गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

करा बारा ज्योर्तिलिंगाचे दर्शन

1. सोमनाथ - गुजरातमध्ये सौराष्ट्रात वसलेले सोरटी सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देशातील प्राचीन तीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. त्याचा उल्लेख स्कंदपुराण, श्रीमदभागवत गीता, शिव पुराणात आढळतो. वेद, ऋग्वेदातही सोमेश्वर महादेवाचा महिमा वर्णिला आहे.
 
हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. हे मंदिर एवढे वैभवशाली होते, गझनीच्या मोहम्मदाने त्यावर अनेकदा आक्रमण करून ते लुटले. या मंदिराचा विध्वंसही त्याने केला होता. नंतर मधल्या काळात इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनीही त्याच्या जीर्णोद्धाराला मदत केली होती. सध्या अस्तित्वात असलेले मंदिर हे भारताचे माजी पंतप्रधान व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नातून साकार झाले आहे. सातव्या वेळेले हे मंदिर बांधण्यात आले असून ते कैलास महामेरू प्रसाद शैलीत बनविले गेले आहे. हे मंदिर गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप या तीन प्रमुख भागांमध्ये आहे. याच्या शिखरावरील कलशाचे वजन दहा टन आहे. ध्वजाची उंची 27 फूट आहे.
 
धार्मिक महत्त्व - पुराणात या मंदिराच्या अनुषंगाने एक कथा आहे. चंद्राचे सोम असे नाव होते. तो दक्षाचा जावई होता. एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली. त्यामुळे राग येऊन दक्षाने त्यांचा प्रकाश दिवसादिवसाने कमी होत जाईल असा शाप दिला. अन्य देवतांनी दक्षाला उःशाप देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते, तेथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम रहाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली. शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. त्यामुळे हे स्थान सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.
 
कसे पोहचाल? 
हवाई मार्ग: सोमनाथपासून 55 किलोमीटरवर केशोड नावाच्या स्थानाहून सरळ मुंबईसाठी हवाईसेवा आहे. केशोड आणि सोमनाथ दरम्यान बस आणि टॅक्सी सेवा आहे.
 
रेल्वे मार्ग - सोमनाथहून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन वेरावळ असून ते सात किलोमीटरवर आहे. येथून अहमदाबाद आणि गुजरातच्या अन्य ठिकाणी जाता येते.
 
रस्ता मार्ग - सोमनाथ वेरावळहून सात किलोमीटर, मुंबईहून 889, अहमदाबादपासून 400, भावनगरहून 266, जुनागढहून 85, पोरबंदरहून 122 किलोमीटरवर आहे. पूर्ण राज्यातून येथे येण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे.
 
रहाण्याची सोय - येथे रहाण्यासाठी गेस्ट हाऊस, आणि धर्मशाळेची व्यवस्था आहे. वेरावळमध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे.
 
पुढे पहा मल्लिकार्जुन
श्री शैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुन - गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याक‍रितां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.
 
धार्मिक उत्सव-  महाशिवरात्रीची यात्रा व रथउत्सव विशेष प्रसिद्ध आहे. 
 
कसे जाल-  हे ज्योतिर्लिंग हैद्राबाद या ठिकाणी असून रेल्वे मार्ग, भू मार्गे या ठिकाणी भाविकांना जाता येते. मुंबई पासून हे अंतर ९७० कि.मी चेन्नई:५७० कि.मी,बंगळूर:५४० कि.मी, हैद्राबाद २३५ कि.मी आहे.
 
पुढे पहा उज्जैनचे शिवशंभोचे 'महाकाल'रूप
उज्जैनचे शिवशंभोचे 'महाकाल'रूप - उज्जैनचे महाकाल मंदिर हे शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी एक आहे. हे एकमेव दक्षिणमु्‍खी शिवलिंग आहे. तांत्रिक-मांत्रिकांसाठीही हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले जाते. श्री महाकाल मंदिराची प्रशंसा महाभारतकालीन वेद व्यासांपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केली आहे.
 
येथील मंदिराची निर्मिती अकराव्या शतकात झाली. त्यानंतर जवळपास 140 वर्षानंतर दिल्लीचा सुलतान इल्तुतमिशाने उज्जैनवर आक्रमण करून हे मंदिर उध्वस्त केले. सध्याचे मंदिर मराठाकालीन आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अडीचशे वर्षांपूर्वी शिंदे घराण्याचे दिवाण बाबा रामचंद्र शेणवी यांनी केला होता. 
 
