गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा सत्ता कॉंग्रेस आघाडीकडेच राहिली असली तरी गेल्या वेळचा सत्तेचा तराजू मात्र थोडा हलला आहे. यावेळी प्रथमच भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या असून विरोधीपक्ष नेतेपदही या पक्षाकडेच जाण्याची शक्यता आहे. गेल्या वीस वर्षांत प्रथमच असे घडते आहे.

शिवसेनेला १९८९ मध्ये प्रथमच विरोधी पक्षनेतेपद मिळाले होते. त्यानंतर छगन भुजबळ काही आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर हे पद भाजपकडे म्हणजे गोपीनाथ मुंडेकडे गेले होते. त्यावेळीही शिवसेनेला हा अपमान वाटला होता. पुढे १९९९ मध्ये भाजपपेक्षा जास्त जागा असल्यामुळे पुन्हा हे पद शिवसेनेकडेच गेले. नारायण राणे विरोधी पक्षनेते झाले. २००४ च्या निवडणुकीतही तसेच झाले. पण राणे यांनी बंड करून काही आमदार कॉंग्रेसमध्ये नेल्यामुळे शिवसेनेचे आमदार भाजपपेक्षा कमी होतात की काय अशी भीती निर्माण झाली होती. त्यामुळे हे पद पुन्हा भाजपकडेच जाईल असे वाटत होते. पण राणेंचे सर्वच आमदार पुन्हा निवडून येऊ शकले नाही आणि काही आमदारांनी आपली आमदारकी शाबूत राखण्यासाठी शिवसेनेतच रहाणे पसंत केले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेकडेच राहिले. राणेंनंतर हे पद रामदास कदमांकडे गेले. पण राणेंचा प्रभाव कदम पाडू शकले नाहीत.

या निवडणुकीत तर कदम हेही पराभूत झाले. आणि शिवसेनेलाही हे पद मिळणार नाही, हेही स्पष्ट झाले. याचा अर्थ राज्यात मुख्य विरोधी पक्ष हा शिवसेना नसून भाजप रहाणार आहे. जागांच्या क्रमवारीत शिवसेना चक्क चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.