गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By वेबदुनिया|

'मॅनेजमेंट' गुरू कृष्ण

पूर्वी कोकणापुरतीच मर्यादीत असलेली दहीहंडी मुंबईतील राजकिय पक्षांनी 'ग्लोबल' केली आहे. त्याचे महत्त्व अलीकडच्या काळात भरपूर वाढले आहे. मानाच्या गणपतीप्रमाणे मानाच्या लाखालाखांच्या हंड्या बांधल्या जात आहेत. गोविंदाची मंडळे दोन ते तीन महिन्यापूर्वीच सराव करायला सुरवात करतात. पथकांच्या ड्रेसपासून तर दहाहंडीच्या सजावटीसाठी बड्या व्यक्तींकडून सौजन्य दिले जाते. पूर्वी 6 थरावर असलेली हंडी 8 ते 9 थरावर चढायला लागली आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांची गोविंदा पथकेही रणांगणावर उतरलेली दिसतात. दहीहंडी फोडणार्‍या गोविंदाला मोठ्या प्रमाणात दुखापत होण्याची शक्यता असल्याने दहीहंडीच्या ठिकाणी प्राथमिक उपचार व एम्बुलन्सची सोय करण्यात आलेली असते.

पण आपण दहीहंडीच्या उगमाकडे पाहिले तर काय दिसते? कृष्ण गोपिकांचे लक्ष ऐहिक सुखाच्या दूधदूभत्यापासून वळवून शाश्वत सुखाकडे वळवू इच्छित होता. स्वत:पुरते साठवून न ठेवता त्या संचिताचा साठा सर्व प्राणीमात्राना समान वाटपासाठी झटत होता. बाळगोपाळांनी केलेल्या लीलांमध्ये होणार्‍या नुकसानात शांत राहण्याची शिकवण देत होता, त्याग शिकवत होता. ह्या अध्यात्मिक अनुभूतीतील सोप्या सोप्या गोष्टीतून जनवासीयांना अनुभवांचा लाभ घडवत होता. माणूस घडविण्याचे मोठे काम त्याने मोठ्या युक्ती प्रयुक्तीने केले.

सर्व जातीप्रजातीतील गवळ्यांच्या पोरांना एकत्र करून प्रत्येकाच्या घरात शिक्यावर ठेवलेले दूध दही मिळवताना तो त्यांच्या मनातील उच्चनीचतेची कुंपणही तोडत होता. दहीहंडीत थर लावताना एकमेंकावर विसंबल्याशिवाय एकमेंकाप्रती गाढ विश्वास असल्याशिवाय वर चढणे अशक्य असते. म्हणून सहकार्‍याला समान वागवण्याची, एकमेकांवर गाढ विश्वास ठेवण्याची शिकवणही तो यातूनच देत होता.

आपली कंपनी नावारूपाला आणून 'टार्गेट अचिव्ह' करायचे तर लागणारे नियोजन, कौशल्य, फ्लेक्झीबिलीटी, योग्य माणसाला कंपनीच्या पिरॅमिडमध्ये योग्य स्थान यासारख्या एकदम 'परफेक्ट' असणार्‍या 'मॅनेजमेंट स्कील'ची थिअरी याच दहीहंडीत आहे. म्हणजे आजच्या एमबीए करणार्‍यांचा तो आद्य ‍गुरू म्हणायला हरकत नाही. आपल्यापेक्षा आकाराने, वजनाने लहान असणार्‍याना थरात वर चढायचे असते. मी त्यापेक्षा वय, योग्यता, अधिकार, वजन यांनी मोठा आहे. मला वर चढायला अग्रमान दिला पाहिजे, अशा अहकांराला सोडून द्यायची शिकवणही कृष्णाने दिली आहे.

असा हा कृष्ण कुशल संघटक, कुशल योध्दा तर होताच पण दहीहंडीचा अभ्यास करता तो अध्यात्मिक गुरू बरोबरच एक सर्वात मोठा 'मॅनेजमेंट गुरू'च होता हेच दिसून येते.