येथे शिवलिंग स्थापन होण्यासंदर्भात अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. ''दूषण नावाच्या राक्षसाच्या अत्याचाराला उज्जैनवासीय वैतागले होते. त्यांनी संरक्षणासाठी शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले. ज्योतिच्या रूपात प्रकट होऊन त्यांनी दूषण राक्षसाचा संहार केला. भक्तांच्या आग्रहानंतर लिंगाच्या रूपात ते उज्जैनमध्ये स्थायिक झाले.'' अशी कथा ‍शिवपुराणात आहे. 
 
येथील शिवलिंग जगा‍तील एकमेव असे शिवलिंग आहे जेथे भस्माआरती केली जाते. ही भस्मारती म्हणजे अलौकीक सोहळा असतो. पहाटे चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत वैदिक मंत्र, स्तोत्रपठण, वाद्य यंत्र, शंख, डमरू आणि घंटानादात ही भस्मारती केली जाते. बम-बम भोलेच्या जयघोषात ही आरती आपले अंतर्मन जागृत करते. या आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक उत्सुक असतात. 
 
भस्मारतीवेळी पूजा करण्यासाठी साधे वस्त्र धारण करून गाभार्‍यात जाण्याची परवानगी नाही. पुरूषांसाठी रेशमी वस्त्र आणि महिलांना साड‍ी परिधान केल्यानंतरच गाभार्‍यात प्रवेश दिला जातो. मुख्य आरतीत केवळ पुरूषच सहभागी होतात. यावेळी स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही. गाभार्‍याबाहेर तयार केलेल्या नंदी हॉलमध्ये भक्त या भस्मारतीचा आनंद घेऊ शकतात.
 
''पूर्वी येथे मृतदेहाला जाळल्यानंतर उरलेल्या राखेने (चिताभस्म) भोलेनाथाला सजविले जात असे. परंतु, एकदा मृतदेहाची ताजी राख (चिताभस्म) मिळाली नाही. त्यावेळी पुजार्‍याने आपल्या जिवंत पुत्राला अग्निच्या हवाली करून दिले आणि बालकाच्या चिताभस्माने शंकराला सजविले होते. तेव्हापासून येथे मृतदेहाच्या चिताभस्माऐवजी गायीच्या शेणाने तयार केलेल्या भस्मापासून भगवान शिवाला सजविले जाते.'', अशी दंतकथा आहे.
 
महाकाल मंदिरात शिवरात्र आणि श्रावणी सोमवारच्या दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी उज्जैनचा राजा महाकाल आपल्या जनतेची परिस्थिती जाणून घेण्यासाठी शहरात फिरायला निघतो, अशी समजूत आहे. या दिवशी भगवान शिवाचे मुखवटे पालखीत ठेवून मिरवणूक काढली जाते. शेवटच्या श्रावण सोमवारी महाकालची शाही मिरवणूक काढली जाते. यामध्ये हजारोच्या संख्येने लोक सहभाग घेतात. सगळीकडे महाकालचा जयघोष चाललेला असतो.
 
''उज्जैनचा एकच राजा आहे, तो म्हणजे महाकाल' असे पूर्वी सांगितले जात असे. यामुळे उज्जैनच्या सीमेमध्ये कोणताही राजा-महाराजा रात्री थांबत नसे, असेही बोलले जाते. म्हणूनच उज्जैनवर शिंदे घराण्याचे राज्य होते, तेव्हाही रात्र काढण्यासाठी त्यांनी आपला राजवाडा शहराच्या सीमेबाहेर बांधला होता, अशी दंतकथा आहे. 
 
आरतीचा वेळ- श्री महाकाल मंदिराचे दरवाजे पहाटे चार वाजता उघडतात. ही वेळ भस्मारतीचा असून ती सकाळी सहा वाजेपर्यंत चालते. सकाळी साडेसात ते आठ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत नैवेद्य आरती चालते. संध्याकाळी पाचपासून जलाभिषेक बंद होतो. संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत सायंआरती आणि रात्री साडेदहा वाजता शयन आरती असते. रात्री अकरा वाजता मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. (उन्हाळ्याच्या दिवसात नैवेद्य आरती सकाळी सात ते पाऊणे आठ वाजेपर्यंत आणि सायं आरती सात ते साडेसात वाजेपर्यंत असते.)  
 
उज्जैनला जाण्यास योग्य काळ- वर्षभर महाकाल मंदिरात भक्तांची रांग लागलेली असते, परंतु शिवरात्र आणि श्रावण महिन्यात या नगरीचे रूप निराळेच असते. सगळीकडे गर्दी असते. रस्त्यावर खांद्यावर कावड घेतलेले लोक नजरेस पडतात. संपूर्ण शहर शिवभक्तीत मग्न झालेले असते. श्रावणात येथे श्रावण महोत्सव होतो. 
 
