गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Modified: सोमवार, 6 जुलै 2015 (10:13 IST)

चित्रपट परीक्षण: ऑनलाइन बिनलाइन

राजेश पिंजानी आणि श्रेयस जाधव यांची निर्मिती असलेल्या आणि केदार गायकवाडने दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘ऑनलाइन बिनलाइन’ रिलीज झालेला आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे यात मुख्य भूमिकेत आहेत. तर तुजा शिंदेने या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.
 
इंटरनेटने पछाडलेली तरूण पिढी हा चित्रपटाचा मूळ विषय आहे. या ‘नेट’कर्‍यांना हे वेड कुठपर्यंत नेऊ शकते, हे लेखक हेमंत एदलाबादकर यांनी दाखविलेले आहे. मार्मिक विनोद आणि सध्याच्या कॉलेज तरुणांच्या तोंडावर रुळलेली बोली भाषा हे चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
 
सिध्दार्थ देसाई या सोशल नेटवर्किगच्या जाळ्यात पुरत्या फसलेल्या महाविद्यालयीन तरुणाची ही कथा आहे. ज्यात आपल्याला ईश्वर दामोदर यादवडकर म्हणजेच ‘आयडय़ा’ हा सिध्दार्थचा मित्रही भेटतो. जो फोन फक्त कॉल रिसीव्ह करण्यासाठी वापरतो. असे हे परस्पर विरोधी व्यक्तिमत्त्वाचे दोघे आणि त्यांची मैत्रीण असा प्रेमत्रिकोण आहे. चित्रपट वरकरणी जरी रोमँटिक कॉमेडी पठडीतला वाटत असला तरीही ह्यातनं एक सोशल मेसेज देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आयडय़ा आणि सिध्दार्थ यांच्या अवतीभवती चित्रपट फिरतो.
 
चित्रपटात आपल्याला सिध्दार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे यांची धमाल कॉमेडी अनुभवता येते. सिध्दार्थ आणि हेमंत ही जोडी जय जय महाराष्ट्र माझा या चित्रपटातून एकत्र दिसली होती. आणि त्यांच्यातली मैत्री सिल्व्हर स्क्रीनवर रिफ्लेक्ट होते. केदार गायकवाड हा बॉलिवूडचा प्रथितयश सिनेमॅटोग्राफर. त्याचा पहिलाच मराठी चित्रपट. पहिल्या दिग्दर्शनाच्या प्रयत्नासाठी त्याने यूथ जॉनर निवडला आहे. निर्माता श्रेयस जाधवही तरुणच आहे. आणि या सर्वाची तरूण एनर्जी चित्रपटात जाणवते. ऋषीकेश रानडे, जसराज जोशी आणि सौरभचे यूथफुल संगीत यात ऐकायला मिळते. आणि चित्रपट संपल्यावर लेस्ली लुईज आणि हरिहरन यांचे 14 वर्षापूर्वी गाजलेले ‘ओ हो काय झालं’ हे गाणं ऐकणं आणि पाहणं ही सुध्दा कॉलेजक्राउडला आवडेल असेच आहे.