शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

देशातील पहिल्या सुपरकारचं अनावरण

बहुप्रतीक्षित अशा देशातील पहिल्या सुपर कारचे, डीसी अवंतीचे पुण्यात एका समारंभात अनावरण करण्यात आले. प्रसिद्ध कार डिझाईनर दिलीप छाब्रिया यांच्या संकल्पनेतून चिंचवड स्टेशन येथे साकार झालेल्या या कारमुळे कारच्या बाजारपेठेत खळबळ उडण्याची शक्यता असून या कारद्वारे भारतात कारची एक वर्गवारी निर्माण झाली आहे. यावेळी डीसी डिझाइनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिलीप छाब्रिया, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, आदिवेणू मोटार्सचे वेणुगोपाल तापडिया आणि आदित्य तापडिया आदी उपस्थित होते. 


 
ही कार पुण्याच्या आदिवेणू मोटर्सच्या शोरुममध्ये सादर करण्यात आली. कारचे औपचारिक अनावरण झाल्यानंतर सिद्धार्थ भन्साली यांना डीसी अवंतीचे पहिले ग्राहक म्हणून कारची किल्ली देण्यात आली. यावेळी छाब्रिया म्हणाले, की त्यांच्या स्वप्नातील ही कार बनविण्यासाठी 33 महिने आणि 150 कोटी रुपयांची गुंतवणूक लागली. ‘डीसी अवंती ही माझ्या स्वप्नातील कार आहे आणि आम्ही अगोदरच 300 कार विकल्या आहेत. या क्षेत्रातील आमच्या ज्ञानाच्या बळावर आम्ही हे साध्य करू शकलो. आम्ही दाखवून दिले आहे, की जगातील कोणत्याही देशाइतकेच आम्हीही सक्षम आहोत.’ तसेच डीसी अवंती ही फेरारी आणि लॅम्बोर्गिनी यांसारख्या कारशी स्पर्धा करेल, परंतु किंमत ही तिच्या दृष्टीने प्रचंड अनुकूल बाब ठरेल. परदेशी कारच्या तुलनेत या कारची किंमत केवळ एक दशांश आहे आणि त्यामुळे भारतीय लोकांना स्पोर्ट्स कार चालविण्याचे आपले स्वप्न साकारता येईल. 
 
या कारच्या किल्ल्या घेतल्यानंतर आपला आनंद व्यक्त करताना सिद्धार्थ भन्साली यांनी सांगितले, ‘मी यासाठी डीसी व आदिवेणू मोटर्सला धन्यवाद देईन. ही कार पैशाचा पुरेपूर मोबदला देते आणि माझ्यासारखे युवक कारचे क्रेझी असतात. डीसी अवंती ही अशा युवकांसाठी योग्य अशी भेट आहे.’ डीसी अवंती पहिल्यांदा कॉन्सेप्ट कारच्या स्वरुपात 2012 साली ऑटो एक्सपोमध्ये नवी दिल्ली येथे सादर करण्यात आली होती. 2014 साली ऑटो एक्सपोमध्ये या कारचे प्रॉडक्शन मॉडेल सादर करण्यात आले होते. या कारचा वेग ताशी 200 किमी वर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मर्यादित केलेला असून 6 सेकंदांत ताशी 100 किमीचे अक्सीलरेशन ती गाठते. आदिवेणू मोटर्सतर्फे ही गाडी महाराष्ट्रासाठी उपलब्ध असणार आहे. लवकरच या कारची तळेगाव येथे निर्मिती सुरू होणार आहे.