कसे जावे- रस्त्याने- उज्जैन-आग्रा-कोटा-जयपूरमार्गे, उज्जैन-बदनावर-रतलाम-चितोडमार्गे, उज्जैन-मक्सी-शाजापूर-ग्वालियर-दिल्लीमार्गे, उज्जैन-देवास-भोपाळमार्गे, उज्जैन-धुळे-नाशिक-मुंबईमार्गे.
 
रेल्वे मार्ग- उज्जैनहून मक्सी-भोपाळ मार्गे (दिल्ली-नागपूर रेल्वे मार्ग), उज्जैन-नागदा-रतलाम मार्गे (मुंबई-दिल्ली रेल्वेमार्ग), उज्जैन-इंदूरमार्गे ( मीटरगेजने खांडवा रेल्वेमार्ग), उज्जैन-मक्सी-ग्वालियर-दिल्लीमार्गे. 
 
हवाई मार्ग- उज्जैनपासून इंदूर विमानतळ जवळपास 65 किलोमीटरवर आहे.
 
राहण्याची व्यवस्था- उज्जैनमध्ये चांगल्या हॉटेलपासून सर्वसामान्यांना परवडेल अशा धर्मशाळा आहेत. तसेच महाकाल समितीची महाकाल आणि हरसिद्धी मंदिराजवळ धर्मशाळा आहेत. या धर्मशाळेत वातानुकूलित, साध्या खोल्या आणि हॉलही उपलब्ध आहेत.
 
पुढे बघा ओंकारेश्वरचे अमलेश्वर
ओंकारेश्वरचे अमलेश्वर - उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असें म्हणतात.
 
ओंकारेश्वराची शाही स्वारी 
नर्मदा नदीस मध्यप्रदेशची जीवनरेखा मानण्यात येते. या नदीवरच ओंकारेश्वर महादेव मंदिर आहे. बारा ज्योर्तीर्लिगांपैकी ते एक आहे. येथील सृष्टीसौंदर्याने नटलेल्या रम्य वातावरणात आल्यावर भाविक शिवभक्तीत तल्लीन होतात. वैशिष्ट्य म्हणजे मंदिर असलेल्या डोंगराचा आकारही ॐ असा आहे आणि या डोंगरावरून पाहिल्यास माता नर्मदाही ॐ आकारात वाहत असल्याचे दिसते. इतरत्र वेगात वाहणार्‍या नर्मदा नदीचे शांत रूप येथे बघायला मिळते.
 
वैशिष्ट्य म्हणजे येथे एक नव्हे तर दोन शिवलिंग आहेत. ओंकारेश्वर आणि दुसरे ममलेश्वर. दोन्ही शिवलिंग जागृत असल्याचे मानण्यात येते. संथपणे वाहणार्‍या नर्मदेच्या भिन्न किनार्‍यांवर ती वसली आहेत. 
 
मंधाता नावांच्या दिव्य पुरूषाची अंबरिष व मुषुकुंद ही दोन मुले होती. त्यांनी कठोर तपस्या केल्याने येथे दोन शिवलिंग असल्याचे मानले जाते. यामुळेच येथील पर्वत मंधाता पर्वत म्हणून विख्यात आहे. 
 
शिव पुराणानुसार... 
ओंकार बाबा व ममलेश्वरजी ओंकारेश्वराचे अधिपती असल्याचे मानले जाते. प्रत्येक सोमवारी प्रजेचे सुख-दु:ख जाणून घेण्यासाठी ते शहरात फिरत असतात. भगवान ओंकारास वाजत गाजत नावेत बसवून ममलेश्वर मंदिराच्या घाटावर आणण्यात येते. येथूनच दोन्ही देवता नगर भ्रमणासाठी निघतात.  
दर सोमवारच्या या पालखीला श्रावण सोमवारी विशेष स्वरूप प्राप्त होते. आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी शहरभर भक्तांची गर्दी होते. शेवटचा श्रावणी सोमवार तर मंगलमय वातावरणात साजरा करण्यात येतो. 
 
दर सोमवारच्या या पालखीला श्रावण सोमवारी विशेष स्वरूप प्राप्त होते. आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी शहरभर भक्तांची गर्दी होते. शेवटचा श्रावणी सोमवार तर मंगलमय वातावरणात साजरा करण्यात येतो. 
 
या दिवशी येथे गुलालाची होळी खेळली जाते. सर्व रस्ते गुलालाने न्हाऊन निघत असतात. जयजयकाराच्या घोषणा आणि गुलालाने आसमंत दुमदुमून जातो. हे सर्व पाहण्यासारखे असते. 
 
