बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 13 जून 2015 (14:56 IST)

ब्लॉक अकाऊंट लिस्ट शेअर करण्याची सुविधा

ट्विटरने आता आपली ट्विटर टाइमलाइन अधिक सुरक्षित बनवण्यासाठी नवा फंडा राबवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार, एखाद्या ट्विटर  युजरला त्याने ब्लॉक केलेल्या ट्विटर हँडलची यादी जगजाहीर करता येणार आहे. या याधी आपल्याला त्रास देणार्‍या एखाद्या ट्विटर   हँडलला आपण ब्लॉक केलं तर तो फक्त त्या दोघांमधला व्यवहार असायचा. अन्य तिसर्‍या व्यक्तीला कुणी कुणाला ब्लॉक केलंय, याची माहिती मिळत नसे.
 
ट्विटर हे सोशल नेटवर्किग माध्यम संपर्काचं एक प्रभावी माध्यम आहे. ट्विटरवर फक्त 140 कॅरेक्टरमध्ये आपल्या भावना व्यक्त करता येतात. ट्विटरवर जगातील अनेक मोठे नेते, राजकारणी, देशांचे प्रमुख, वेगवेगळी मंत्रालये, सरकारी विभाग आणि सेलिब्रिटी यांचा राबता आहे. या सर्वामुळे ट्विटरला जसं ग्लॅमर मिळालंय, तसं विनाकारण त्रास देऊन ट्विटरसारख्या संपर्क माध्यमाचा गैरवापर करणार्‍यांची काही कमी नाही. मात्र ट्विटर अशा कुणालाच प्रतिबंध करत नाही, कारण ट्विटर प्रत्येकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करतं. मग एखादं ट्विटर  हँडल तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल, अलील आणि अलाघ्य कॉमेंट करत असेल तर त्याचा प्रतिबंध करण्यासाठी टिटरने प्रत्येक युजरला ब्लॉक हा पर्याय उपलब्ध करून दिलाय. तुम्हाला आवडत नसलेल्या विचारांच्या व्यक्तीला तुम्ही ब्लॉक करू शकता, तुम्ही ज्या हँडलला ब्लॉक केलंय, तो तुमचे ट्विट पाहू शकत नाही किंवा तुम्ही त्याचे ट्विट पाहू शकत नाही..
 
आता नव्या अपडेटनुसार टिटरने तुम्ही कुणाकुणाला ब्लॉक केलंय, हे तुमच्या फॉलोअर्सना किंवा समविचारी लोकांना समजण्यासाठी एकाचवेळी अनेकांना ब्लॉक करण्याची तसंच तुमची ब्लॉक लिस्ट शेअर करण्याची सुविधा दिलीय. सध्या ट्विटरवर म्यूट आणि ब्लॉक हे दोन टूल्स आहेत. या माध्यमातून तुम्हाला त्रास देणार्‍या किंवा न आवडणार्‍या विचारांना तुमच्यापुरता प्रतिबंध करू शकता. काही ट्विटर  युजर्स या माध्यमात फक्त सर्वसासान्यांना उपद्रव करण्यासाठीच येत असतात, अशा लोकांची सर्वानाच माहिती होणं गरजेचं असतं. हीच सुविधा ट्विटरने उपलब्ध करून दिलीय.