गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Modified: बुधवार, 7 सप्टेंबर 2016 (16:15 IST)

डॉ. मीना नेरूरकर यांचे चित्रपटातील दिग्दर्शकीय पर्दापण

डॉ. मीना नेरूरकर हे नाव मराठी नाट्यसृष्टीला काही नवीन नाही. "सुंदरा मनामध्ये भरली" तसेच "अवघा रंग एकचि झाला" यांसारखी दर्जेदार नाटके डॉ.मीना नेरूरकर यांनी  प्रेक्षकांसमोर सादर केली. या दोन्ही नाटकांना
प्रेक्षकांनी हाऊसफुल प्रतिसाद दिला. 'अ डॉट कॉम मॉम' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच सिनेमा आहे.
अमेरिकेत चित्रित करण्यात आलेला हा पहिला मराठी सिनेमा आहे.डॉ. मीना नेरूरकरया निर्मात्या, लेखिका, दिग्दर्शिका यासोबतचं उत्तम कोरिओग्राफरसुध्दा आहेत. गेली अनेक वर्ष त्यांनी रविवारच्या सामना या दैनिकात तर लोकप्रभा या मासिकात लिखाण केले, तसेच 'धन्य ती गायनॅक कला' आणि 'ठसे माणसांचे' यांसारखी पुस्तकेही लिहिली. डॉ.मीना नेरूरकर या  जितक्या लिखाणात तरबेज आहेत तितक्याच त्या अभिनयातही निपुण आहेत. इंग्लिश-विंग्लिश या हिंदी तर 'स्लीपवॉक विथ मी' आणि  'मिस्टर रवी अँड मिस्टर हाईड' या हॉलीवुडपटात तसेच अमेरिकेतल्या काही टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. त्यांच्या गेल्या ४० वर्षाच्या अमेरिकेतल्या वास्तव्यात त्यांनी 'वाऱ्यावरची वरात','विच्छा माझी पुरी करा', 'सख्खे शेजारी' यांसारख्या नाटकातही त्यांनी कामे केली आहेत.

'अ डॉट कॉम मॉम' या सिनेमातून त्या भारतातल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाल्या आहेत. या सिनेमात त्यांनी आई आणि मुलाच्या नात्यातील भावनिक गुंफण  दाखवली आहे. या सिनेमातल्या सध्या भोळ्या आईची व्यक्तिरेखा डॉ. मीना नेरुरकर यांनी साकारली आहे तर साई गुंडेवार याने त्यांच्या मुलाची भूमिका केली आहे. आपल्या समाजात आजही अशा स्त्रिया आहेत ज्यांचा संबंध बाहेरच्या जगाशी येत नाही, आणि मग अचानक एक दिवस अचानक या बाहेरच्या जगाशी संबंध आल्यावर त्यांची फार तारांबळ उडते. डॉ. मीना नेहरूरकर यांच्या आगामी 'अ डॉट कॉम मॉम' या चित्रपटातली आई जेव्हा अमेरिकेत जाते त्यावेळी तिची उडणारी तारांबळ आणि तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची तिची धडपड आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निर्मितीसोबतचं संवाद लेखन, गीत लेखन, कोरिओग्राफी आणि दिग्दर्शनाची धुरा डॉ. मीना नेरुरकर यांनी सांभाळली आहे. सुनील जाधव यांनी सिनेमाचे संकलन केले असून विनायक राधाकृष्ण आणि हैदर बिलग्रामी यांनी छायाचित्रीकरण केले आहे. सुधीर फडके, अशोक पत्की एन दत्ता या दिग्गजांसोबत नील नाडकर्णी, प्रतिक शाह यांनी सिनेमाला सुमधुर असे संगीत दिग्दर्शन लाभले आहे. जगदीश खेबुडकर, डॉ. मीना नेरुरकर तसेच नील नाडकर्णी  यांनी लिहिलेल्या गीतांना देवकी पंडीत, नील नाडकर्णी आणि निदा, निलिजा, अंकुर्म यांनी आपला सुरेल आवाज दिला आहे. कायान प्रॉडक्शन या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून या सिनेमाचा जवळ जवळ सर्वच भाग हा अमेरिकेत चित्रित करण्यात आला आहे. जीसिम्सचे अर्जुन सिंग बर्हान आणि कार्तिक निशानदार हे या सिनेमाचे प्रेझेंटर आहेत. टेक्नोसॅव्ही जगात साध्या भोळ्या आईची वेगवेगळी   रूप पाहायला मिळणारा हा सिनेमा येत्या ३० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.