शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. स्वातंत्र्य दिन
Written By वेबदुनिया|

लोकशाहीत खर्‍या लोकसत्तेची पुनर्स्थापना

मनोज पोलादे

WD
स्वातंत्र्याच्या 66 वर्षानंतरही देशात व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुत्व खर्‍या अर्थाने प्रस्थापित झालं नाही. राजेशाही, इंग्रजशाही संपृष्टात आल्यानंतर नव-सरंजामशाहीत सामान्य जनता आजही भरडल्या जात आहे. प्रातिनिधिक लोकशाहीत प्रशासन व कार्यकारी व्यवस्थेच्या हातांत सत्ता एकवटल्याने सामान्यजन हतबल झाला. तो स्वतंत्र झाला मात्र नवसत्तांच्या हातात स्वातंत्र्य गमावून बसला. जगतील सर्वात मोठ्या लोकशाहीत नागरिकांचे स्वातंत्र्य फक्त मतदान करण्यापूरते मर्यादित झाले.

प्रातिनिधिक लोकशाहीत कायदे करण्याचा अधिकार संसदेस, कायद्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार कार्यपालीकेस आणि प्रशासन राबवण्याचा अधिकार नोकरशाहीस आहे. या संस्था राबवणार्‍या प्रतिनिधींनी जनहिताची पायमल्ली करून स्वतहितासाठी अधिकारांचा वापर चालवल्याने लोकशाहीच्या खर्‍या मालकाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. लोकांनी, लोकांची, लोकांसाठी चालवलेली राज्यव्यवस्था म्हणजे लोकशाही या व्याख्येसच यामुळे हरताळ फासल्या गेली. ही लोकसत्ता पुनर्स्थापित होऊ शकेल काय?

राजकारण व अर्थकारण सर्व बदल व सुधारणांची नाडी असून राजकारण जनसामांन्यांच्या हातात गेल्यास आणि अर्थकारणाचा फायदा तळातल्या व्यक्तीपर्यंत पोहचल्यास खरी लोकशाही प्रस्थापित होईल. दोष व्यवस्थेत नसून ती राबवणार्‍या व आपल्या दावणीस बांधून ठेवणार्‍या मूठभर स्वार्थी लोकांच्या वृत्तीत असते. हायजॅक झालेली लोकशाही प्रणाली प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठीची यंत्रणा ठरण्यासाठी जनसामांन्यांचा सक्रिय सहभाग वाढवावा लागेल. राजकारण हा घाणेरडा प्रांप आहे, हा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे.

राजकारण हे देशाचे संचलन करण्याची चाबी मिळवून देणारे माध्यम आहे. प्रातिनिधिक लोकशाहीत प्रतिनिधी निवडून देण्याचा हा एक मार्ग असल्याचे जनमनावर ठसवावे लागेल. राजकारणात चांगले आचार, विचार, संस्कार, शिक्षण असलेल्या जनसामान्य जनतेची सरासरी वाढल्यास आपोआपच या क्षेत्राचे शुद्धीकरण होईल आणि जनहितार्थ लोकशाही शासनव्यवस्था राबवणारे हात वाढतील.

देशातील ९० टक्के जनता सुशिक्षित झाल्यास निम्म्याहून अधिक प्रश्न आपोआपच सुटतील. अज्ञान व अंधकार हे माणसाचे शत्रू आहेत. ज्ञानाचा दिवा घराघरात तेवत राहिल्यास अज्ञानरूपी अंधकार लोप पावून राष्ट्राची वाटचाल तेजाकडे, उज्ज्वल भविष्याकडे होईल. लोकशाहीत अधिकार, हक्क यांची प्रत्येकास जाण होण्यासोबतच कर्तव्याची जबाबदारीही प्रत्येक हृदयात रूजेल. प्रगतीची नवी दालने खुलतील, व्यक्तिगत, सामाजिक विकासासोबतच राष्ट्राच्या उन्नतीची कवाडेही यामुळे उघडतील. नवनव्या दिशा, वाटा, उपलब्ध संधीचे सोने करण्याचं शहाणपणं रूजेल. व्यक्ती, समाज व पर्यायाने राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठीच्या महामार्गाचे जाळे विस्तृत होऊन कोपर्‍या-कोपर्‍यात प्रकाश पोहचून खरी जनसत्ता प्रस्थापित होईल.

FILE
देशातील प्रत्येक नागरिक सुजाण झाल्यास माहितीचे महाजाल उघडून त्याचा वापर सार्वत्रिक होईल. येथपर्यंत वाटचाल झाल्यास अर्थकारणाची सूत्रं मूठभरांच्या हातात न राहता तळातील नागरिकापर्यंत त्याचा लाभ पोहचेल, पर्यायाने सर्वांगीण उन्नतीची वाट प्रशस्त होईल.

नागरिकांसाठीच्या जनकल्याणाच्या योजना, आरोग्य सुविधा, उभ्या-आडव्या क्षेत्रातील संधी, भ्रष्ट्राचार व गुन्हेगारी रोखण्यासाठी माहिती व कायद्याचा वापर, यांची किल्ली प्रत्येक नागरिकाच्या हातात उपलब्ध होईल. आणि केव्हा, कोठे, कशी, का व कुणी हे अस्त्र वापरायचे, याचे ज्ञान सार्वत्रिक होऊन वास्तव लोकसत्तेचा महामार्ग प्रशस्त होईल. लोकशाहीचे स्वरूप आभासी न राहता ती वास्तवात येईल!