बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: पेशावर , बुधवार, 17 डिसेंबर 2014 (10:46 IST)

पेशावरच्या सैनिकी शाळेवर तालिबानींचा हल्ला 141 ठार

तालिबानी अतिरेक्यांनी पेशावरमधील सैनिकी शाळेवर चढवलेल आत्मघाती हल्ल्यात 132 निष्पाप विद्यार्थ्यांसह 141 जणांचे प्राण गेले. दहशतवाद्यांना पोसणार्‍या पाकिस्तानला या हल्ल्यामुळे सर्वात मोठी किंमत मोजावी लागली आहे. हल्ल्यात शेकडो विद्यार्थी जखमी झाले असून ततील अनेक विद्यार्थी चिंताजनक आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
 
स्फोटकांचा मोठा साठा घेऊन 7 आत्मघाती हल्लेखोर लष्कराच्या वेशात शाळेत घुसले. वारसक रस्त्यावरील या लष्कराच्या सैनिकी शाळेत हल्लेखोरांनी बेधुंद गोळीबार केला. खैबर-पख्तुनखवाचे मुख्यमंत्री परवेझ खट्टक यांनी वार्ताहरांना सांगितले की, 132 विद्यार्थचा या हल्ल्यात  बळी गेला आहे. लेडी रीडिंग हॉस्पिटलमध्ये 20 तर कम्बाईन्ड मिलिटरी हॉस्पिटलमध्ये 60 मृतदेह आहेत. जखमींपैकी 30 जणांना लेडी रीडिंग हॉस्पिटलमध्ये तर 39 जणांना मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. खट्टक यांनी सांगितले की, शाळेमध्ये एका मानवी बॉम्बचा स्फोट झाल्याने मृतांचा आकडा वाढला आहे. दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी हवाई हल्ल्याचा मार्ग अवलंबण्यात येत आहे. सात दहशतवाद्यांना ठार मारण्यात लष्काराला यश आले. खट्टक यांनी तीन दिवस दुखवटा जाहीर केला आहे.
 
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून ही ‘राष्ट्रीय आपत्ती’ असल्याची घोषणा केली. शरीफ   स्वत: पेशावरमध्ये दाखल झाले असून युध्दपातळीवर सुरू असलेल्या लष्कराच्या ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस अधिकार्‍याने   सांगितले की, शाळेच्या परिसराला वेढा घालण्यात आला असून हल्ला झाला, त्यावेळी शाळेमध्ये 500 विद्यार्थी व शिक्षक होते.
 
माहितीमंत्री मुश्ताक घनी यांनी सांगितले की, शाळेजवळ असलेल्या स्मशानभूमीतून हल्लेखोरांनी प्रवेश केला. सर्व दहशतवादी 18 ते 19 वर्षाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. वारसक रस्त्यावरील सेंट मेरी हायस्कूलजवळ ही लष्करी शाळा आहे. शाळेकडे जाणार्‍या रस्त्यावर  मोठय़ा प्रमाणावर पोलीस व सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. लष्कराने छोटय़ाशा निवेदनात म्हटले आहे की, ‘मुलांच्या   सुटकेसाठी मोहीम चालू असून गोळीबार दोन्ही बाजूने होत आहेत. विद्यार्थी व शिक्षकांची मोठय़ा संख्येने सुटका करणत आली आहे. काही विद्यार्थी व शिक्षक मारले गेले आहेत’.
 
तेहरीक-ए-तालिबान या संघटनेच्या प्रवक्तने दावा केला की, सहा आत्मघाती हल्लेखोर शाळेमध्ये घुसले आहेत. ज्येष्ठ मंत्री हिदानुल्ला यांनी सांगितले की, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हल्लेखोरांनी शेकडो मुलांना ओलीस ठेवले आहे. सुटका झालेल्या एका विद्यार्थ्याने  पत्रकारांना सांगितले की, हल्लेखोरांनी लांब दाढी वाढवलेली असून सर्वानी सलवार-कमीज घातले आहे. अरेबिक भाषेत हे हल्लेखोर बोलत असून सर्वजण विदेशी असावेत.
 
पाकच तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांनी हा हल्ला अतिशय भ्याड असल्याचे म्हटले आहे. शुजा या विद्यार्थ्याने सांगितले की, गोळीबार सुरू झाला, तेव्हा विद्यार्थी परीक्षा देत होते. जमिनीवर तासभर आडवे पडल्यानंतर लष्कराच्या जवानाने वर्गातून बाहेर जाण्यास   सांगितल्याचे शुजाने स्पष्ट केले. अनेक विद्यार्थनी शाळेच्या मागच्या गेटमधून सुटका करून घेतली.
 
चॅम्पिन ट्रॉफी स्पर्धेत रौप्पदक मिळविणार्‍या पाक हॉकी संघाचा स्वागत समारंभ लाहोर येथे आयोजिण्यात आला होता. मात्र हा कार्यक्रम  पुढे ढकलण्यात आला. पाक हॉकी महासंघाने म्हटले आहे की, गौरव समारंभ योग्यग्वेळी नंतर आोजित करण्यात येईल.