शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By
Last Updated :मुंबई , मंगळवार, 28 एप्रिल 2015 (15:23 IST)

सुमधूर संगीताच्या कोंदणात खुलणारा 'सिद्धांत' सिनेमा

सध्या मराठी सिनेमाला सुगीचे दिवस आले आहेत असं म्हटलं तरी चालेल, सिनेमाच्या निमित्ताने हाताळले जाणारे आशयघन विषय सामान्यांना जगण्याची नवी दृष्टी देणारे आहे.  फॅण्ड्री, शाळा आणि अनुमती या सिनेमांची नावे आग्रहाने घेता येईल. ‘नवलाखा आर्ट्स मीडिया अॅण्ड एण्टरटेन्मेण्ट’चे निलेश नवलखा आणि ‘होली बेसिल प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड’चे विवेक कजारिया यांची दर्जेदार निर्मिती असलेल्या सिनेमांच्या यादीत सिद्धांत या आणखी एका सिनेमाचे नाव दाखल होणार आहे. या दोघांसोबत यंदा ‘व्हर्च्यू एण्टरटेन्मेण्ट’चे अमित अहिरराव यांनी हातमिळवणी केली आहे. आयु्ष्याच्या गणिताचं सूत्र अधोरेखित करणारा... जगण्याचं भान देणारा अन् आयुष्यातील अनेक पेचप्रसंगाची उकल करू पाहणारा ‘सिद्धांत’ सिनेमा २९ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

नुकताच या सिनेमाच्या म्युझिक लाँचचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. मराठी सिनेसृष्टीतील मान्यवर आणि चित्रपटातील कलाकार मंडळी विक्रम गोखले, स्वाती चिटणीस, किशोर कदम, गणेश यादव, सारंग साठ्ये, नेहा महाजन, माधवी सोमण, चंद्रशेखर कुलकर्णी, प्रशांत तपस्वी, सुरज सातव, बाबा आफळे आणि कांचन जाधव उपस्थित होते.  
सुरेल आणि मधूर संगीताच्या साथीने रंगलेली संध्याकाळ अधिकच बहरली ती शंकर महादेवन यांच्या गाण्याने. संगीत दिग्दर्शक शैलेंद्र बर्वे आणि गीतकर सौमित्र (किशोर कदम) यांच्या जोडगोळीने सजवलेल्या गाण्यांना स्वरबद्ध केले ते गायक शंकर महादेवन आणि  मकरंद देशपांडे यांनी.  चवीने चवीने जगणे…, थोडेसे आहे गुंतलेले…, घट्ट काही सुटले… चित्रपटाचा आत्मा असलेली ही गाणी प्रेक्षकांना नक्की आवडतील असा विश्वास शंकर महादेवन यांनी बोलून दाखवला. 
विशेष म्हणजे या सिनेमाची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे.  सिद्धांत या मराठी सिनेमाची निवड टोरांटो येथील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ साउथ अमेरिका (IFFSA ) तसेच न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी करण्यात आली आहे. हा सिनेमा आजोबा अप्पा ठोसर म्हणजेच विक्रम गोखले आणि त्यांचा नातू वक्रतुंड ठोसर म्हणजेच अर्चित देवधर यांच्या आयुष्याभोवती फिरतो. त्यांच्यामधल्या नात्याचा एक अतूट धागा हा गणिताचा सिद्धांत आहे. हा सिनेमा जसजसा खुलत जातो तसतसे नात्याचे नवनवे पदर उलगडत जातात, पण या सगळ्याला गुंफणारा जो धागा आहे... तो प्रेमाचा, विश्वासाचा, नात्याचा अन् तत्त्वांचा. या आशयघन कलाकृतीला चार चाँद लावणारा अभिनय ‘सिद्धांत’च्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे यात काही शंका नाही.
जगण्याला अर्थ देणारा आजोबा आणि नातू यांच्या नात्याला एका वेगळ्या अर्थाने अधोरेखित करणारा असा हा सिनेमा आहे. माझ्यावर विश्वास टाकणा-या निर्मात्यांचा अन् माझ्या दिग्दर्शनातील पदार्पणात मला सांभाळून घेणा-या कलाकारांचा आणि माझ्या टीमचा आभारी आहे, असंही विवेक वाघ यांनी नमूद केले. आजपर्यंत कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत असणारे विवेक वाघ या सिनेमाने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत “आतापर्यंत 'चेकमेट', 'रिंगा रिंगा', 'शाळा', 'फँड्री', 'अजिंक्य' अशा एकापेक्षा एक सरस सिनेमांच्या आरेखनात अन् कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत एक वेगळा अनुभव आणि आनंद मिळाला, पण दिग्दर्शनापलीकडच्या एका वेगळ्या दृष्टिकोनाची जाणीव सकारात्मक अर्थाने झाली.  जगण्याला भिडणा-या, वास्तवाला भिडणा-या, सिनेमाने मनात जागा केली”, असे विवेक वाघ यांनी ‘सिद्धांत’ विषयी बोलताना सांगितले.
मराठी सिनेमा हा आशयघन असतो. त्यामुळे प्रेक्षकांना दर्जेदार कलाकृती दाखवण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे हा शिरस्ता यावेळीही पाळला गेला आहे. मनाला अलवारपणे स्पर्शून जाणारा तसेच त्यांच्या अभिरूचीला संपन्न करणारा असा आमचा ‘सिद्धांत’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा निर्माता निलेश नवलाखा यांनी व्यक्त केली.
या संदर्भात निर्माता विवेक कजारिया म्हणाले, समाजापर्यंत तीव्रतेने पोहोचणारं सिनेमा हे माध्यम आहे.  आजच्या समाजाचं प्रतिबिंब आपल्या कलाकृतीतून दिसावं, असा आमचा प्रयत्न असतो. असा हा प्रयत्न आम्ही सिद्धांत या सिनेमातून केला आहे. सिनेमा एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आमच्या टीममधील प्रत्येकाचा हातभार तितकाच मोलाचा आहे.
नात्यांचा वेध घेणारा... आयुष्याचं सूत्र शोधताना त्यामधल्या प्रश्नांच्या गणिताची उकल करणारा असा हा ‘सिद्धांत‘ येत्या २९ मे २०१५ राज्यभरात प्रदर्शित होईल.