शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: इस्लामाबाद , गुरूवार, 21 ऑगस्ट 2014 (11:50 IST)

भारताचे गुलाम नाही : तसनीम

भारताने दोन्ही देशातील परराष्ट्र सचिव पातळीवरील बैठक रद्द केल्याने पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. ‘आम्ही भारताचे गुलाम नाही आणि काश्मीर भारताचा भाग नाहीच’, अशी तिखट प्रतिक्रिया देत पाकिस्तानने नेहमीप्रमाणे उलटय़ा बोंबा ठोकल्या आहेत.
 
भारतातील पाकिस्तानच्या उच्चयुक्तांनी काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची घेतलेली भेट आणि जम्मू-काश्मीर सीमेवर पाक जवानांकडून सतत होत असलेला गोळीबार याचा निषेध करत भारताने 25 ऑगस्टला दोन्ही देशांमध्ये होणारी परराष्ट्र सचिव पातळीवरील द्वीपक्षीय बैठक रद्द केली. भारताचा हा निर्णय पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या तसनीम असलम यांनी पत्रकार परिषदेत भारतावर टीका केलीय. ‘आम्ही काही भारताचे गुलाम नाही, की त्याच्या खुशामतीसाठी सांगणार तसे वागू’, असे तसनीम  म्हणाल्या.
 
‘पाकिस्तानचे उच्चयुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांची भेट घेऊन भारताच्या कारभारात कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही आणि काश्मीर हा भारताचा भाग नाहीच. पाकिस्तान स्वतंत्र देश आहे, भारताचा गुलाम नाही. काश्मीर हा वादग्रस्त भाग आहे आणि त्यात पाकिस्तानचाही तेवढाच हिस्सा आहे’, असे तसनीम असलम यांनी सांगितले.
 
‘पाकिस्तानचे उच्चयुक्त आणि काश्मीरमधील हुरीयतच्या फुटीरवादी नेत्यांमध्ये झालेली ही काही पहिलीच चर्चा नाही. अशा चर्चा अनेक वर्षापासून होत आल्या आहेत. त्यामुळे परराष्ट्र सचिव पातळीवरील बैठक रद्द करणे हा भारताचा दिखावा आहे आणि एक बहाणा आहे’, अशी टीका तसनीम यांनी केली आहे.