शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑक्टोबर 2015 (11:24 IST)

‘नासा’च्या मंगळ मोहिमेसाठी जुळ्या बहिणींना निमंत्रण

‘नासा’ने 2018 या सालात मंगळ मोहीम करण्याचे ठरवले आहे. मनुष्यवस्ती नसलेल्या मंगळ ग्रहावर टेलिपॅथीच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी नासाने अंतराळ क्षेत्रात काम करणार्‍या नाशिकच्या अपूर्वा जाखडी आणि लिना जाखडी या जुळ्या बहिणींची चाचपणी सुरू केली असून, त्या पाश्र्वभूमीवर अपूर्वा आणि लिना या दोघी बहिणींना अमेरिकेत निमंत्रित करण्यात आले आहे. 
 
मंगळ ग्रहावरील निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी टेलिपॅथीच्या साहाय्याने संवाद साधण्यासाठी नासाचा अभ्यास सुरू आहे. त्यासाठी अंतराळात काम करणार्‍या दोन जुळ्या बहिणींचा ‘नासा’ला शोध होता. नाशिकच्या अपूर्वा आणि लिना या बहिणींमुळे नासाचा हा शोध समाप्त झाला असून मंगळ मोहिमेसाठी नासा टेलिपॅथी तंत्राचा वापर करणार आहे. त्यासाठी दोन विचारांच्या व एकमेकांशी विचार जुळणार्‍या व्यक्तींची नासा चाचपणी करत होते. अपूर्वा या नाशिक इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनिअर्सच्या सरचिटणीस आणि ‘वर्ल्ड स्पेस विक’ च्या समन्वयिका आहेत. नाशिकमध्ये राहत असलेल्या अपूर्वा पुण्यात राहणार्‍या लिनाशी टेलिपॅथीने जोडलेल्या आहेत. दोघीही अंतराळ प्रशिक्षक म्हणून कार्य करत आहेत. त्यांनी दोन वेळा नासा येथे भेट दिली आहे. अपूर्वा या अमेरिकेच्या वर्ल्ड स्पेस विकच्या (एशिया-पॅसिफिक रिजन) समन्वयिका म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान या जुळ्या बहिणींना नासाने निमंत्रित केले आहे. त्यांना अमेरिकेतील सॅन डायगो येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 
 
ही एक अपूर्व संधी लाभल्याचा आनंद या बहिणींना होत असला तरी प्रत्यक्षात अंतराळाची संधी मिळणे अथवा येणार्‍या अडचणींबाबत भीती जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. नासाने मंगळ मोहिमेसाठी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून 2018 पर्यंत हे प्रशिक्षण असणार आहे. या दोघींना संधी मिळाल्यास भारतीयांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.