गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2016 (17:51 IST)

नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चा : सुमारे १५ लाख लोक सहभागी झाल्याचा प्राथमिक अंदाज

राज्यात अनेक ठिकाणी निघालेला मराठा क्रांती मोर्चा शनिवारी नाशिकमध्ये काढण्यात आला. सुमारे १५ लाख लोक मोर्चात सहभागी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेमध्ये संपूर्ण मूक मोर्चा पार पडला. गेल्या काही दिवसांपासून सुरु केलेल्या नियोजनामुळे लोकांची लाखोमध्ये संख्या असूनही कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. नियोजित वेळेत आणि ठरविलेल्या पद्धतीने मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यावरून फिरत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर अखेर राष्‍ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. दुसरीकडे मोर्चासाठी झालेली गर्दी बघता सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणी पेक्षा अधिक लोक आल्याची चर्चा सुरु होती.

कोपर्डी घटनेचा निषेध व सुधारणा, आरक्षण यासह अनेक मागण्‍यांसाठी हा मोर्चा काढण्‍यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील गावोगावीहून लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच अनेक नेते मंडळीही मोर्चात सामील झाली. विशेष म्हणजे या मोर्चाला खासदार संभाजीराजेंसह खासदार  उदयनराजे भोसले  आवर्जून उपस्‍थित होते. महापौर अशोक मुर्तडक, राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, भाजप आमदार डॉ. अपूर्व हिरे, शिवसेना आमदार अनिल कदम, योगेश घोलप आणि सीमा हिरे आदी नेते उपस्थित होते. सोबतच समाजातील नामवंत अधिकारी, डॉक्‍टर, अभियंते ही होते.

गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातून मराठा क्रांती मोर्चा निघाला. मोर्चासाठी सकाळी सात वाजेपासूनच लोकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर  साडे दहा वाजेच्या सुमारास तपोवनातून मोर्चा निघाला. पुढे काट्या मारुती, निमाणी, महात्मा गांधी रोड, जिल्ह्याधिकारी कार्यालय येथे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर गोल्फ क्लब मैदानात निवेदनाचे वाचन करण्यात आले. शेवटी दुपारी दोनच्या सुमारास समारोप झाला.  

   मोर्चामधील आकर्षणे

·        मोर्चाचे पहिले टोक गोल्फ क्लब मैदानात तर शेवटचे टोक निमाणी बसस्टँडला होते. त्यामुळे  तब्बल पाच किलोमीटरपर्यंत लांब असे स्वरूप होते.

·        छोट्या बच्चे कंपनी मोठ्या संख्येने माँ जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत होती. दुसरीकडे मुले, मुली, काळे कपडे परिधान केले होते.

·        मोर्चातील निषेधाचे फलक, भगवे ध्‍वज, काळे कपडे यामुळे मोर्चाने लक्ष वेधून घेतले.

·        अनेक वृद्ध आणि अपंग मराठा बांधवांचा सहभाग लक्ष्यवेधी ठरला.