शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जुलै 2015 (11:22 IST)

पोटातून निघाले अडीच किलो भंगार

'पिका' नावाचा आजार सर्वांनाच माहीत असेल. या आजारामध्ये व्यक्तीला माती, राख वा कोळसा यांसारख्या शरीरासाठी अजिबातही पोषक घटक नसलेल्या वस्तू खाण्याची सवय लागते. या भलत्या गोष्टी खाण्याची त्याला भविष्यात किंमत मोजावी लागते.
 
दक्षिण आफ्रिकेतील एका तरुणाची कहाणी अशीच आहे. हा सध्या 25 वर्षांचा आहे. बालपणापासूनच त्याला लोखंडाच्या छोट्यामोठ्या वस्तू खाण्याची विचित्र सवय जडली आहे. लोखंडाची हाती येईल ती वस्तू तो तोंडात टाकतो. काही दिवसांपूर्वी त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. घरच्यांनी त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर त्याला अल्सरचा विकार असेल असे त्यांना वाटले. मात्र त्याच्या एक्सरेतून जे दिसले ते पाहून डॉक्टरसुद्धा अवाक झाले. या तरुणाच्या पोटात लोखंडाच्या वस्तूंचा मोठा ढीग असल्याचा खुलासा एक्सरेमधून झाला. 
 
या लोखंडी वस्तूंच्या वजनामुळे त्याचे पोट काही से डावीकडून उजव्या बाजूला कलले होते. त्याच्यावर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्याच्या पोटातून अडीच किलो लोखंड व अन्य धातूंच्या वस्तू बाहेर काढल्या. यामध्ये नाणी, चाव्या, लोखंडाचे छोटेछोटे तुकडे व एवढेच नाही तर चाकूसुद्धा आढळून आला. या सगळ्या मिळून 127 लोखंडी नग त्याच्या पोटात सापडले. पोटातून बाहेर काढलेल्या या वस्तूंनी संपूर्ण चादर व्यापून टाकली होती. मात्र एवढे सगळे त्याच्या पोटात आजवर कसे काय सामावले गेले हे एक आश्चर्यच आहे. डॉक्टरांनी त्याच्या छातीपासून पोटापर्यंत काप घालून या वस्तू बाहेर काढल्या. आता त्याची प्रकृती बरी आहे.