शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , शनिवार, 25 मार्च 2017 (07:35 IST)

अमेरिकेत भारतीय महिलेची राहत्या घरी मुलासह हत्या

आंध्रप्रदेशातून अमेरिकेत जाऊन नोकरी करणाऱ्या महिलेची राहत्या घरात हत्या करण्यात आली आहे. तिच्याबरोबर तिच्या सात वर्षाच्या मुलाचीही हत्या करण्यात आली आहे. एन. शशिकला या महिलेची न्यू जर्सी या ठिकाणी राहत्या घरात गळा दाबून हत्या करण्यात आली. शशिकला यांचे पती एन. हनुमंत राव हे सॉफ्टवेअर अभियंता आहेत. ते जेव्हा संध्याकाळी घरी परतले तेव्हा त्यांना आपली पत्नी आणि मुलगा यांची हत्या झाली आहे हे समजले. शशिकला या देखील सॉफ्टवेअर तज्ज्ञ होत्या. त्या घरुन काम करत असत. हनुमंत राव आणि शशिकला हे दोघे नऊ वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये आले होते. या हत्येचे पडसाद भारतीय संसदेवर पण उमटले आहेत.
 
काही दिवसांपूर्वीच श्रीनिवास कुचिभोतलाची हत्या झाली होती आणि आता शशिकला आणि तिच्या सात वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. ही परिस्थिती गंभीर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर तत्काळ करावाई करावी असे काँग्रेसचे राज्यसभा सदस्य टी. सुब्बारामी रेड्डी यांनी म्हटले आहे. या प्रकरणाकडे लक्ष द्यावे असे आवाहन उप-सभापती पी. जे. कुरियन यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना केले आहे. लोकसभेमध्ये वायएरआर काँग्रेसचे खासदार वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी देखील अमेरिकेमधील भारतीयांना वाचवण्यासंदर्भात ठोस पावले उचलावीत असे आवाहन केले. ही हत्या वर्णद्वेषातूनच झाली आहे असे दिसते.
 
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करावी असे देखील ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी तेलंगणाचा मूळचा रहिवासी असलेला श्रीनिवास कुचिभोतला याची एका बारमध्ये हत्या करण्यात आली. ३२ वर्षीय श्रीनिवास आणि त्याच्या मित्रावर एका माजी नौसेना अधिकाऱ्याने बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. आमच्या देशातून चालता हो असे म्हणत त्याने श्रीनिवासवर गोळ्या झाडल्या. या घटनेत श्रीनिवास ठार झाला तर त्याचा मित्र जखमी झाला. श्रीनिवासला वाचवण्याचा प्रयत्न करताना एक अमेरिकन नागरिकही जखमी झाला. भारतीय वंशाच्या लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.