शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

जिंकू किंवा मरू अशी बंगळुरूसाठी आज स्थिती

WD
मुंबई आणि पंजाब संघाकडून अनपेक्षित पराभव पत्करलमुळे अडचणीत आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला शनिवारी जिंकू किंवा मरू अशा स्थितीचा सामना करावा लागणार आहे.

सहाव्या आयपीएल ट्वेंटी-20 साखळी क्रिकेट सामना बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन मातब्बर संघात होत आहे. चेन्नई संघ साखळी गुणतक्त्यात 22 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. त्यांनी प्ले ऑफ फेरी निश्चित केलेली आहे. परंतु बंगळुरू संघाचे मात्र 16 गुण झालेले आहेत. प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी बंगळुरू संघाला कोणत्याही परिस्थितीत ही लढत जिंकावी लागणार आहे.

शेवटच्या सामन्यात पंजाबने बंगळुरूचा पराभव केल्यामुळे मुंबई, चेन्नई, राजस्थानची प्ले ऑफ फेरी निश्चित झाली व बंगळुरू संघ मागे पडला. हैदराबाद संघाचे 16 गुण आहेत व त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. हैदराबाद राजस्थान व कोलकाता संघाबरोबर खेळणार आहे. त्यांच्यापुढेसुद्धा सामना जिंकण्याचे कठीण आव्हान असणार आहे. बंगळुरूने हा सामना जिंकला तर त्यांची प्ले ऑफ फेरी निश्चित होणार आहे.

चेन्नई संघ हा विलक्षण फॉर्ममध्ये आहे. परंतु हा सामना घरच्या मैदानावर होत असल्यामुळे बंगळुरू संघाला फायदा आहे. 13 एप्रिल रोजी चिदंबरम स्टेडियमवर चेन्नईने बंगळुरूचा चार गडी राखून पराभव केला होता. आता त्यांना पराभवाची परतफेड करावी लागेल. ख्रिस गेल हा महत्त्वाचा खेळाडू बंगळुरूकडे आहे व त्याने आजपर्यंत 680 धावा करून ऑरेंज कॅप मिळविलेली आहे. कर्णधार विराट कोहली यानेसुद्धा 578 धावा केल्या आहेत. याशिवाय एबी डी’व्हिलिअर्स हासुद्धा धावा जमवित आहे. हा विजय मिळविणसाठी या तीनही फलंदाजांना आपले सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. चेन्नई संघसुद्धा हा सामना जिंकून साखळी स्पर्धेत अव्वलस्थान घेणच्या प्रयत्नात आहे. ड्वेन ब्राव्होने 24 बळी घेऊन पर्पल कॅप मिळविलेली आहे. मोहित शर्मा यानेसुद्धा प्रभावी मारा केला आहे. माईक हसी, सुरेश रैना, मुरली विजय, बद्रीनाथ, कर्णधार धोनी व रवींद्र जडेजा अशी फलंदाजीची फळी मजबूत आहे. त्यामुळे ही तुल्बळ लढत रंगतदार ठरणची शक्यता आहे.