गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By वेबदुनिया|

बोरन्हाण अर्थात बोरलुट!

संक्रांत येणे हा वाक्प्रचार आपण वाईट गोष्टींसाठी वापरत असलो तरी सुर्यमालेतील पृथ्वी व सुर्याच्या परस्परसंबंधांतून निर्माण होणार्‍या ह्या 'मकरायणा'चा संबंध मराठी महिन्याबरोबरच 14 जानेवारी ह्या इंग्रजी तारखेशी आहे. त्यामुळेच इतर कोणतेही सण मागेपुढे होत असले तरी 'संक्रांत' बरोबर 14 तारखेसच येते.

संक्रांत सण हा पहिला सण आल्यास (नववधूचा लगेच पहिला सण किंवा अपत्याचा पहिला सण) तो न करता पुढच्या वर्षीची संक्रांत साजरी करण्‍याची प्रथा आहे. पण इतर एखादा तरी सण त्यांच्या आयुष्यात पहिला होऊन गेल्यास नंतर संक्रांत साजरी करण्यास कोणतीही अडकाठी नाही. जावयाला चांदीची वाटी, हलव्याचा नारळ देतात तर मुलीला हलव्याचा पूर्ण साज चढवला जातो. एरवी शुभकार्यात वर्ज्य असणारा काळा रंग व त्याची साडी दिमाखात मिरवायला मिळणारा हा सण आहे. तो प्रकार तान्ह्या बाळाच्या बाबतीतही आहे. त्यात ते बाळ जर बसू लागले असेल तर येणारी मजा काही औरच.

त्याला हलव्याचे गळ्यातले हार, बाजुबंद, हातातले तसेच हलव्याचा मुकुट, बासरी आदी पांढर्‍याशुभ्र रंगबिरंगी हलव्यानी बनवून सजवले जाते. अंगात काळा अंगरखा, झबलं अंगावर हलव्याचा साज अशा वेषात सजलेली बाळं खरंच बाळकृष्णच दिसतात. त्या बालकृष्णाला मध्यभागी चौरंगावर बसवले जाते. त्याच्या आजूबाजूला इतर लहान मुलांना बसवले जाते. त्या मुलाच्या डोक्यावरून लाह्या, चुरमुरे, बोरं चॉकलेट, गोळ्या, बिस्किटे इत्यादी पदार्थांची ओंजळ ओतली जाते. 5 जणी, 11 जणी मिळून त्यावर हा वर्षाव करतात. त्यालाच बोरन्हाण म्हणायची प्रथा आहे. याला काही भागात बोरलुट असेही म्हणतात. 

यामध्ये बाळाच्या कौतुकाचा भाग तर आहेच, पालकांची हौसही आहे. अन् त्या त्या ऋतुत येणार्‍या फळांना चाखण्याची सवय ही बाळांना लावणाचा हा अनोखा प्रयत्न म्हणावा लागेल. शीतळ शिमगा, बोरन्हाण ही त्याचीच प्रतीक आहेत.

बाळावर असाच सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे. तो सुबत्तेत न्हाउ दे. कायम बाळगोपाळांनी घेरलेला म्हणजेच सर्वांचा लाडका होउ दे. ह्या भावनेने केलेला हा एक संस्कारच होय.