शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मे 2015 (12:41 IST)

प्रवास ढवळे, चंद्रगडचा

ढवळी नदीच्या पात्रातून सह्याद्रीच्या कुशीतल्या ढवळे गावात पोहोचता येते. शाळेच्या व्हरांडय़ात मुक्कामाची सोय होते. सुटीचे दिवस असल्याने कोणीच आक्षेप घेत नाही. पहाटेच भक्तिगीतांनी आपोआप जाग येते. जावळीच खोर्‍यातली सकाळ मनाला आनंद होते. हवा आल्हाददाक असते. पुढील प्रवास चंद्रगडच्या दिशेने सुरू होतो.
 
चंद्रगडाच्या पायथ्याशी आल्यावर मोठी चढण चढावी लागते. हा गड म्हणजे शिवरायांचा प्रतिस्पर्धी चंद्रराव मोरे यांचा. या भागात शौर्याच्या  अनेक कहाण्या दडलेल्या आहेत. काही वेळातच चंद्रगडला पोहोचता येते. वाट निसरडी असल्यामुळे जपून चालावे लागते. हळूहळू उन्हाचा तडाखा वाढत जातो आणि पावले झपझप चालू लागतात. ढवळेहून निघून चंद्रगडच्या माथ्यावर पोहोचायला अडीच तास लागतात. जवळच एक महादेवाचं मंदिर आहे. यात्रेकरू महादेवाचं दर्शन घेऊन गड पाहायला चालू करतात. पाण्याची टाकी, राजवाडय़ाचं उद्ध्वस्त बांधकाम आणि इतिहासकालीन अवशेष न्याहाळत पर्यटक उत्तर टोकावर पोहोचतात.
 
अस्सल सह्याद्रीचा रांगडा नजराणा पाहून प्रत्येकजण भारावून जातो. आजूबाजूचं सृष्टीसौंदर्य मनाला मोहून टाकतं. डाव्या बाजूला महादेव मंदिराची डोंगररांग आहे. रायरेश्वराच्या पश्चिम टोकासमोर ... डावीकडे खाली अस्वलखिंड आणि तिथून वाहणारा कामथे पाट. उजवीकडे काळेश्वरचा अफाट पसारा हे सर्व पाहून मन तृप्त आणि उत्साहवर्धक होते. त्यानंतर पर्यटक गड उतरायला सुरू करतात. काठावर असलेल्या  कातळ टाक्यातील पाणी अत्यंत मधुर आणि चवदार असल्यामुळे सर्वजण तेथील पाणी पितात. खिंडीत आल्यानंतर डावीकडची वाट घसरडी असल्याने जपून चालावे लागते. ढवळे घाट डावीकडे दिसू लागतो. येथून पुढे गर्द झाडी आहे. ढवळेहून इथे यायला सहा तास लागतात. नंतर भैरोबाची खिंड लागते. समोर महाबळेश्वराचा मढीमाळ कडा म्हणजेच ऑर्थरसीट दिसू लागताच सर्वानाच आनंद होतो.
 
या प्रवासासाठी कोल्हापूरहून कराड, सातारा, महाबळेश्वराहून खेड तालुक्यातील पोलादपूर लागते. तिथून बसने अर्ध्या तासावरील ढवळे गावात पोहोचावे. बरोबर वाटाडय़ा घ्यावा. गड बघून पूर्व बाजूच्या घळीतून ढवळे घाटाकडे उतरावे. गडावरच पाण्याचा साठा करून घ्यावा. डावीकडे ‘बहिरीची घुमटी’ लागते. चार तासाच्या खडय़ा चढाईनंतर भैरव खिंड लागते. उजवीकडे ऑर्थरसीट लागते. ते पाहून झाल्यावर परतीचा प्रवास सुरू होतो. त्यासाठी महाबळेश्वरहून बसेस मिळतात. प्रवासानंतर यात्रेकरू सुखावतो. त्याचा सर्व शीण नाहीसा होतो.
 
म. अ. खाडिलकर