शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जून 2015 (11:22 IST)

वायफायमुळे तुमच्या शरीराला धोका

जर तुम्ही ऑफिस किंवा घरी इंटरनेटसाठी वायफाय वापरत असाल, तर तुमच्या शरीराला ते धोकादायक आहे. हल्ली वायफाय सर्वासाठी अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. वायफायची गरज आहे, कारण इंटरनेटची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एका अभ्यासानुसार, 2018 सालापर्यंत भारतात इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या 50 कोटी होणार आहे. त्यामुळे इंटरनेट कंपन्या भारताकडे मोठ्या गंभीरतेने पाहतात. आणि त्यामुळेच अपरिहार्यपणे वायफायचे जाळं भारतात मोठ्या वेगाने पसरत चाललं आहे.

देशातील अनेक शहरांत तर फ्री वायफाय सुविधांचा सध्या सुळसुळाट सुरू आहे. कुठे मेट्रो स्थानकांत फ्री वायफाय, तर कुठे मॉलमध्ये. दिल्लीत तर आम आदमी पक्षाने 1 हजार वायफाय स्पॉट बनवण्याचे जाहीर केले आहे. देशातील अनेक सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये वायफाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. मात्र, ज्या वायफायचा उपयोग एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा मनोरंजनासाठी करत आहात, तोच वायफाय तुमच्या शरीराला घातक ठरू शकतो.

वायफायमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. वायफायमधून निघणार्‍या किरणांमुळे कॅन्सरसारखे भयंकर रोग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे फ्री वायफाय सुविधा सुरू करण्याच्या विचारात असलेल्या सरकारचं लक्ष याकडे का जात नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

वायफायसंदर्भात जगभरातील 200 शास्त्रज्ञांच्या संशोधनातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे यूएनला एक याचिका पाठवली आहे. या याचिकेत स्पष्ट म्हटले आहे की, वायफायमधून निघणार्‍या किरणांमुळे कॅन्सर आणि इतर भयंकर आजारांची भीती आहे. सतत वायफायच्या रेंजमध्ये असणं शरीराला घातक ठरण्याची भीतीही या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.