बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: इस्लामाबाद , बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (09:05 IST)

शाहीद खाकान अब्बासी हे पाकिस्ताचे नवीन पंतप्रधान

पाकिस्तानी संसदेचे कनिष्ठ सभागृह असणाऱ्या नॅशनल असेंब्लीने आज त्या देशाच्या पंतप्रधानपदी शाहीद खाकान अब्बासी यांची निवड केली. अर्थात, तात्पुरती व्यवस्था म्हणून अब्बासी यांची निवड झाल्याने ते अल्पकाळासाठीच पाकिस्तानचे पंतप्रधानपद भुषवणार आहेत.
 
सत्तारूढ पीएमएल-एन पक्षाचे प्रमुख असणाऱ्या नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी पनामागेट प्रकरणी अपात्र ठरवले. त्यामुळे शरीफ यांना पंतप्रधानपदावरून पायउतार होणे भाग पडले. शरीफ यांच्या जागी त्यांचे बंधू शाहबाज यांच्याकडे पंतप्रधानपदाची सुत्रे सोपवण्याचा निर्णय पीएमएल-एनने घेतला. मात्र, पंतप्रधानपद सांभाळण्यासाठी शाहबाज नॅशनल असेंब्लीचे सदस्य असणे अनिवार्य आहे. त्यांची नॅशनल असेंब्लीवर निवड होईपर्यंत अब्बासी यांना अंतरिम पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर एकूण 342 सदस्यसंख्या असणाऱ्या नॅशनल असेंब्लीत नव्या पंतप्रधानांच्या निवडीची औपचारिकता पार पडली. अब्बासी यांना 221 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी नाविद कमर (पीपीपी) यांना 47 तर शेख रशिद अहमद (पीटीआय) यांना 33 मतांपर्यंतच मजल मारता आली. जमात-ए-इस्लामीचे साहिबजादा तारिकउल्ला यांना अवघ्या 4 मतांवर समाधान मानावे लागले. पाकिस्तानचे पंतप्रधानपद अल्पकाळासाठी भुषवण्यास सज्ज झालेले 58 वर्षीय अब्बासी हे शरीफ यांचे निष्ठावान समर्थक मानले जातात.