बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 12 जानेवारी 2015 (14:58 IST)

एम-इन्डिकेटर करणार महिलांची सुरक्षा

लोकल ट्रेनमधून प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षेसाठी आता मोबाइलमध्येच एम-इन्डिकेटरच्या माध्यमातून सेवा देण्यात आली आहे. एम-इन्डिकेटरच्या अपडेट आवृत्तीमध्ये सेफ्टी नावाचा आयकॉन देण्यात आला आहे. ज्या दोन व्यक्तींना संकटाच्या वेळी sms  जावेत असे वाटते त्यांचे नंबर या आयकॉनमध्ये सर्वप्रथम नोंदवावे लागतात.
 
त्यानंतर लोकल प्रवास करताना किती वाजताची लोकल पकडली आहे, ज्या ठिकाणी जाणार आहोत आणि नक्की कुठल्या महिला डब्यात बसलो आहोत त्याची नोंद करायची.
 
त्यानंतर जेव्हा प्रवास करताना कुठलाही धोका आहे असे वाटले तर सेफ्टी ऑप्शन क्लीक करायचे. त्यामुळे नोंद केलेल्या दोन व्यक्तींना आपल्या लोकेशनचा sms जाईल.
 
आता सेफ्टी ऑप्शन ओपन झालेले असेल. अजूनही धोका वाटत असेल तर आरपीएफच्या वेस्टर्न रेल्वे किंवा सेंट्रल रेल्वेच्या हेल्पलाइन नंबरवर क्लिक केल्यास कॉल केला जाईलच पण कंट्रोल रूमला आपल्या लोकेशनचे 3 sms हे एक मिनिटाच्या अंतराने जाणार आहे. यामुळे आरपीएफ तुमच्या लोकल ट्रेनमध्ये सहज पोहोचू शकेल.
 
समजा धोक्याच्या वेळी मोबाइलला हात लावण्याची संधीच मिळाली नाही तर काय ?
 
अशा वेळेला मदत मिळू शकेल अशी सुविधा एम-इन्डिकेटरमध्ये आहे. खास करून रात्री 9 ते सकाळी 8 दरम्यान प्रवासादरम्यान ही सुविधा मदतीची ठरणार आहे.
 
जर नोंद केलेल्या व्यक्तींकडून दोन वेळा कॉल केला गेला आणि जर कॉल रिसीव झाला नाही तर ते मिसकॉल ठरतीलच..पण त्या व्यक्तीच्या मोबाइलवरुन नोंद केलेल्या व्यक्तींच्या मोबाइलवर एक ऑटोमेटिक sms जाणार. 
 
या sms मध्ये व्यक्तीच्या लोकेशनची माहिती असेल. यामुळे पुढची कारवाई नोंद असलेल्या व्यक्तींना करता येणार आहे.