गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र
Written By वेबदुनिया|

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरचा चित्रपट तहान

दिग्दर्शक दासबाबू यांचे नाव छोटया पडद्याच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे रसिकांसमोर आहे. त्यांनी आतापर्यंत एक धागा सुखाचा, वाजवा रे वाजवा, आई या त्यांच्या मालिका रसिकांना अगदी मनापासून आवडल्या. दासबाबू मुळात बंगाली. पण गेली अनेक वर्षे ते मुंबईत स्थायिक आहेत. या दरम्यान त्यांनी मराठी आत्मसात केली. शिवाय याच भाषेत कलानिर्मिती करायची हेही ठरवले. त्यामुळे मातृभाषा बंगालीइतकेच ते मराठीवरही प्रेम करतात.

IFMIFM
छोट्या पडद्यावर रमणाऱ्या दासबाबूंनी आता मात्र आपला मोर्चा मोठया पड़द्याकडे वळवला आहे. त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारीत `तहान' हा चित्रपट पूर्ण केला आहे. विक्रम गोखले, सदाशिव अमरापूरकर, अरूण नलावडे, विजय चव्हाण, कुलदीप पवार, सुनील धोंडे, किशोर नांदलस्कर, सुनील बर्वे, आदिती भागवत, सुरेखा कुडची, अश्विनी एकबोटे, स्मिता ओक, किशोर प्रधान, अभय कुलकर्णी आदी कलारांनी त्यात अभिनय केला आहे. चित्रपट संपूर्णपणे वास्तववादी असला तरी त्यात रंजकताही भरपूर असल्याचा त्यांचा दावा आहे.

चित्रपटामागची भूमिका मांडताना दासबाबू म्हणतात, की आजचा सामान्य माणूस अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. त्या समस्या सोडवण्यातच त्याचं संपूर्ण आयुष्य संपतं. महाराष्ट्रात आजही पाण्याची भीषण समस्या आहे. या समस्येने ग्रस्त शेतकरी आजही मुबलक पाणी मिळेल या आशेवर आहेत. या शेतकऱ्यांच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याची समस्या भयाण व भीषण आहे. हा गहन विषय पडद्यावर आणणे हे फार मोठे आव्हान आहे. पण मला नेहमी आव्हानात्मक कलाकृती करण्यात आनंद मिळतो. यात मी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं दुःख जास्तीत जास्त परिणामकारकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

या चित्रपटासाठी दासबाबूंनी या विषयाचा सांगोपांग अभ्यास केला. दुष्काळग्रस्त ठिकाणी जाऊन तेथील शेतकऱ्यांची दुःखे समजावून घेतली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी माहिती गोळा केली. शतकयांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतले. हा चित्रपट केवळ राज्यकर्त्यांनाच नव्हे तर प्रेक्षकांनाही अंतर्मुख करेल, असा त्यांचा विश्वास आहे.

या चित्रपटाचे लेखन प्रसिध्द पत्रकार श्रीकांत बोजेवार यांचे असून गीतरचना जगदीश खेबुडकर व संगीत अच्युत ठाकूर यांचे आहे. या चित्रपटाचे श्रवणीय संगीत हे बलस्थान आहे. यात एकूण सात गाणी असून त्यात लावणी, गौरी गीत, द्वंद्वगीत, समूहगीत असे वैविध्य आहे.

निर्माते भीमसेन धोंडे यांनीही चित्रपट तांत्रिकदृष्ट्या चांगला व्हावा यासाठी बजेटमध्ये कुठेही तडजोड केली नाही. ते स्वतः मराठवाडयातील माजी आमदार आहेत. त्यामुळे त्यांना या विषयाची दाहकता अधिक तीव्रतेने जाणवली. म्हणूनच त्यांनी या विषयावर चित्रपट करायचे ठरवले. लवकरच हा चित्रपट महाराष्ट्रात प्रसिद्ध होईल.