शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: सोमवार, 19 मे 2014 (12:36 IST)

भास्करगड आणि रांजणगिरी

भास्करगड अथवा बसगड हा हरिहरचा जोडीदार मानला जातो. गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांची निर्मिती झाली होती, असे म्हटले जाते. इतिहासात डोकावून पाहिले तर 1870 मध्ये शिवरायांचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी त्र्यंबक रांगेतील अनेक किल्ले जिंकल्याची नोंद आहे. भास्करगड हा तसा आडवाटेवरील किल्ला आहे. हरिहरची वाट पुढे संपत असल्याने बरीच पायपीट करुन या किल्ल्यावर पोहोचता येते. त्र्यंबक-घोटी या मार्गावर खोडाळा मार्ग निरगुडपाडा नावाचे गाव आहे. त्याच्या पुढे भास्करगडाकडे जाण्याचा रस्ता आहे. हा किल्ला तसा अपरिचित असल्याने त्याच्या पायवाटा लवकर सापडत नाहीत. शिवाय या किल्ल्याच्या पायथ्याशी खूप घनदाट जंगल आहे. उन्हाळय़ातही त्याची घनता कमी होत नाही. भास्करगडाकडे जाणार्‍या कातळात कोरलेल्या सर्पिलाकृती पायर्‍या हे या गडाचे वैशिष्टय़ आहे. शिवाय मुख्य दरवाजा जमिनीत दबला गेल्याने त्यातून सरपटत जाऊन मार्ग काढावा लागतो. 
 
भास्करगडाच्या समोरच उतवडचा डोंगर आहे. हेच र्त्यंबक रांगेतील सर्वोच्च शिखर आहे आणि त्याच्यावर जाण्याकरिता साधी पायवाट आहे. रांजणगिरी या किल्ल्याबद्दल फारशी कोणाला माहिती नाहीच. अंजनेरीच्या मागच्या बाजूला हा किल्ला वसलेला आहे. नाशिक-मुंबई महामार्गापासून एक किल्ला मुळेगाव-जातेगावकडे जातो. मुळेगाव हे रांजणगिरीच्या पायथ्याचे ठिकाण आहे. याच रस्त्यावर डाव्या बाजूला घरगड (गडगडा) व डांग्या सुळका नजरेस पडतो. रांजणगिरीला जाण्याची वाटही फारशी मळलेली नाही. त्यामुळे शोधत शोधतच गड गाठावा लागतो. एका रांजणासारखा मोठा गोलाकार भाग किल्ल्याच्या सुरुवातीला नजरेस पडतो. त्याची नैसर्गिक रचना थक्क करणारी आहे. या रांजणाच्या पुढे छोटे प्रस्तरोहण करुन किल्ल्याचा माथा गाठता येतो. अत्यंत कमी रुंदीचा हा किल्ला आहे. केवळ टेहळणीसाठी त्याचा वापर होत असावा, असे दिसते. किल्ल्याच्या माथ्यावरुन वालदेवी धरणाचे मनोहारी दर्शन होते. फणी व ब्रह्मसारखे डोंगरही र्त्यंबक रांगेतील सौंदर्यात भर घालतात. वर्षा तूतील हिरवाईने आणि ढगांच्या लपाछपीने या परिसराचे सौंदर्य खर्‍या अर्थाने खुलून येते.
 
आराध्या मोकाशे