शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. स्वातंत्र्य दिन
Written By वेबदुनिया|

देशभक्तीची प्रेरणा देणारे नायक

आजपर्यंत बॉलीवूडमध्ये देशभक्तीवर आधारित बरेच चित्रपट प्रदर्शित झाले व होत आहेत. आपल्या देशाप्रती एकनिष्ठ होऊन रणभूमीवर लढणार्‍या बॉलीवूडमधील नायकांना रुपेरी पडद्यावर पाहून प्रेक्षकांमध्ये देशभक्तीच्या भावना जागृत होताना दिसतात. आपले शत्रू राष्ट्र समजले जाणार्‍या पाकिस्तानविरुद्ध फुकारलेले युद्ध असो वा दहशतवाद्यांशी केलेले दोन हात. प्रेक्षकांना हे सारे पडद्यावर पहायला फार आवडते, हेच या चित्रपटांना मिळालेल्या यशावरून सिद्ध होते.

बॉलीवूडमध्ये देशभक्तीवर आधारित बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत व आगामी काळात मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत आहेत. रणभूमीवरील युद्धाचा प्रसंग पाहून आजच्या काळातील युवकांचे बाहूही फुरफुरत आहेत. चित्रपटांमधील देशभक्तीची भावना ओतप्रोत भरलेल्या भूमिकांमधील नायक आजच्या सळसळत्या तरुणाईला प्रेरणा देणारे ठरले आहेत.

ND
1960 ते 1980च्या दरम्यान प्रदर्शित झालेल्या 'शहीद' व 'उपकार' या चित्रपटांनी नायक मनोज कुमारची ''देशभक्त भारत कुमार'' म्हणून नवीन ओळख करून दिली. तर 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अहिंसेचा मूलमंत्र देणारा नायक संजय दत्तच्या 'लीला' जगजाहीर असूनही समाजाने संजयला चित्रपटातील मुख्य भूमिकेत स्वीकारले. एवढेच नव्हे तर त्याने दिलेल्या 'गांधीगिरी'चा उपदेश ऐकून रोजच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे.

बॉलीवूडमधील काही नायकांनी देशभक्तिपर चित्रपटामधील मुख्य भूमिका साकारून आज इतिहास जमा झालेल्या शहिदांना रुपेरी पडद्यावरच नव्हे तर प्रेक्षकांच्या मनातही जिवंत केले आहे. त्यातील काही नायकांची चित्रपट व त्यांनी साकारलेल्या भूमिका....

IFM
तारासिंग- सनी देवल
'गदर- एक प्रेम कथा' या चित्रपटातील तारासिंग नावाचे पात्र सनी देवलने साकारले. तारासिंगला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या चित्रपटात भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या फाळणीचा प्रसंग दाखविण्यात आला आहे. त्यात तारासिंग व सकीना( अमिषा पटेल) यांची प्रेम कहाणीतून त्यांचा विवाह व त्यानंतर त्यांच्या झालेली ताटातूट, आणि सकिनाला परत आणण्यासाठी गेलेला तारासिंग अशी ही कथा. तारासिंगची भूमिका काहीशी आक्रस्ताळी वाटत असली तरी सनी देओलने ती जिवंत केली आहे.
त्याचा आक्रमकपणा अनेकांत देशभक्तीची भावना जागृत करण्यास कारणीभूत ठरला. चित्रपटातील संवादांमधून त्या काळचे चित्रही बर्‍यापैकी उभे रहाते.

IFM
अजयसिंग राठोड- अमीर खान
'सरफरोश'मधील अमीर खानची एसीपी राठोडची भूमिका तरुणाईला आपल्या कर्तव्यांशी एकनिष्ठ राहण्याच्या प्रेरणा देते. आपल्या कुटुंबियाच्या सेवेसह देशाच्या रक्षणासाठी राज्यांच्या सीमांतर्गत होणारी शस्त्रांची तस्करी करणार्या दहशतवाद्यांना पकडण्यात तो यशस्वी झाल्याचे दाखविले आहे.

ND
शिवाजीराव गायकवाड- अनिल कपू
'नायक'मध्ये अनिल कपूरने शिवाजीराव गायकवाडची भूमिका केली आहे. पत्रकारापासून ते एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याने सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून त्यांना न्याय दिला आहे. भ्रष्ट मंत्री व पुढारी यांचे पितळ जनतेसमोर उघडे करून त्यांना तरुंगाची हवा खायला पाठविल्याचे दाखविण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारीत असा हा चित्रपट आहे. मराठी जनतेने या 'नायक'चे जोरदार स्वागत केले होते. राजकारणी देशाला आतून पोखरत असल्याचे या चित्रपटात दाखविले आहे.

IFM
रंग दे बसंतीमधील मैत्र
'रंग दे बसंती' या चित्रपटातील दलजीत, करण सिंघानीया, असलम, सुख्खी, लक्ष्मण पांडे या पात्रांनी तरूणाईमधील निस्सीम मैत्रीच्या भावना जागृत केल्या आहेत. तरुणांना प्रशासनाविरूद्ध लढताना दाखविले आहे. अमीर, सोहा, सिद्धार्थ, कुणाल कपूर, शर्मन जोशी, अतुल कुलकर्णी यांनी साकारलेली पात्रे व त्यांच्यात असलेली मैत्री मस्तपैकी जमून आली आहे. त्यांच्या मैत्रीतून राष्ट्रप्रेम जागृत झाले आहे. 'जिंदगी जीने के सिर्फ दो ही तरीके होते है- एक, जो हो राहा है होने दो, बर्दाश्त करते जाओ या फिर जिम्मेदारी उठाओ उसे बदलने की' हा डायलॉग तर खूप प्रसिद्ध झाला.

ND
कबीर खान- शाहरूख खान
'चक दे इंडिया' या चित्रपटात महिला हॉकी चमूच्या कोचची भूमिका शाहरूख खानने साकारले आहे. देशाच्या भिन्न राज्यांतून आलेल्या मुलींमध्ये एकसूत्रीपणा निर्माण करून त्यांना वर्ल्ड हॉकी चॅंपियनशिप मिळविण्यासाठी प्रेरीत करण्याचे काम कबीर खान म्हणजेच शाहरूख खानने केले आहे. महिला हॉकीचा चमू अंतिम फेरीत पोहचतो. अंतिम फेरीच्या एक दिवस अगोदर मैदानावर कबीर खान हॉकी चमू प्रमुखाला भारतांचा झेंडा पहिल्यांदा इंग्रजी व्यक्तीला फडकावताना पाहत असल्याचे सांगताना दाखविले आहे. यातून देशभक्तींच्या भावना प्रकट होतात.

बॉलीवूडमध्ये देशभक्तीवर आधारित वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट तयार झाले आहेत. हे चित्रपट समाजातील प्रत्येक नागरिकांना देशाप्रती प्रेरणा देणारे ठरले आहेत.