शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|
Last Modified: हिंगोली- , शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2009 (12:33 IST)

हिंगोली जिल्ह्यात भगवी लाट ओसरली

जिल्ह्यात तीनही विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाने आघाडीत चैतन्य निर्माण झाले आहे. तर युतीच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोलीत आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, कळमनुरी ऍड. राजीव सातव आणि वसमतमध्ये राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर विजयी झाले.

हिंगोली विधानसभेत काँग्रेसचे विमान आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी ३ हजार ९४५ मतांनी त्यांचे नजीकचे भाजपाचे प्रतिस्पर्धी तान्हाजी मुटकुळे यांचा पराभव केला. कळमनुरीत काँग्रेसचे ऍड. राजीव सातव यांनी ८ हजार २२७ मतांनी शिवसेनेचे विमान आ. गजाननराव घुगे यांना पराभुत केले. तर वसमत विधानसभेत विमान पालकमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी २ हजार ८४४ मतांनी शिवसेनेचे माजी सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा यांना पराभुत केले. तीन्ही शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी विजयोत्सवाचा ढोलताशाच्या गजरात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशाने दोन दिवसापूर्वी साजरी झालेली दिवाळी राजकारण्यांने पुन्हा विजयी मिरवणूकातून साजरी केली. फटाक्यांच्या धुमधडाक्याने आघाडीची दिवाळी जिल्ह्यात साजरी झाली.

भगवी लाट ओसरली
लोकसभेतील विजयाने जिल्ह्यात भगव्याची लाट अवतरली होती. परंतु विधानसभेच्या निकालानंतर जिल्ह्यात युतीचे पाणीपत झाले असून, भगव्याची लाट ओसरली आहे. एकाही उमेदवाराला जिल्ह्यात विजय मिळवता न आल्याने युतीच्या गोटात नाराजीचे सुर उमटत आहेत.

जिल्ह्यात मतविभाजनाच्या राजकीय गणितावर युतीचे भवितव्य अवलंबून होते, असे असले तरी कळमनुरीत तब्बल दहा वर्षापासून गजानन घुगे यांनी मतदार संघावर वर्चस्व मिळवले होते. तर वसमतमध्ये दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर विजयाची अपेक्षा माजी सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा बाळगून होते. हिंगोलीत सायकलीच्या गतीवर कमळाचे भवितव्य अवलंबून असले तरी, तीनही विधानसभेत युतीच्या उमेदवारांना सपाटून पराभव पत्कारावा लागल्याने युतीच्या नेत्यात आता आत्मपरिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. कळमनुरीतील जनतेने विमान आमदारांना नाकारले तर, हिंगोली विधानसभेत भाजपाने आपले मतदान वाढवले असलेतरी विजयाचा जादूई आकडा पार करणे तान्हाजी मुटकुळे यांना जमला नाही. एकंदरीत निवडणुकीत पाच फेर्‍यापर्यंत जिल्ह्यात युतीची तिन्ही विधानसभेत घोडदौड सुरू होती. परंतु आघाडीने पाचव्या फेरीनंतर लावलेला ब्रेक शेवटपर्यंत कायम होता. यामुळे तीनही विधानसभेत आघाडीचा विजय झाला.