ओंकार महाराजांची चांदीची पंचमुखी प्रतिमा फुलांनी सजवून पालखीतून घाटावर आणण्यात येते. नगर भ्रमणानंतर दोन्ही लिंगे थाटात नौकाविहार करतात. संपूर्ण वातावरण शिवमय होऊन जाते. 
 
जाण्याचा मार्ग - ओंकारेश्वरला विमाऩ, रेल्वे किंवा बसने जाता येते. 
 
विमानाने जायचे झाल्यास येथून 77 किलोमीटरवर इंदूर विमानतळ आहे. दिल्ली, मुंबई व भोपाळहून येथे विमानांची व्यवस्था आहे. 
 
रेल्वे- येथून बारा किलोमीटरवर खांडवा- रतलाम रेल्वे स्टेशन आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असल्याने भरपूर गाड्या आहेत. 
 
इंदूर, उज्जैन व खांडवा शहरांशी ओंकारेश्वर रस्त्यांनी जोडलेले आहे. याशिवाय भरपूर बसही उपलब्ध आहेत.
 
पुढील पानावर बघा वैजनाथ
संथाल परागण्यातील वैजनाथ - शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.
 
उत्सव - महाशिवरात्री, दसरा, श्रावणात दर सोमवारी शिवपालाखीची मिरवणूक काढली जाते. या ठिकाणी महादेवास बेल व विष्णूस तुळस  वाहिली जाते.
 
कसे जाल- परळी वैद्यनाथ हे पवित्र ठिकाण महाराष्ट्र राज्यात असून बीड जिल्ह्यात आहे. येथे जाण्यासाठी खासगी बसेस, रेल्वे, उपलब्ध आहे. मुंबई पासून हे ठिकाण ५०० कि मी, पुणे ६७५ कि मी, नाशिक ३६१ कि मी, औरंगाबाद २३०, बीड १००, अंबेजोगाइ  पासून फक्त २६ कि मी अंतरावर आहे.
जुन्नर-खेडचे भीमाशंकर -  खेड- जुन्नरद्दून थेट भीमाशंकराच्या देवळापाशीं रस्ता जातो. कर्जतवरून आणि खेड-चासहून रस्ते आहेत. भीमानें राक्षसाचा वध केल्यामुळें भीमाशंकर नांव प्रसिद्ध झाले. शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी भीमाशंकर आहे. पुण्यापासून 110 किलोमीटरवर असलेले हे तीर्थस्थान पश्चिम घाटात वसले आहे. भीमा नदीही याच परिसरात उगम पावते. शंकराने या ठिकाणी त्रिपुरासुराचा वध केला. त्यानंतर आलेल्या घामातून भीमा नदीचा उगम झाल्याची पौराणिक कथा आहे. 
 
स्कन्द्पुरण व शिवपुराणात या क्षेत्राचा उल्हेख आला आहे. भीमाशंकर हे पवित्र ठिकाण समुद्र सपाटी पासून ३४५४ फुट उंचीवर असून हेमांडपंथी शैलीतील हे मंदिर ७ व्या शतकात बांधले गेले. इ स १२०० मध्ये विनायक सावरकरांनी या मंदिराचा जिर्णोधार केला. रघुनाथ पेशव्यांच्या काळात या ठिकाणी विहिरींचे काम झाले होते. औरंगजेबाचा पराभव करण्यासाठी या भागातील सावंत बधुनी घनदाट जंगलाचा फायदा घेवून औरंजेबाचा पराभव केला असल्याची माहिती आहे. 
 
मंदिराची रचना-  सह्याद्री पर्वतातील, देवराई जंगलातील दरीत हे मंदिर वसलेले असून सुमारे १०० पाय्र्य्या उतरून या मंदिरात जावे लागते. या मंदिराच्या शैलीची रचना इंडो आर्यन शैलीतील आहे. त्यामुळेच मुख्य शिखरावर छोटे छोटे शिखर जोडलेले आढळतात. येथे असणारा नंदी मंडप प्राचीन काळातील मानतात. या मंदिरात ११ सुंदर कमानी व नव्या रचनांचा मेळ सुंदररीत्या घातला आहे. 
 
धार्मिक उत्सव - महाशिवारात्रीत भव्य यात्रा भरते, सोमवती अमावस्या, कार्तिक पौर्णिमेस उत्सव होतो. व दर सोमवारी भाविकांची मांदियाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असते. 

