शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

सरसगड

- प्रमोद मांडे

MHNEWS
सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावानी ओळखला जाणारा हा गिरीदुर्ग रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुक्यामधे आहे. सरलगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाली हे गाव वसलेले आहे. पाली हे गाव अष्टविनायकातील गणपती साठी प्रसिध्द आहे. पाली मधील गणपती हा बल्लाळेश्वर म्हणून ओळखला जातो. अष्टविनायकांची यात्रा करणारे भावीक दर्शनासाठी नेहेमीच पालीला येतात.

भाविकांची संख्या जरी मोठी असली तरी त्यातील अनेकांना सरसगडाची पुसटशीही ओळख नसते. सह्याद्रीचा घाटमाथा आणि मुंबई - पणजी महामार्ग याच्या मधे पाली गाव आहे. आजूबाजूच्या महत्त्वांच्या गावांशी गाडीमार्गाने पाली जोडलेले आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील खोपोली येथून पालीला जाता येते. तसेच मुंबई-पणजी महामार्गावरील नागोठणे येथूनही पालीला येता येते.

पाली गावाला लगूनच असलेला सरसगड त्याच्या कातळमाथ्यामुळे अधिकच बेलाग झालेला आहे समुद्र सपाटीपासून ४४४ मीटर उंचीच्या सरसगडावर जाण्यासाठी उत्तर आणि दक्षिण अशा दोन बाजूंनी मार्ग आहे. उत्तरेकडील वाट तलई या लहानश्या गावातून गडावर जाते. तर गणपती मंदिराजवळून म्हणजे देवूळ वाडय़ाकडून जाणारी वाट चांगलीच रुळलेली आहे. एका वाटेने चढून दुसर्‍या वाटेने उतरणे ही सोयीचे आहे.

देवूळवाडय़ाच्या वाटेने चढाईला सुरवात केल्यावर डावीकडे पाली गावाचा परिसर पहायला मिळतो तर उजवीकडे असलेले तीन सुळके आपले लक्ष वेधून घेतात. ही पायवाट सरसगडाला असलेले एका घळीतून वर जाते. या वाटेवर कातळात केलेल्या पायर्‍या आहेत. या ९६ पायर्‍या असून चांगल्या गुढगाभर उंचीच्या आहेत. चढाईचा चांगलाच कस काढणार्‍या या पायर्‍या असल्यामुळे धापाटाकीतच आपण वर पोहोचतो. डावीकडे गडाचा कातळमाथा आपल्याला दिसतो. याला बालेकिल्ला म्हणतात. आपण बालेकिल्ल्याकडे निघाल्यावर त्याच्या तळाला अनेक ठिकाणी कोरुन काढलेला भाग दिसतो. या कोरलेल्या भागात पाण्याची टाकी, गुहा, काही कोण्या आहेत तसेच तालीमखानाही आहे. महाभारतकालात या गुहांमधे पांडवानी केला होता अशा काही कथा या गुहाबाबत सांगितल्या जातात.

सरसगडाच्या बालेकिल्ल्यावर महादेवाचे मंदिर आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर हत्तीगवत मोठय़ा प्रमाणावर माजते. या गवताची उंची सहाफुटापर्यंत असते त्यामुळे या गावतामधून फिरताना काळजीपुर्वक फिरावे लागते. सरपटणार्‍या प्राण्यांपासून काळजी घ्यावी लागते.

सरसगडाच्या माथ्यावरुन ढाक, राजमाची नागफणी, तैलसैला, सुधागड, माणिकगड, कर्नाळा असे किल्ले दिसतात. तसेच कोकणातील निसर्ग सौंदर्याबरोबर सह्याद्रीच्या रांगेचे दर्शन मनाला सुखावून जाते.

सरसगडाची देखभाल १९४८ साला पर्यंत भोर संस्थानाकडे होती. त्यानंतर संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली. किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे सध्यातरी किल्ला निसर्गाच्या लहरीवर तग धरुन आहे.