गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By वेबदुनिया|

स्नेहगुणांचा सण संक्रांत

तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजे मकर संक्रांत. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच येणारा हा सण. या सणाच्या निमित्ताने हिवाळतील आहाराचे पारंपरिक महत्त्व कळते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने संक्रांतीला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. थंडीमुळे त्वचेतील स्निग्धता कमी होऊन ती कोरडी होते. तसेच शरीरातील उष्णताही कमी होते. तीळ स्निग्धता कायम ठेवण्याचे तर गूळ शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करतो.

संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी. ती आपण कालच साजरी केली दुपारच्या जेवणात बाजरीची भाकरी, लोणी, वांगे, गाजर, वालपापडी, वाटाणा अशी खमंग मिसळीची भाजी,

मुगाची गरमागरम खिचडी असा खास बेत केला असेलच. भारतीय सणांमध्ये प्रत्येक वेळी शास्त्राचा विचार केलेला दिसतो. प्रत्येक सणाचे वेळी हवामान खाण्यापिण्याच्या दृष्टीने योग्य असेल त्या हवामानाला पचायला योग्य असे पदार्थ त्या सणाच्या दिवशी करण्याची प्रथा पडली आहे.

 
WD
संक्रांतीच्या दिवशी थंडी असते. त्यावेळी बाजरीची उष्ण भाकरी, गरम मुगाची खिचडी हे पदार्थ पचायला सोपे असतात. त्याचप्रमाणे ते तब्येतीलाही हितकारक असतात. दुसर्‍या दिवशी अर्थात संक्रांतीला भाजलेले तीळ घालून रूचकर अशी गुळाची पोळी बनवली जाते. तीळ आणि गूळ हे दोन्ही उष्ण पदार्थ थंडीमध्ये खाणे शक्तिवर्धक असते. म्हणून खास गुळाचीच पोळी संक्रांतीदिवशी केली जाते. प्राचीन काळापासून मकर संक्रांतीला वापरला जाणार्‍या तिळाला आहारात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. थंडीची चाहूल लागलाच अंगात ऊब निर्माण करणारे व ऊर्जा प्रदान करणारे पदार्थ खाल्ले जातात. विविध प्रकारचा सुकामेवा, दाणे याबरोबर तिळाला अत्यंत महत्त्व आहे. संक्रांत ते रथसप्तमी या काळात घरोघरी तिळाला अपूर्व स्थान मिळते. तीळ शक्तिवर्धक असल्याने अनेक व्याधींवर तीळ, तिळाचे तेल हे उपाय केले जातात. तसेच तीळ पौष्टिक असल्याने त्यातील स्निग्धपणामुळे तिळाचे तेल अंगाला लावले जाते. शिवाय केस वाढण्यासाठी महिला तिळाचे तेल वापरतात.

हिवाळ्यामध्ये गाजर, हरभरा, मटार या भाज्या प्रामुख्याने उपलब्ध असतात. या भाज्यांमधून हिवाळ्यात शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्त्वे मिळतात.

त्यामुळे संक्रांतीच्या निमित्ताने मिक्स भाजीला पसंती दिली जाते. हिवाळ्यात मिळणार्‍या भाज्यांमध्ये क जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. काळे आणि पांढरे अशा दोन्ही प्रकारचे तीळ थंडीत शरीरासाठी चांगले असतात.

पचनानंतर शरीराला ऊर्जा देण्याचे काम तीळ करतात. अशा प्रकारे सांस्कृतिक दृष्टीने संक्रांतीच्या सणाची तयारी होत असली तरी आरोग्यासंदर्भातील त्याचा गर्भितार्थ समजून घ्यायला हवा.आरोग्दी असणार्‍ा तीळाचा स्नेह अन् गुळाची गोडी असणार्‍या हा सण आरोग्यमय साजरा करावा.

मंजुशा कुलकर्णी