कसे जाल- भीमाशंकर हे पवित्र ठिकाण महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी असून हे ठिकाण मुंबई पासून २६५ कि मी,   नाशिक 190कि मी, पुणे १२५ कि मी अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी पुण्याच्या मध्यावर्थी बस स्थानकापासून ५-५ मिनिटाच्या अंतरावर जाण्यासाठी वाहने भाविकांना उपलब्ध होत असतात. 
दक्षिण भारतातील रामेश्वर - दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.  स्कन्द्पुरण व शिवपुराणात या पवित्र क्षेत्राचा उल्लेख आलेला आहे. रामेश्वरद्विपाचा आकार काहीसा श्रीविष्णूच्या शंकसारखा असून श्रीलंकेच्या राजाने याठिकाणी मंदिर  बांधले  होते.  रामेश्वर मंदिराची निर्मित १२ ते १६ व्या शतकात झाली.   इ स १८९७ मध्ये स्वामी विवेकानंद येथे दर्शनार्थ येवून गेले आहे. 
 
मंदिराची रचना- बंगालचा उपसागर व हिंदी महासागर यांचे संगम स्थान असून द्रविड स्थापत्य शैलीचे हे मंदिर मानले जात असून येथील मंडपाची निर्मिती इ स १७४० ते १७७०  या कालावधीत झाली. या मंदिर परिसरात २२ विहिरी असून गर्भगृहात चांदीच्या चोथार्यावर सुंदर शिवलिंग आहे. विशेष म्हणजे या शिवलिंगावर केवेल गंगाजलाचाच अभिषेक केला जातो. 
 
धार्मिक उत्सव- महाशिवरात्रीस मुख्य उत्सव होतो. हातीवरून रामेश्वर पालखीची मिरवणूक काढतात. दीपोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी तमिळ भाविक मोठ्याप्रमाणावर यात्रेसाठी येत असतात. सदर यात्रा १५ दिवस चालते.    
   
कसे जाल- हे पवित्र ज्योतिर्लिंग तामिळनाडू राज्यात असून मदुराई-रामेश्वर अशी बस सेवा उपलब्ध आहे. हे ठिकाण मुंबई पासून १९४० कि मी, कन्याकुमारी ३२० कि मी,  मदुराई १७० कि मी तर रामनाथपुरम पासून ५५ कि मी येते. या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे सुविधा उपलब्ध असून मुंबई ते रामेश्वरम रेल्वे या ठिकाणी जात असते. 
नागेश्वर (श्री औढ्या नागनाथ) - श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्‍याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्‍या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.
 
पाण्डवातील धर्मराजाने हे मंदिर बांधले महाराष्ट्रातील संत नामदेव  व त्यांचे गुरु विसोबा खेचर यांची प्रथम भेट या मंदिराला दिली.  यांनतर मात्र अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्नोधार केला.    
                                        
मंदिराची रचना - या मंदिरात २५ फुट उंचीची तटबंदी असून  चार दिशास चार दरवाजे आहेत. मंदिराचा खलाचा भाग काळ्या पाषाणात व वरील    अर्धा भाग विटांवर पांढर्या रंगातील असल्याने मंदिर खुलून दिसते. महाद्वारावर शिवलीला प्रसंग आहेत. यात नटराज मूर्ती, शंकर पार्वतीस काही तरी समजावून सांगत असल्याचे विलाभोनीय दृश बघावयास मिळते. 
 
धार्मिक उत्सव- महाशिवरात्रीस मोटा उत्सव होतो, रथौत्सव हि या ठिकाणी होत असतो. रथाच्या ५ फेर्या मंदिराभावती केल्या जातात. असे म्हटले जाते कि, काशीची गंगा येथे प्रकट होते व कुंडाचे पाणी स्वच्छ करून ठाकते. विजयादशमीच्या दिवशी नागनाथ महाराजांची पालखी निघते. 
 
कसे जाल-  हे पवित्र ठिकाण महाराष्ट्रातील हिंगोली जिह्ल्यात असून महाराष्ट्राच्या प्रमुख शहारामधून बस सेवा व इतर खासगी वाहने उपलब्ध आहे. मुंबई पासून हे ठिकाण ५७० कि मी, पुणे ४६० कि मी, नाशिक ४३५ कि मी, हिंगोली पासून फक्त २५ कि मी अंतरावर आहे. 
काशीविश्वेश्वर - वाराणशीस (काशीस) प्रसिद्धच आहे. जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. 
 
