गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2016 (11:03 IST)

गुगलचा मिनीटभराचा मालक

नायकमधला अनिल कपूर आठवतो एक दिवसाचा सीएम. अगदी अशीच स्टोरी नाही, पण भारतीय सन्मय वेद नुकताच एक मिनिटासाठी गुगलचा मालक बनला. इतकंच नाही तर त्याला आठ लाखांचा फायदाही झाला. ही सगळी हकीकत खुद्द गुगलनेच आपल्या ब्लॉगवर लिहिली आहे.
 
सन्मय वेद हा गुजरातमधल्या कच्छ भागातील मांडवी इथला राहणारा. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये गुगल डोमेन शोधताना गुगल डॉट कॉम हे डोमेन नेम खरेदी करण्यासाठी उपलब्ध असल्याचं जाणवलं. मग काय त्याने लगेचच ते खरेदी करायचं ठरवलं आणि तो कामाला लागला. बघता बघता त्यानं हे डोमेन 12 डॉलरना विकतही घेतलं. गुगलकडून ही विक्री थांबवण्याआधी तो गुगलच्या वेबमास्टर टूल्सपर्यंतही पोहोचला होता.
 
आपल्या सर्च इंजिनची सुरक्षा तपासण्यासाठी गुगल वरचेवर वेगवेगळ्या आयडियाच्या कल्पना राबवत असते. गुगलच्या सुरक्षेतील त्रुटी दाखवणार्‍यांना गुगल बक्षीस देते. गुगलच्या या प्रोग्राममध्ये आतापर्यंत भारत, ब्रिटन, पोलंड, जर्मनी, रोमानिया, इस्नयल, ब्राझील, अमेरिका, चीन, रशिया आदी देशांमधील तज्ज्ञांनी त्रुटी दाखवल्या आहेत. यासाठी कंपनीने 2015पर्यंत अशा त्रुटी दाखवणार्‍या 300 लोकांना 20 लाख डॉलरहून अधिक रक्कम बक्षीस म्हणून दिली आहे. त्याअंतर्गतच गुगलने ही डोमेन विक्रीची जाहिरात टाकली होती. सन्मय मिनीटभरासाठी गुगल डोमेनचा मालक बनल्याने गुगलनेही त्याला आपल्या नावाशी मिळतीजुळती किंमत म्हणजे 6006.13 डॉलर इतके बक्षीस दिले. मात्र, सन्मयने आपण ही रक्कम आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शैक्षणिक कार्यक्रमासाठी देणार असल्याचे सांगितल्याने गुगलनेही बक्षिसाची रक्कम दुप्पट केली. आर्ट ऑफ लिव्हिंगचा शैक्षणिक कार्यक्रम देशातील 18 राज्यांमधल्या 404 शाळांमध्ये चालवला जातो. या शाळांमधून झोपडपट्टय़ा, आदिवासी आणि ग्रामीण भागांतील मुले, बालमजूर अशा 39,200हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते.