शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

मायावतींच्या हत्तीची कामगिरी मुंगीएवढी !

मायावतींनी या निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहिलं होतं, पण त्यांच्या पक्षाने एवढी वाईट कामगिरी केली की मायावतींनी स्वप्नातही त्याची कल्पना केली नसेल. मायावतींच्या हत्तीने कामगिरी मात्र मुंगीएवढीच केली आहे.

बसपने देशभरात ५०३ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यात त्यांचे फक्त २१ उमेदवार निवडून आले, तेही उत्तर प्रदेशातच. त्यांच्या यशाची टक्केवारी अवघी ४.१७ आहे.

रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष दुसर्‍या क्रमांकावर आहे. पासवानांच्या लोजपाने ८० जागा लढविल्या आणि स्वतःसह सगळ्यांना मातीत घेऊन गेले. एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही.

डाव्यांचीही कामगिरी चांगली झालेली नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्ष तर आता आपली राष्ट्रीय पक्ष ही ओळखही गमावण्याच्या मार्गावर आहे. या पक्षाने ८१ जागा लढविल्या आणि जिंकल्या फक्त ४. त्यांच्या यशाची टक्केवारी आहे ७.१४.

लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाने बिहार व झारखंड मिळून ४४ जागा लढविल्या आणि जिंकल्या फक्त ४. गेल्यावेळी त्यांच्या जागा हो्त्या २४. त्यांची यशाची टक्केवारी ९.०९ एवढीच आहे.

'ह्रदयात महाराष्ट्र आणि नजरेसमोर राष्ट्र' ठेवलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्थाही काही फार चांगली नाही. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणार्‍या पवारांनी महाराष्ट्रासह अनेक राज्यात उमेदवार उभे केले होते. पण या ६५ उमेदवारांपैकी फक्त ९ निवडून येऊ शकले. त्यांच्या यशाची टक्केवारी आहे १२.८५ टक्के.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पश्चिम बंगाल व केरळ हे बालेकिल्लेही आता ढासळत चालले आहेत. या पक्षाने ८१ जागा लढविल्या आणि निवडून आले फक्त १६ उमेदवार. या यशाची टक्केवारीही १९.७५ एवढीच आहे.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील सेक्युलर जनता दलाने ३३ जागा लढविल्या आणि जिंकल्या फक्त ३. हे यश जेमतेम ९.०९ टक्के आहे.

जयललितांच्या अखिल भारतीय अण्णा द्रमुकनेही निराशाच केली. या पक्षाने २३ जागा लढवूनही त्यांचे ९ उमेदवार जिंकले. त्यांच्या यशाची टक्केवारी ३९.१३ टक्के आहे.

या सगळ्या पक्षात अव्वल कामगिरी केली ती करूणानिधींच्या द्रमुकने. या पक्षाने २१ जागा लढविल्या आणि १८ उमेदवार निवडून आणले. त्यांच्या यशाची टक्केवारी ८५.७१ अशी आहे. त्या खालोखाल बिजू जनता दलाची कामगिरी आहे. बीजदचे १८ पैकी १४ उमेदवार निवडून आले. ७७.७८ टक्के यश नवीन पटनाईकांच्या खात्यात जमा झाले.

कॉंग्रेसने या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे २०६ जागा जिंकल्या. पक्षाने ४४० मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. पक्षाच्या यशाची टक्केवारी ४६.८१ आहे. भाजपने ११६ जागा जिंकल्या, पण उमेदवार मात्र ४३३ जागांवर उभे केले होते. भाजपच्या यशाची टक्केवारी २६.७९ आहे.