 'वाराणसीतु भुवनत्रया सारभूत 
रम्या नृनाम सुगतिदाखिल सेव्यामना 
अत्रगाता विविधा दुष्कृतकारिणोपि
पापाक्ष्ये वृजासहा सुमनाप्रकाशशः' 
 
नारद पुराण -  गंगा नदीच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. ही नगरी भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही विख्यात आहे. याच नगरीत काशी विश्वनाथाचे वास्तव्य आहे. हे मंदिर शंकराच्या प्रमुख ज्योतिर्लिंगामधील एक मानले जाते. लोक येथे केवळ दर्शनासाठीच येतात, असे नाही तर आयुष्यात मोक्ष प्राप्ती व्हावी ती इथेच असे त्यांना वाटते. परदेशातूनही लोक येथे येतात आणि गंगेच्या घाटाच्या सानिध्यात वसलेल्या मठ-मंदिरात जाऊन मनाला शांती देऊ शकणार्‍या साधूंच्या चरणी नतमस्तक होतात. 
 
धार्मिक महत्त्व - वाराणसी अर्थात काशीचे महत्त्व फार मोठे आहे. पृथ्वीची निर्मिर्ती झाली तेव्हा प्रकाशाची पहिली किरणे काशीच्या भूमीवरच पडली असे मानले जाते. तेव्हापासूनच काशी ज्ञान, अध्यात्माचे केंद्र झाले. काशीची निर्मिती झाल्यानंतर काही कालांतराने शंकराने येथे काही काळ वास्तव्य केले होते. ब्रह्माने दहा घोड्यांचा रथ (दशाश्वमेघ) घाटावर पाठवून त्यांचे स्वागत केले होते. 
 
काशी विश्वनाथ मंदिर - गंगेच्या किनार्‍यावर अरुंद विश्वनाथ गल्लीत विश्वनाथाचे मंदिर आहे. त्याच्या चहूबाजूने मंदिरे आहेत. येथे एक विहीरही आहे. तिला 'ज्ञानव्यापी'ची संज्ञा दिली जाते. ती मंदिराच्या उत्तरेला आहे. 
 
विश्वनाथ मंदिराच्या आत एक मंडप आणि गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या आत चांदीने मढविलेले परमेश्वर विश्वनाथांचे साठ सेंटिमीटर उंच शिवलिंग आहे. हे शिवलिंग काळ्या दगडातून निर्मित आहे. मंदिराचा आतील परिसर मोठा नसला तरीही तेथील वातावरण शिवमय आहे. 
 
ऐतिहासिक महत्त्व - हे मंदिर ऐतिहासिक काळात निर्माण झाले होते, असे मानले जाते. इसवी सन 1776 मध्ये इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मोठी रक्कम दान केली होती. लाहोरचे महाराजा रणजीतसिंह यांनी मंदिराच्या शिखरासाठी एक हजार किलो सोने दान दिले होते. 1983 मध्ये उत्तरप्रदेश सरकारने मंदिराचे व्यवस्थापन आपल्या हातात घेतले आणि काशीचे माजी नरेश विभूती सिंह यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती केली. 
 
पूजा-अर्चना -हे मंदिर रोज भल्या पहाटे 2.30 वाजता मंगल आरतीसाठी खुले केले जाते. ही आरती सकाळी 3 ते 4 वाजेपर्यंत चालते. भाविक तिकिट घेऊन या आरतीत भाग घेतात. त्यानंतर 4 वाजेपासून सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वांसाठी मंदिर खुले होते. 11.30 पासून दुपारी 1 वाजेपर्यंत नैवैद्य आरतीचे आयोजन होते. 12 वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत परत या मंदिरात सार्वजनिक दर्शनाची व्यवस्था आहे. संध्याकाळी 7 ते 8.30 पर्यंत सप्तऋषी आरती चालते त्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत सर्व भाविक मंदिराच्या आत दर्शन करू शकतात. 9 वाजेनंतर मंदिर परिसराबाहेरूनच दर्शन घ्यावे लागते. शेवटी 10.30 वाजता रात्री शयन आरती प्रारंभ होते. लोकानी वाहिलेला प्रसाद, दूध, कपडे आणि अन्य वस्तू गरीबांमध्ये वाटल्या जातात. 
 
कसे पोहचाल?
हवाई मार्गे : वाराणसी शहर देशाच्या जवळपास सर्व मुख्य शहरांशी हवाई मार्गे जोडलेले आहे. तरीदेखील दिल्ली-आग्रा-खजुराहो-वाराणसी मार्ग पर्यटकांमध्ये जास्त लोकप्रिय आहे. 
 
रेल्वेमार्गे : वाराणसी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि भारताच्या बर्‍याच महत्त्वपूर्ण भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडले आहे. दिल्ली आणि कोलकाता या ठिकाणांसाठी वाराणसीहून राजधानी एक्सप्रेसही जाते. वाराणसीपासून फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावर स्थित मुगलसरायपासूनही बर्‍याच स्थानांसाठी रेल्वे व्यवस्था आहे. 
 
