शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

मोरांचं गाव : चिंचोली

मोराची चिंचोली हे नावाप्रमाणेच गर्द झाडीने वेढलेले आणि भरपूर मोर असलेले असे एक गाव आहे. या ठिकाणी एका दिवसाची छान सहल होऊ शकते. हे गाव पुणे-नगर रस्त्यावर शिरूर, शिक्रापूर जवळ आहे. अष्टविनायकापैकी रांजणगाव गणपतीपासून साधारण २३ किमी. अंतरावर आहे. अजूनसुद्धा या छोट्याशा गावात तुम्हाला खुप मोर पहायला मिळतील. येथील लहान मुलांना मोर जणू मित्र असल्याप्रमाणेच वाटतात. सकाळी उठल्या उठल्या दार उघडल्यावर व्हरांड्यात मोर हिंडत असतात. अशा प्रकारे येथे आल्यावर निसर्गाचा अगदी जवळून आनंद लुटता येतो.

आत्ताच्या २१ व्या शतकाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्या सर्वसाधारण शहरी जीवनात प्रदूषणविरहीत मोकळ्या शुद्ध हवेत श्‍वास घेणे अशक्यच. हा आनंद येथील लोकं उपभोगत आहेत. 

WD
मोराची चिंचोली हे हिरवेगार जंगलांनी वेढलेले आहे. नाचणारा मोर पाहण्यासाठी जून ते डिसेंबर हा काळ योग्य आहे. पावसाळा व हिवाळा हे मोरांचा आवडता काळ आहे. सकाळी ६.०० ते सकाळी ८.०० व संध्याकाळी ५ ते ७ ही मोर पाह्ण्यासाठीची उत्तम वेळ आहे.

येथे सहलीला गेल्यावर एका गावात राहील्यावर जो आनंद घेता येईल तो घेता येतो. बाहेर फिरायला जाण्यासाठी ट्रॅक्टर किंवा बैलगाडीतून जावे लागते. आंब्याच्या, सिताफळाच्या मळ्यात मनसोक्त फिरता येते. शेतात झाडाला बांधलेल्या झोक्याचा आनंद घेता येतो. शेतीसाठी लागणारी सामुग्री पहायला मिळते.

तिथे पहाण्यासाठी काही ठिकाणे आहेत. ती म्हणजे खटकली, पाटील मळा, थोरले मळा, महानुभाव वस्ती आणि खटकली वस्ती अशी काही ठिकाणे पहाण्यासारखी आहेत. हे गाव म्हणजे ग्राम स्वच्छता अभियानाचे उत्तम उदाहरण आहे.

WD
येथे तुम्ही शेतकर्‍यांबरोबर शेतात काम करणे, रहाटाने विहिरीतून पाणी काढणे, उघड्या जागेवर पतंग उडवणे, जॉगिंग करणे, तंबूत रहाणे, झाडावर चढणे, गिल्ली-डंडा खेळणे अशा गोष्टींचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

येथे तुम्ही जास्त दिवस राहणार असाल तर रात्री व्हरांड्यात झोपून आकाशात पडणारे निखळ चांदणे, गाय-वासराचे प्रेम, गायी-म्हशींचे दूध काढताना पाहू शकता.

येथे येऊन हुर्डा पार्टीचा आनंदही घेऊ शकता. गावाकडील चुलीवरची भाकरी, पिठलं, खरडा अशा उत्तम जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.

दोन दिवसाची (Week-end) सहल करण्याच्या दृष्टीने ही उत्तम जागा आहे.

WD
नयम व अटी -

१) तंबाखू खाणे, धुम्रपान व मदीरापान यास सक्त मनाई आहे.

२) इथे फक्त शाकाहारी जेवण केले जाते.

३) येथे येणार्‍यांने गावातील लोकांशी नम्रपणेच वागले पाहिजे.

४) पावसाळ्यात येताना प्रथम एडव्हान्स बुकिंग करुनच यावे.

५) निसर्गाला हानी पोहचेल अशी कोणतीही गोष्ट करता येणार नाही.

६) बुकिंग केल्याशिवाय जाऊ नये.