गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 12 जानेवारी 2019 (16:30 IST)

कसा असावा प्रोफाईल फोटो

सोशल नेटवर्किंग साईटवर प्रत्येक जण आपला फोटो प्रोफाईलमध्ये अपलोड करत असतो. हा प्रोफाईल फोटो खूप काही सांगत असतो. या साईटस्‌वरून तुमच्याशी संवाद साधणार्‍या व्यक्तीसमोर हाच चेहरा असतो. अशा वेळी हा फोटो चांगला असेल तर आपला प्रभावही चांगला राहतो. म्हणूनच या फोटोविषयी काही टिप्स- 
 
चेहरा समोरच्या बाजूला असावा : प्रोफाईल फोटोमध्ये तुमचा स्वतःचा हसरा चेहरा असावा. शक्यतो ग्रुपचा फोटो ठेवू नका. पाळीव प्राण्यासोबतचा फोटोही प्रोफाईल फोटो म्हणून ठेवू नये. 
 
शांत उजेडातील फोटो : प्रोफाईलसाठी फोटो काढताना शांत उजेड असावा. यामुळे फोटोत सावली पडल्याचे दिसून येत नाही. फोटोमध्ये तुमचा चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. पाहणार्‍याला तुमच्या चेहर्‍याची वैशिष्ट्ये समजली पाहिजेत. चांगल्या उजेडात काढलेला फोटो नक्कीच प्रभावी ठरतो. 
 
इनडोअर फोटो : एखाद्या खोलीत फोटो काढत असाल तर तेथे नैसर्गिक उजेड असावा. नसल्यास लाईटचा प्रकाश चेहर्‍यावर व्यवस्थित पडेल अशा ठिकाणी उभे राहून फोटो काढावा. 
 
आऊटडोअर फोटो : सकाळ आणि संध्याकाळच्या उजेडात फोटो काढणे चांगले असते. कारण या दोन्ही वेळांमध्ये सूर्य सरळ तुमच्या डोक्यावर नसतो. यामुळे चांगला फोटो येतो. दुपारी फोटो काढायचाच असेल, तर एखादे शेड असलेल्या भागाचा शोध घ्यावा. जेणेकरून चांगला उजेड येऊ शकेल.
 
बॅकग्राऊंड : तुमच्या पाठीमागे एकाच रंगाची भिंत असेल, तर फोटो काढणे सोपे जाते. भिंतीपासून सुमारे पाच फूट दूर उभे रहावे. यामुळे भिंतीच्या रंगाचा प्रभाव तुमच्या फोटोमध्ये दिसत नाही. तुमचा बॅकग्राऊंड अस्ताव्यस्त असेल, तर फोटोचा प्रभाव बिघडतो.
 
थेट समोरून फोटो नको : शक्यतो समोरून काढलेला फोटो प्रोफाईलसाठी ठेवू नये. याऐवजी थोडे तिरके अथवा यापेक्षा वेगळ्या पोझमध्ये उभे राहून काढलेला फोटो ठेवावा. 
 
रंग आणि कॉन्ट्रास्ट : फोटोमध्ये आकर्षक रंगसंगती ठेवावी. पेहराव, भिंतीचा किंवा आजूबाजूची रंगसंगती यांमुळे फोटोला वेगळेपण येते. फोटोतील गडद रंग पाहणार्‍याला आकर्षित करत असतात. 
 
एकसारखा फोटो : आपल्या सर्वच सोशल नेटवर्किंग अकाऊंटवर एकसारखाच फोटो असावा. कारण यामुळे मित्रांना तुम्हाला ओळखणे सोपे जाते. 
 
प्रियांका जाधव