रस्तामार्गे : गंगेच्या मैदानात असल्यामुळे वाराणसीसाठी रस्त्यामार्गे जाण्याची उत्तम व्यवस्था आहे. उत्तर प्रदेशाच्या विविध भागांतून येथे सरकारी आणि खाजगी बसची उत्तम व्यवस्था आहे.
त्र्यंबकेश्वर - नाशिकहून बीस मैलांवर पश्चिमेस गौतम ऋषिच्या विनंतीवरून गंगा येथें आली व शंकर लिंगरूपानें आले. शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये त्र्यंबकेश्वरचा समावेश होतो. दक्षिणेची काशी मानले जाणार्‍या नाशिकपासून हे ज्योतिर्लिंग 35 किलोमीटरवर आहे. ज्योतिर्लिंग स्तोत्रातही त्र्यंबकम गौतमी तटे असे म्हणून त्र्यंबकेश्वराचा उल्लेख केला आहे.त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. याच पर्वतावर पवित्र गोदावरी नदी उगम पावते. 
 
गावात पाऊल ठेवताच मन आपोआप शिवमय होऊन जाते. उतरल्यानंतर लांबूनच मंदिराचा कळस दिसू लागतो. त्या दिशेने चालून गेले की मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दिसू लागते. महामृत्युंजय मंत्राच्या आवाजाने मनातही सात्विक भाव उत्पन्न होतात. या मंदिराची इमारत सिंधू-आर्य शैलीचा उत्तम नमूना आहे. मंदिराच्या सभोवताली दगडी भिंतींचा मजबूत कोट आहे. या कोटाच्या आत हे मंदिर वसले आहे. वैशिष्ट्यपूर्ण बांधणीचे हे मंदिर नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ या काळात बांधले. मंदिर बांधायला तब्ब्ल 31 वर्षे लागली. त्यासाठी सोळा लाख रूपये खर्च आला. 
 
मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर समोर मंदिर दिसते. मुख्य मंदिराच्या समोर नंदीचे स्वतंत्र मंदिर आहे. या नंदीच्या शिंगातून पाहिल्यानंतरही शिवलिंगाचे दर्शन होते. तेथून मुख्य मंदिरात जाण्याचा रिवाज आहे. मुख्य मंदिरात आल्यानंतर गर्भगृहातूनच शिवलिंगाचे दर्शन घ्यावे लागते. गाभाऱ्यात जाता येत नाही. येथे शिवलिंगाच्या ठिकाणी एक खड्डा आहे. त्यात एक एक इंचाची छोटी छोटी तीन लिंगे आहेत. त्यांना ब्रह्मा विष्णू महेश असे मानले जाते. 
 
पहाटेच्या वेळी होणाऱ्या पूजेनंतर त्यावर चांदीचा पंचमुखी मुकूट चढविला जातो. त्र्यंबकेश्वर गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. प्राचीन काळी गोहत्येचे पाप लागल्याने त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी गौतम ऋषींनी येथेच तपश्चर्या केली होती. गंगेला येथे प्रवाहित करावे असा वर त्यांनी शंकराकडे मागितला. शंकराने तथास्तू म्हटले आणि येथे गंगा अर्थात गोदावरी अवतरली. अशी दंतकथा सांगीतली जाते. 
 
गोदावरीच्या उगमाबरोबरच गौतम ऋषींच्या विनंतीनुसार शंकराने येथे कायमचा वास करण्याचे मान्य केले. शंकराचे एक रूप त्रिनेत्र आहे. या त्रिनेत्राने येथे रहाण्याचे मान्य केले म्हणून त्र्यंबकेश्वर (तीन नेत्रांचा ईश्वर) असे नाव पडले. उज्जैन आणि ओंकारेश्वराप्रमाणेच त्र्यंबकेश्वरला गावचा राजा मानण्यात येते. त्यामुळे प्रत्येक सोमवारी प्रजेची हालहवाल पाहण्यासाठी त्र्यंबकेश्वराची स्वारी नगर भ्रमणासाठी निघते. 
 
अर्थात पालखीतून त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सोन्याचा मुखवटा मिरवत ठरवलेल्या मार्गाने कुशावर्त या येथील पवित्र तीर्थावर नेला जातो. तेथे मुखवट्याला स्नान घातले जाते. त्यानंतर मुखवटा परत मंदिरात नेण्यात येतो. त्याला हिरेजडीत सुवर्णाचा मुकूट चढविण्यात येतो. ही पालखी पाहणे हा अतिशय पवित्र आणि अलौकीक अनुभव आहे. 
 
