शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: अथेंन्स , मंगळवार, 30 जून 2015 (10:45 IST)

ग्रीसवरील आर्थिक संकटाचे सावट, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

जगाच्या अर्थव्यस्थेला २००८ नंतर पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. यूरोपीयन युनियनमधला संस्थापक देश असणारा ग्रीस आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. 
 
आज ग्रीसमधली सगळी एटीएम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात ग्रीसच्याच जनतेने अडीच अब्ज युरो एटीएममधून काढून घेतले आहेत. त्यामुळे एटीएममध्ये रोकड उपलब्ध नसल्याचे पंतप्रधान अलेक्सिस सिप्रास यांनी जाहीर केले आहे. अथेंन्समध्ये झालेल्या ऑलिंम्पिकनंतर ग्रीसच्या अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली. देश कर्जाच्या ओझ्याखाली दबला. सध्या ग्रीसवर वेगळवेगळ्या कर्जदाराचे ३०७ अब्ज युरोंचे कर्ज आहे. हे कर्ज देताना ग्रीसच्या सरकारवर खर्च कपातीचे विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. सरकारी खर्चात कपात झाल्याने ग्रीसची अर्थव्यवस्था आणखी डबघाईला आलीय. त्याचाच परिणाम म्हणून सहा महिन्यांपूर्वी काटकसरी थांबवून अर्थव्यवस्थेला गती देण्याचे आश्वासन देणारे डाव्या विचाराचे सरकार जनतेने निवडून दिले आहे. पण ग्रीसला कर्ज देणारे देश आणि आतंरराष्ट्रीय नाणे निधी आणखी कर्ज देण्याआधी निर्बंध कमी करण्यास तयार नाहीत. त्यामुळे ग्रीसवर आता दिवाळखोरीची वेळ आली आहे.
 
आज ग्रीसला आंतरराष्ट्रीय नाणे निधीने दिलेलं कर्ज फेडण्याची मुदत आहे. पण हे कर्ज फेडण्यासाठी युरोझोनमधले कर्जदार त्यांना कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता ग्रीस युरोझोनमधून बाहेर फेकला जाण्याची शक्यता. असं झालं, तर फ्रान्स आणि जर्मनी या दोन्ही सर्वात मोठ्या कर्जदारांच्या अर्थव्यवस्थांना मोठा धक्का बसणार आहे. त्याचे पडसाद आज भारतासह सगळ्याचं शेअर बाजारात बघायाला मिळतील असा अंदाज आहे. 
 
आठवडाभर बँका ठप्प ? 
ग्रीस सरकारच्या मते, बँकांचे कामकाज आठवडाभर ठप्प राहू शकते. यादरम्यान खातेदार बँकांतून एका दिवशी फक्त ६० युरो इतकी रक्कमच काढू शकतील. त्यापेक्षा जास्त रक्कम काढताही येणार नाही. (साधारणत: १ युरो म्हणजे भारताचे ७० रुपये. म्हणजे ग्रीसमध्ये सध्या बँकेतून एका दिवशी सुमारे ४२०० रुपयेच काढता येतील.) याशिवाय सरकारच्या परवानगीशिवाय खातेदार आपला पैसा देशाबाहेरही पाठवू शकणार नाहीत. 
 
यूरोपीय सेंट्रल बँकेचा नकार 
आर्थिक मंदीच्या सावटामुळे यूरोपीय सेंटड्ढल बँकेने ग्रीस बँकांना आणखी आपत्कालीन सहायता निधी देण्यास नकार दिला आहे. ग्रीस आणि युरोजन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. यूरोपीय सेंटड्ढल बँकेच्या या निर्णयामुळे ग्रीस बँकांवरील दबाव आणखी वाढला आहे. कारण ग्रीस बँका पहिल्यापासूनच केंद्रीय बँकांवर अवलंबून होत्या. त्यातच आता या बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी खातेदारांनी रांगा लावल्या आहेत. 
 
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज 
ग्रीसला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे तब्बल दीड अरब युरोचे कर्ज फेडायचे आहे. याआधी कडक अटींमुळे या देशाने मदतीचं पॅकेज नाकारले होते. मात्र आता परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. ग्रीसच्या पंतप्रधानांनी देशाला मिळणा-या प्रस्तावित मदत पॅकेजवर जनमत चाचणी घ्यायचं ठरवले आहे. ही जनमत चाचणी ५ जुलैला होणार आहे. ग्रीसमधल्या संकटाचा परिणाम अनेक उभरत्या अर्थव्यवस्थांवरही होणार असे दिसत आहे.कारण विदेशी गुंतवणूक त्यामुळे आखडती घेतली जाऊ शकते.