाबत निर्णय घेत असतात. होळी सणाअगोदर एक दिवस निश्चित करून बाजाराचा दिवस ठरविला जातो. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील आदिवासी बांधव ढोल, पावरी घेऊन बाजाराच्या गावी नाचायला येतात. आदिवासी तरूण- तरूणी मोठ्या संख्येने या बाजारात उपस्थित होत असतात. प्रत्येक गावातून आठ ते दहा गृप नाचण्यासाठी येत असतात.

भोंगर्‍या बाजारात होळीसाठी लागणारे विविध साहित्य खरेदी केले जाते. नारळ, खोबरे, दाळ्या, गूळ, साखरेचे हार, कपडे, रंगीत कागद, रंग आदी वस्तूंची खरेदी करून आदिवासी बांधव आपाआपल्या गावात परततात. होळीच्या दिवशी जंगलात जाऊन बांबूची अथवा विशिष्ट प्रकारची लाकडे तोडून होळीच्या ठिकाणी जाळतात. त्या अगोदर त्यांची पूजा केली जाते. ढोलीला नवीन चामडे चढवतात.

जीवनसाठी निवडण्याची परंपरा:
फाल्गुन महिन्यातील पोर्णिमेला आदिवासी बांधव 'होळी' सण साजरा करीत असतात. होळी सणा अगोदर भरविण्यात येणार्‍या भोंगर्‍या बागारात आदिवासी समाजात तरूण- तरूणी मनासारखा जीवनसाथी निवडत असतात. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील विवाहइच्छूक तरूण-तरूणी सजून धजून या बाजारात मोठ्याप्रमाणात सहभागी होत असतात. आवडत्या तरूणीला याबाजारातून पळवून नेण्याचीही फार प्राचीन प्रथा आहे. म्हणून या बाजाराला काही‍ भागात 'भगोरिया बाजार' ही म्हटले जाते. या बाजाराच्या निम‍ित्तानेच वर्षातून एकदाच आदिवासी समाजात विवाह जुळत असतात.

अग्नीची पूजा करणारा आदिवासी खरा निसर्गपूजक होळीद्वारे आपली संस्कृती आजही जपत आहे. हे मात्र तेवढेच खरे. खरं तर होळी म्हणजे जाती-धर्माच्या भिंती ओलांडून साजरा होणारा लोकोत्सवच आहे. म्हणूनच तर होळी म्हणजे आदिवासींचा दीपोत्सवच आहे, असे म्हटले जाते.