कुशावर्त या पवित्र तीर्थाची कथाही रोचक आहे. ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदी वारंवार लुप्त होत असे. गोदावरीच्या पलायनाला रोखण्यासाठी गौतम ऋषींनी गोदावरीला बांध घातला आणि एका कुंडात हा प्रवाह उतरवला. त्यालाच कुशावर्त तीर्थ असे म्हणतात, अशी दंतकथा सांगितली जाते. कुंभमेळ्यात शैव आखाडे याच कुंडात पवित्र शाही स्नान करतात. शिवरात्र आणि श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. प्रत्येक श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातली जाते. तिसऱ्या सोमवारी तर मोठी गर्दी असते. 
 
कुशावर्तात स्नान करणे फार पवित्र मानले जाते. त्र्यंबकेश्वरमध्ये कालसर्प योग आणि नारायण नागबलीची पूजासुद्धा होती. त्यामुळे वर्षभर येथे लोकांची गर्दी असते. याशिवाय नाथपंथीयांसाठीही त्र्यंबकेश्वराचे आगळे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथांची समाधी येथेच आहे. येथेच निवृत्तीनाथांनी तपश्चर्या केली होती. त्यामुळे वारकरी संप्रदाय येथे मोठ्या भक्तीभावाने येत असतो. 
केदारेश्वर - हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.
 
या परिसरास देवभूमी असे म्‍हटले जाते. चारधामपैकी हे एक असून  या ठिकाणी रेडयाची पाठ जेथे जमिनीबा‍हेर राहिली. त्‍याजागी पांडवानी मंदिर बांधले. या मंदिराचे पूर्नेनिर्माण 8 व्‍या श‍तकात शंकराचार्यांनी केले. मुख्‍य मंदिराची निर्मिती 9 व्‍या शतकात झाली. तर आहिल्‍याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोध्‍दार केला. समुद्रसपाटीपासून बारा हजार फूट उंचीवरती हे मंदिर बसले आहे.
 
मंदिराची माहितीबर्फाच्‍छादीत पर्वतामधील एका उंच दगडी चौथ-यावर करडया दगडी रंगाचे मंदिर असून चार दिशांना चार दरवाजे आहे. येथून हिमालयातील नंदादेवी, नंदाघुमटी ञिशुली, हत्‍तीपर्वत आदी शिखरे दिसतात.
 
धार्मिक उत्सवमहाशिवराञीस येथे मोठा उत्‍सव भरतो. शिवरथाची मिरवणूक मंदिराभोवती रथाच्‍या पाच फे-या काढल्‍या जातात.
 
कसे जालहे मंदिर उत्तररांचाल या राज्‍यात बसलेले असून येथे जाण्‍यासाठी डेहराडूनवरून बस व टॅक्‍सीची सुविधा उपलब्‍ध आहेत. मुंबईपासून 2120 किमी अंतर आहेत.
 
घृष्णेश्वर - (घृश्मेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात.
 
स्कन्द्पुरण व शिवपूराण, रामायण व महाभारतात श्री घष्‍णेश्‍वराचा उल्‍लेख आला आहे. सुमारे 1500 वर्षापासून राष्‍ट्रकुट घराण्‍यातील राजा कष्‍णराजने हे मंदिर बांधले आहे. इ.स 1730 मध्‍ये गौतमीबाई महादेव होळकर यांनी मंदिराचा जिर्णोध्‍दार केला.
 
मंदिराची मा‍हिती-  मंदिराचे मुळ नाव कुंकूमेश्‍वर होते.हे मंदिर शिल्‍पकलेचा उत्‍तम नमुना होय. मुळ दगडी चौथरा सहा हजार आठशे चार चौरस फुट असून अर्धे मंदिर हे लाल पाषाणाचे आहे. मंदिरात सुंदर नंदीची मूर्ती असून खांबावर रामायण व महाभारत दशावतार आदींचे चिञ रेखाटले आहे. इ.स 1791 मध्‍ये अहिल्‍याबाई होळकरांनी एक एकर बागेत शिवालय तिर्थ बांधले.
 
धार्मिक उत्‍सवमहाशिवराञीची मोठा याञोत्‍सव भरविला जातो.शंकराची पालखी शिवालय तिर्थावर स्‍नानासाठी आणली जाते. राञीच्‍यावेळी अंलकार पूजेचा सोहळा होतो. श्रावण सोमवारी मोठया प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येथे येतात.
 
कसे जालऔरंगाबाद जिल्‍हयातील हे मंदिर असून महाराष्‍ट्रातील प्रमुख शहरांतून येथे जाण्‍यासाठी बस व टॅक्‍सीची सुविधा उपलब्‍ध आहेत. औरंगाबाद पासून 45 किमी, मुंबई 425,  तर नाशिकपासून 265 किमी अंतर आहेत.